हरवलेलं संगीत (भाग 9) – आम्ही लता पंथीय

900

>>शिरीष कणेकर

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते शिरीष कणेकर यांच्या ‘कणेकरी’ या एकपात्रीची ऑडिओ कॅसेट प्रकाशित होत असताना. सोबत कणेकर.

‘माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तुमच्या ओळखीत कोणी आहे का हो?’ मी लता मंगेशकरला टेलिफोनवरून विचारलं. (मेहेरबानी करून तिचा टेलिफोन नंबर मागू नका. तिला या वयात छळण्याचे मार्ग शोधत असाल तर गोष्ट वेगळी. ‘आम्हाला किनई तुमची गाणी खूप आवडतात. आम्ही नेहमी ऐकतो. माझे मिस्टर पण ऐकतात’ हे ऐकण्यासाठी तिला उठून फोन घ्यायला लावणं ही शुद्ध छळवणूक आहे. माझ्या ‘यादों की बारात’च्या प्रकाशनाला ती आली होती तेव्हा रवींद्र नाटय़ मंदिरच्या पायऱ्यांवर तिला एक अपरिचित बाई म्हणाली, ‘मला तुमची गाणी आवडतात.’ मी उत्स्फूर्तपणे बोलून गेलो, ‘अहो, काय सांगताय काय? आम्हाला कोणाला नाही बाबा आवडत.’ लता हसत सुटली.)

तिच्या 87 व्या वाढदिवशी मी तिच्या 87 अतिनिवडक हिंदी चित्रपट गीतांची सूची छापली होती. त्यावर कोणा एका महाभागानं प्रतिक्रिया नोंदवताना परखडपणे लिहिले, ‘हा म्हातारा कोपऱ्यात बसतो आणि कोणालाही माहीत नसलेली फालतू गाणी उत्तम म्हणून वाचकांच्या माथी मारतो. मुळात याला एक साधी गोष्ट माहीत नाही की, लता ही द्वंद्वगीतांतच चांगली वाटते…’
खरंच मला माहीत नव्हतं हो. आमचा पिंड येडचापासारखा तिच्या एकलगीतांवर पोसला. हे ज्ञान दस्तुरखुद्द लताला देऊन मी तिला समृद्ध केले. ती हसत का सुटली कोण जाणे.

माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं तुमच्या ओळखीत कोणी आहे का हो, या माझ्या प्रश्नावर ती पुन्हा एकदा खळखळून हसली. ‘मैं रंगीला प्यार का राही’मध्ये ती अशीच हसते. मी तिला याची आठवण करून दिली व ते द्वंद्वगीत असल्यानं ती चांगली गायल्येय हेही तिला सांगितले. जाणकारांच्या मताचा आदर करायला हवा. लताशी झालेलं भांडण मिटलं तेव्हा रफी उत्साहानं रटरटत म्हणाला होता, ‘अब गाने मे कुछ मजा आएगा’. द्वंद्वगीतच ना?…

लताचा उल्लेख कायम एकेरी व लता असाच करायचा. मग ती नव्वद वर्षांची का असेना. आवाजाला काय वय असतं? देवालादेखील आपण अरेतुरे करतो मग लताला नको करायला? शिवाजी महाराजांपेक्षा शिवाजी जवळचा व शिवाजीपेक्षा शिवबा जवळचा. जवळच्या माणसांना दूर लोटण्याचा करंटेपणा करायचा असतो का? ‘भारतरत्न’ लतादीदी मंगेशकरपेक्षा सुटसुटीत लता बेस्ट. तोंडावर अशी आगाऊ सलगी दाखवणे शक्य नाही, पण पाठीवर काय प्रॉब्लेम आहे? लताहून पाच-सहा वर्षे मोठय़ा असलेल्या दिलीपकुमारला आम्ही अरे जारेच करतो व करीत राहणार. लता एकदा गमतीत म्हणाली होती, ‘मला एका गोष्टीची खंत आहे. मी दिलीपकुमारसाठी कधीच गाऊ शकले नाही.’

