निरामय – उपवास आरोग्यासाठी असावा

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

नवरात्रीत अनेक जण विविध प्रकारे उपवास करतात. सर्वांच्या मनातील भावना एक असली तरी उपवास करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. अनेक जण कडक उपवास तर काही जण फराळ करून उपवास करतात, पण सध्याच्या गडबडीच्या आयुष्यात अनेकांना उपवास करून त्रास होतो, आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. उपवास मुळात करावा हा चांगल्या आरोग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी. मग उपवास करून जर आरोग्यात सुधारणा होण्याऐवजी त्रास झाला तर हे अयोग्य आहे.

मग आपण कोणती काळजी घ्यावी आणि आपले उपवास आरोग्यदायी कसे करावेत याबाबत आपण बघूया.
– उपवासाच्या आदल्या दवशी समतोल, पण हलका आहार खावा. दुसऱया दिवशी उपवास आहे म्हणून जास्त किंवा उशिरा जेवणे अयोग्य आहे.
– सकाळी उठल्यावर पहिल्यांदा एक ग्लास पाणी प्यावे आणि जरा वेळाने एखादे फळ व सुका मेवा खाऊन दिवसाची सुरुवात करावी.
– दर दोन ते तीन तासांनी काहीतरी हलके खावे.
– न्याहारी करताना व्यवस्थित आहार घ्यावा. दिवसाचा पहिला आहार पौष्टिक असावा. त्यामुळे पूर्ण दिवस उत्साह टिपून राहतो.
– जेवणात साबुदाणा खिचडी, वडे, दाण्याचे पूट यांचा समावेश न करता भाकरी, भाजी व दही असा हलका आणि सात्त्विक आहार खावा.
– मधल्या वेळेस दही, ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत, फळ असा आहार असावा. हे पदार्थ पचायला हलके असतात आणि ऊर्जाही देतात. याबरोबर मूठभर सुका मेवाही खावा.
– जेवणांमध्ये उपवासाला चालणाऱया भाज्या जसे भेंडी, भोपळा, काकडी, सुरण, रताळे, पंद यांचा समावेश करावा. बरोबर राजगिरा, शिंगाडा भाकरी किंवा वरी तांदूळ खावेत.
– उपवासात घरच्या घरी केलेले सोपे, पचायला हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत. बाहेरचे तळलेले वेफर्स, चिवडा, उपवासाची बिस्किटे असे खाणे टाळावे.
अशा प्रकारे जर उपवास केला तर तो नक्कीच आरोग्यदायी ठरतो आणि शरीराला त्रास कमीत कमी होतो. नऊ दिवस उपवास करायचा असल्यामुळे आहाराची अधिक काळजी घेणे गरजेचे असते.

आपली प्रतिक्रिया द्या