
>> डॉ. सरिता विनय भावे
झोडगे गावात अगदी रस्त्यालगत डाव्या बाजूला अनपेक्षितपणे एक छोटेखानी प्राचीन मंदिर आपल्याला दिसते. ध्यानीमनी नसताना हे ‘शिल्परत्न’ पुढे ठाकल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो! विचारांचा कल्लोळ उसळतो त्यातला पहिला विचार म्हणजे असे मंदिर असणारे हे ‘खेडेगाव’ आज ‘अतिसामान्य’ वाटले तरी त्या काळी निश्चितच राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवरचे ‘वैभवशाली नगर’ असेल.
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या नाशिक जिह्यातील ‘सिन्नर’ येथील ‘गोंदेश्वर’ मंदिर पाहिल्यावर त्याच महामार्गावर पुढे गेल्यावर नाशिकपासून 128 आणि मालेगावपासून 30 कि.मी. अंतरावर ‘झटुंब्याचा डोंगर’ आणि ‘झोडगे’ गाव दिसायला लागतात. रमेश पडवळ यांच्या ब्लॉगनुसार या डोंगरावर वास्तव्य करणारा ‘झोटिंगबाबा’ साधू गावाचे संरक्षण करतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा होती. त्याच्यानंतर या डोंगरात ‘झटुंब्या’ देवाचे मंदिर बांधले. म्हणून या डोंगराला झटुंब्याचा (झोटिंग्याचा) डोंगर म्हटले गेले. त्यावरून गावाचे नाव ‘झोडगे’ पडले असावे. तर या झोडगे गावात अगदी रस्त्यालगत डाव्या बाजूला अनपेक्षितपणे एक छोटेखानी प्राचीन मंदिर आपल्याला दिसते. ध्यानीमनी नसताना हे ‘शिल्परत्न’ पुढे ठाकल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो! विचारांचा कल्लोळ उसळतो. त्यातला पहिला विचार म्हणजे, असे मंदिर असणारे हे ‘खेडेगाव’ आज ‘अतिसामान्य’ वाटले तरी त्या काळी निश्चितच राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवरचे ‘वैभवशाली नगर’ असेल. कालौघात नियतीने त्याला असेही दिवस दाखवावेत या सत्याने खिन्न झालो तरी ‘माणकेश्वर’ नाव मिळालेले मंदिर त्या नावाला ‘अनुरूप’ आहे की नाही हे जाणून घ्यायला आपण उत्सुकतेने गाडीतून खाली उतरतो!
क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोंदेश्वरपेक्षा हे मंदिर लहान असले तरी सौंदर्यात मात्र ते तसूभरही उणे नाही. घडणीच्या काळा बेसाल्ट पाषाणाला पिवळसर छटा असल्याने मावळतीच्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात त्यावरच्या शिल्पकामाचे ‘लावण्य’ झळाळून निघते! तेव्हा त्याला असे ‘रत्नजडीत’ नामाभिधान देणाऱयाच्या रसिकतेसमोर आपण नतमस्तक होतो! ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केलेल्या या मंदिराची डागडुजी केलेली जाणवते. मंदिरासमोर वेगळय़ा चौथऱयावर नंदीची सुबक, अलंकृत मूर्ती आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिर मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, तीन गर्भगृह असे विभागलेले आहे. मंदिराचे अंतरंग यक्ष, किन्नर, गंधर्व, विविध वाद्यं वाजवणाऱया नर्तकी, अप्सरा यांच्या मोहक शिल्पांनी तसेच शुभचिन्हांच्या नक्षीकामाने सुशोभित केले आहे. मंदिराचे बाह्यस्वरूप अधिक कलात्मक रीतीने सजलेले आहे. मूर्तीत शिवप्रतिमेव्यतिरिक्त चामुंडा, अष्टदिक्पाल, भैरव, विष्णू, कीर्तिमुख इ. आढळतात. शिल्पकारांनी मंदिराच्या पायापासून शिखरापर्यंत केलेले ‘जिवंत’ खोदकाम आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते. वादिनी, नर्तकी, पायात रुतलेला काटा काढून घेणारी, अंबाडा सावरणारी, केस मोकळे सोडलेली, शंख वाजवणारी, शृंगारमग्न अशा विविध रूपांतील रेखीव ‘सुरसुंदरीं’नी नटलेल्या या अनोख्या मंदिराच्या दर्शनाने आपण मुग्ध होतो.