लता आता थकल्येय. ती शक्यतो घरातून बाहेर पडत नाही. मीना मंगेशकरांनी लिहिलेल्या तिच्यावरच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला ती गेली नव्हती. सिनेमातल्या गाण्यांचं रेकॉर्डिंग थांबल्यात जमा आहे. मेंदू मात्र पूर्वीइतकाच तल्लख आहे. कुठल्याही गाण्यातलं काहीही विचारा, उत्तर तिच्या जिभेच्या टोकावर असतं. (शारीरिक व्याधींनी पिडलेल्या आम्हा सगळय़ांचेच मेंदू इतके कुशाग्र कसे?) ‘ऐ दिलरूबा’ (रूस्तम सोहराब) गाताना संगीतकार सज्जादनं केलेल्या बारीकसारीक सूचना तिला तंतोतंत आठवतायत. जणू ती आजच रेकॉर्ड करून आल्येय.

‘सज्जाद आणि नौशाद हे दोनच संगीतकार असे होते की, ज्यांना त्यांच्या रचनेतला एक सूरही बदललेला चालत नसे. ते सांगतील तसंच्या तसं गायचं. बाकी अनेक संगीतकारांकडे मी लुडबुड केल्येय. ती त्यांनी मोठय़ा मनानं चालवून घेतली. चाल अर्थातच त्यांची होती. मी त्यात स्वतःचे आलाप घालून माझी हौस भागवून घ्यायची. राज कपूर तर तेवढय़ासाठी मला बोलावून घ्यायचा.’

‘हे सगळं तुम्ही लिहीत का नाही?’ मी विचारलं, ‘म्हणजे तुम्ही सांगा, आम्ही लिहू.’
‘एकदा वाटतं लिहावं, एकदा वाटतं लोक म्हणतील की, ते संगीतकार आज हयात नाहीत. याचाही फायदा घेऊन त्याचं श्रेय स्वतःकडे घेत्येय. नको रे बाबा.’ ‘मेरा साया’मधील मदन मोहनच्या ‘तू जहाँ जहाँ चलेगा’ या शीर्षकगीतात काही तरी चुकत होतं. दिग्दर्शक राज खोसलाला खटकत होतं. मी माझे वडील गायचे त्या नंद रागातील एक जागा सुचवली व गाणं तयार झालं. मदनभैय्याला हे बहुधा रुचलं नाही, पण आमचे अतिशय जिव्हाळय़ाचे संबंध असल्याने तो काही बोलला नाही. नवीन पिढीला कोण मदन मोहन व कोण अनिल विश्वास, कोण सलील चौधरी व कोण नौशाद, कोण शंकर-जयकिशन व कोण सी. रामचंद्र, कोण सज्जाद व कोण विनोद! यांच्या आठवणी कौतुकानं वाचणारे वाचक तरी आता कितीशे राहिलेत? सज्जादची ‘सैया’मधली गाणी सुरेख होती असं मी म्हटल्यानं समोरच्या पुढे काय उजेड पडणार आहे? ‘काली काली रात, दिल बडा सताये’ तुम्ही ऐकलंय ना?…’

‘तुझे दिल दिया ये क्या किया मैने हेदेखील ऐकलंय’ मी उमाळय़ानं म्हणालो व दुर्मिळ, अप्रतिम गाण्यांची जंत्री माझ्या मुखातून येईल या भीतीनं तोंड बंद केलं. लतापुढे आपलं तोंड बंद होणारच. तसे ते ठेवणं शहाणपणाचं. तुम्ही कमल बारोट असाल तर गोष्ट वेगळी. तुम्ही लताबरोबर बिनदिक्कत द्वंद्वगीतही गाल. करण दिवाणही गायला होता म्हणा. एवढा अत्याचार हसत हसत (व गात गात) सहन केल्यावर तिला माझ्याशी बोलणं तुलनात्मकदृष्टय़ा सुसह्य वाटत असेल का? की मी पण गायला लागेन अशी भीती वाटत असेल? अब सुनिये लता मंगेशकर और शिरीश कणेकर को फिल्म…

लताला या कल्पनेवर हसू लोटलं. ती माझ्यासाठी एवढी गाणी गायल्येय, मग मी तिच्यासाठी दोन विनोद करून तिला हसवू शकत नाही?
आता बऱयाच दिवसांच्या ‘गॅप’नंतर तिला भेटायला जायचंय. अब बस में जाना मेरे बसमें नहीं. मी टॅक्सीत बसून गोड आवाज काढून म्हणणार, ‘चलो भैय्या, ‘कृष्ण कुंज’, पेडर रोड…’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या