‘तरु’णाई – सुरभित सप्तपर्णी

>> डॉ. सरिता विनय भावे

सुगंधाने मुसमुसलेल्या ‘सप्तपर्णी’ला थोडेसे विषारी ठेवून ‘सर्व’ प्रकारच्या प्राण्यांपासून खुबीने त्याला दूर करून जगन्नियंत्याने याचे संरक्षणच केले आहे आणि स्वतःच्या अमर्याद शक्ती, दयाबुद्धी आणि चातुर्याची आपल्याला प्रचीतीच दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात वातावरण कुंद करून टाकणारी, साखरेत घोळलेल्या लवंग-दालचिनीसारखा हवाहवासा वाटणारा घमघमाट पसरवणारी झाडे अंगोपांगी बहरून आलेली दिसतात. हीच ती सप्तपर्णी. ‘आला थंडीचा महिना…’ याची जणू दवंडी पिटवत, हवामानात बदल झाल्याची जाणीव करून देणारी…या वृक्षाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे याची फांद्या, पाने, फुले सगळीच वलयाकार, भूमितीय रीतीने येतात. त्यामुळे ही झाडे उंच वाढली तरी ‘गोलमटोल’ही वाटतात! ‘सप्तपर्णी’ या संस्कृत शब्दावरून एका गुच्छात 7 पाने (साधारणतः 6 ते 10) असतील हे लक्षात येते. मराठीत सातवीण, हिंदीत छितवन, बंगालीत छातिम अशीही याची नावे आहेत. कुठलाही भाग चिरला असता दुधासारखा पांढरा चीक बाहेर पडणाऱया या झाडाची पाने आणि फुले जरा विषारी असल्याने प्राणी याला तोंड लावत नाहीत म्हणून इंग्रजीत याला ‘डेव्हिल्स ट्री’ असेही संबोधतात. याच्या वनस्पतीशास्त्रातील Alstonia scholari या नावातील scholaris (school, scholar) शब्दाचा उगम, या झाडाच्या लाकडाचा उपयोग प्रामुख्याने लहान मुलांच्या शाळेच्या पाटय़ा, वर्गातील शिकवण्याचे फळे यांच्या चौकटी बनवण्यासाठी व बसायची बाके तयार करण्यासाठी केला जातो, यावरून झाला आहे.

प. बंगाल राज्याचा हा ‘राज्यवृक्ष’ असून येथील ‘विश्वभारती’ विद्यापीठात पदवीदान समारंभाच्या वेळी शिक्षक आणि विद्यार्थी यांचा या झाडाच्या पानांचा गुच्छ देऊन, गौरव करण्याची प्रथा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केली होती. आजच्या काळात मात्र झाडांचे अवाजवी नुकसान टाळण्यासाठी, प्राचीन परंपरेचे प्रतीक म्हणून फक्त एकच पान देण्यात येते. वलयाकारात झालेली झाडाची पाने लांब, मऊ, टोकाला किंचित वाटोळी, चकचकीत, वर गर्दहिरवी आणि खाली राखाडी असतात. नुसतीच हिरवीकंच पाने असलेले डेरेदार झाडही नयनमनोहर वाटते. फुलेसुद्धा पानांच्या बेचक्यात चक्राकार पद्धतीनेच येतात. फुले पाच पाकळ्यांची, छोटीशी, नाजूक, हिरवट पांढरी, नरसाळय़ाच्या आकाराची असतात (रातराणीसारख्या दिसणाऱया फुलांच्या सुगंधाचा पोतही तिच्यासारखाच उग्र असतो). एकेकटे फूल फारसे सुवासिक नसले तरी पूर्ण बहरून आलेल्या झाडाच्या मधाळ सौरभाने मात्र परिसर न्हाऊन निघतो. जास्त ‘रसिक’ मंडळींना तर ‘झिंग’ल्यासारखेही वाटू शकते. फुले मधुरसाने ओतप्रोत भरलेली असल्याने विविध प्रकारची फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या त्याभोवती सतत गुंजारव करत असतात. फुलांचा बहर संपल्यावर अनेक बारीक, लांब, हिरव्या दोऱयांसारखे लोंबणारे शेंगांचे झुपकेही विलोभनीय दिसतात. शेंगांमध्ये असलेल्या नाजूक बीच्या दोन्ही बाजूला लांब, रेशमासारख्या तंतूंचा पुंजका असतो. शेंगा परिपक्व होऊन फुटल्यावर बिया बाहेर येतात तेव्हा वाऱयाबरोबर वाहत नेण्यासाठी या तंतूंचा पंखांसारखा उपयोग होतो.

सप्तपर्णीत कोयनेलसारखे गुणधर्म असल्याने हिवतापात याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. याच्या सदाहरित, गर्द, गच्च पर्णसंभारामुळे पर्यावरण संरक्षक, छाया देणारा, शोभेचा वृक्ष म्हणूनही महानगरांतील मुख्य रहदारीच्या रस्त्यांजवळ आणि बागांमध्ये याची लागवड केली जाते. पण श्वसन, दमा यांचा त्रास असणाऱया व्यक्ती या झाडाच्या संपर्कात जास्त वेळ आल्यास त्यांचा आजार बळावू शकतो, यासाठी या झाडांची जोपासना वस्तीपासून दूर करण्याचा सल्ला दिला जातो. शेवटी काय ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हेच खरे! सुगंधाने मुसमुसलेल्या ‘सप्तपर्णी’ला थोडेसे विषारी ठेवून ‘सर्व’ प्रकारच्या प्राण्यांपासून खुबीने त्याला दूर करून जगन्नियंत्याने याचे संरक्षणच केले आहे आणि स्वतःच्या अमर्याद शक्ती, दयाबुद्धी आणि चातुर्याची आपल्याला प्रचीतीच दिली आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या