मना मना, दगड बन!

>> शिरीष कणेकर

लोक पण विचित्र असतात, नाही का?
सगळी खेळणी सोडून भावनांशी खेळतात
आमच्या नात्यात एक वृद्ध स्त्री होती. तिची आई गेली. म्हणजे ती वृद्ध स्त्री सत्तरीची असेल तर तिची आई नव्वदीची असणार. पिकलं पान गळून पडलं. दुःखावेग अनावर होऊन त्याला शब्दरूप देत ती वृद्धा मला म्हणाली, ‘तुझं बरं आहे रे, तू नशीबवान. तुला आई आठवत पण नाही, पण आम्ही काय करायचं? इतकी वर्षे आईची माया लाभली. आता आम्ही काय करायचं? कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? उरलेलं आयुष्य आम्ही कसं काढायचं? आईचं असणं आम्ही गृहीत धरलं होतं. मातृवियोगाचं हे दुःख आम्ही कसं सोसायचं?’
मी अवाक् होऊन ऐकत होतो. माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी नशीबवान होतो कारण माझी आई मला आठवतच नव्हती हे मला माहीतच नव्हतं. आई काय चीज आहे मला माहीतच नव्हतं हे भाग्याचं लक्षण होतं तर! सत्तराव्या वर्षी आई जाणं मोठा आघात होता.

माझं तोंड कडू कडू झालं. ती बाई ही रेकॉर्ड वारंवार वाजवत राहिली आणि माझं मन आतल्या आत आक्रंदन करीत राहिलं. संस्कार, पण कोणाचे संस्कार? आई तर नव्हतीच. वडीलही तसे लवकरच गेले. माझ्या लग्नात दोघंही नव्हते. त्यांचे फोटो लावले होते. माझी वारंवार तिकडे नजर जात होती. होमाचा धूर डोळय़ांत जातोय असं मी भासवत होतो. रिसेप्शनला झाडात लाइट सोडले होते. ते पाहून तीच वृद्धा म्हणाली, ‘झाडांना आगी लावल्यात बघा.’ तिला बिचारीला याहून वाईट बोलायला काही सुचलंच नाही त्याला ती काय करणार! त्यातून आई गेल्यानं ती सैरभैर झाली असणार.

अण्णा गेल्यावर बरेच दिवस मी त्यांच्या ‘ब्रिटिश कौन्सिल’ लायब्ररीत गेलो नाही. शेवटी गेलो. सभासदत्वाचं कार्ड बघून तिथली ग्रंथपाल माता म्हणाली, ‘‘हे कार्ड तर एक्सपायर झालंय.’’ माझ्याबरोबर आलेला मित्र पटकन बोलून गेला, ‘कार्डच काय, ज्याचं कार्ड होतं तोही एक्सपायर झालाय.’
ग्रंथपाल बाईला कसं ‘रिऍक्ट’ व्हावं कळेना. माझा मित्र स्वतःच्या विनोदावर हसत होता. आपल्याला कसं सुचलं यावरच तो खूश दिसत होता. मी हसण्याचा प्रयत्न केला, पण डोळय़ांत जमा झालेल्या पाण्यामुळे मी माझा हसण्याचा प्रयत्न सोडून दिला. आजही तो मित्र भेटला की, मला तो प्रसंग आठवतो व अण्णांना जाऊन बावन्न वर्षे झाल्यावरही मी हसू शकत नाही. ‘‘तुला विनोदबुद्धीच नाही बुवा’’ तो म्हणतो. मी डोळे लपवतो.

त्या काळी आम्ही ‘सेंट जॉर्जेस’ हॉस्पिटलच्या आवारात राहत होतो. माझे वडील मुंबईचे ‘प्रेसिडेन्सी सर्जन’ होते. आगगाडीसारखे लांबच लांब घर होतं. मी चौथीत असेन. मागे सर्वंटस् क्वार्टर्समध्ये माझा मित्र चंद्रू त्याच्या कुटुंबासमवेत एका खोलीत राहत होता.
आम्ही जेवत होतो. जेवता जेवता मी सहज म्हणालो, ‘‘आपण आणलेले फटाके मी चंद्रूला दाखवले. मी त्याला विचारलं, तुम्ही केवढय़ाचे आणलेत?’’
अण्णा एकदम भडकून उठले. ते असे कधीच चिडायचे नाहीत. आता तर त्यांच्या चिडण्याचं कारणही मला कळत नव्हतं.
‘‘काडीची अक्कल नाही.’’ ते गरजले, ‘कुणाला काय विचारावं एवढीही समज असू नये?’ त्यांचे शब्द गोठले पण ते धुमसतच होते. ‘‘काय झालं’’, असं वास्तविक मला विचारायचं होतं, पण माझी हिंमतच झाली नाही. त्या काळी बाप भडकला की, मुलं भेदरलेल्या उंदरासारखी गप्प बसत.

पुढे कितीतरी वर्षांनी मला अण्णांच्या उद्रेकाचं कारण कळलं. त्यांना म्हणायचं होतं, ‘‘चंद्रूला विचारतोस केवढय़ाचे फटाके आणले म्हणून? गरीब माणसं असे केवढय़ाचे फटाके आणत असतात वाटतं? एक लवंगीची माळ आणली तर ती सोडवून पुरवून पुरवून त्यातला एकेक लवंगी उडवतात बिचारे. देवदयेनं तुमचं चांगलं चाललंय. तुम्हाला कशाची ददात नाही. तुम्ही पिशवीभर फटाके आरामात आणता. संपले तर पुन्हा आणता. आनंद आहे. तुम्ही देवाचे लाडके आहात, पण जे नाहीत ते कसे जगतात हे तुम्हाला कळायलाही नको?’ चंद्रूच्या भावनांशी मी किती सहजपणे खेळलो होतो. गरीबांनाही भावना असतात?
लोक पण विचित्र असतात, नाही का?
सगळी खेळणी सोडून भावनांशी खेळतात

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या