मराठी विश्वकोश (खंड 14 यादव घराणे) यातील माहितीनुसार तेराव्या शतकातील यादवांचा मंत्री हेमाद्री (हेमाडपंत) याने चुन्याचा वापर नसलेली विशिष्ट स्थापत्य पद्धती प्रचारात आणून अनेक नवी मंदिरे बांधली व जुन्यांचा जीर्णोद्धारही केला. त्याच्या नावावरून तत्कालीन मंदिरांना ‘हेमाडपंती’ ही संज्ञा रूढ झाली असावी, परंतु अशा पद्धतीने बांधलेल्या मंदिरांतील काही मंदिरे हेमाद्रीपूर्वी शंभर-सवाशे वर्षे आधी बांधल्याचेही पुरावे मिळतात. त्यामुळे या सर्व मंदिरांना ‘हेमाडपंती’ म्हणणे कालदृष्टय़ा चुकीचे ठरेल. यासाठी या मंदिरांना ‘यादव मंदिरे’ म्हणणे संयुक्तिक होईल असे म्हटले आहे. यामुळे 12 व्या शतकातील सिन्नरचे ‘गोंदेश्वर’ आणि साधारण 12 व्या शतकातीलच झोडगे येथील ‘माणकेश्वर’ ही मंदिरे खान्देशातील ‘यादव’ मंदिरांची उदाहरणे ठरतात.
यादव मंदिरे भूमीज शैलीतील असून दगडांना खाचा पाडून एकावर एक दगड रचून मंदिरांच्या भिंतींची भक्कम बांधणी केलेली दिसते. मंदिराच्या कोनाकृती ठाशीव भिंती छायाप्रकाशाच्या परिणामामुळे भरीव, अधिक उठावदार भासतात. या मंदिर वास्तूंमध्ये स्तंभ, द्वारशाखा, अर्धमंडप, सभामंडप, वितान (छत) आणि शिखर वैशिष्टय़पूर्ण असून स्तंभांचेही विविध प्रकार दिसतात. स्तंभ एकसंध कातलेले व गुळगुळीत केलेले असून उपलब्ध होणाऱया अखंड पाषाणाच्या लांबीनुसार वास्तुशास्त्र्ाज्ञांनी मंदिराचे प्रमाण ठरवले असावे असे दिसते. स्तंभ चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असून स्तंभपाद चौरस आकाराचा आढळतो.
यादव मंदिरांची शिखरे इतर मंदिरांपेक्षा वेगळी आणि लक्षणीय असतात. शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृती (उरुशृंगे) खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसविल्या असून या प्रतिकृती स्थिर आणि चिकटून राहाव्यात म्हणून बाजूला सहाय्यक नक्षीकाम केलेल्या शिळा बसविलेल्या असतात. लहान होत जाणारी सर्व शिखरे एकरूप होत सर्वांगीण सुरेख एकात्म शिखराचा आभास निर्माण होऊन एक मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते व कारंज्याची जणू लय त्यात प्रत्ययास येते!
‘दुर्लक्षित’ राहिलेल्या, मंदिराबद्दल जुजबी माहिती देणाऱया साध्या फलकाचीदेखील अनुपस्थिती असणाऱया या ‘माणकेश्वर’ मंदिरासारखीच दारुण अवस्था खान्देश परिसरातील इतर प्राचीन मंदिरांचीसुद्धा आहे. चाळीसगावजवळच्या ‘वाघळी’चे मुधाईदेवी मंदिर, पाटणादेवी, पितळखोरे लेणी, धुळे जिह्यातील साक्री तालुक्यातील ‘बलसाणे’ येथील शिवमंदिर महाराष्ट्रातील जनतेच्या सुद्धा खिजगणतीत नाहीत. निदान राज्यस्तरावर तरी या खजिन्याची ओळख करून घ्यायला हवी. त्यांच्या ऐश्वर्याची पर्यटन क्षेत्राला भुरळ पाडण्यासाठी, स्थानिक पातळीवर जनजागृती करण्याच्या बरोबरीने खान्देशातील पाण्याच्या दुर्भिक्षाचा भेडसावणारा प्रश्न अगोदर सोडवावा लागेल. ते जेव्हा घडेल तो सुदिन!
z [email protected]





























































