अनुकंपा

1681

>> शिरीष कणेकर

माझाच विश्वास बसत नाही की ‘सोनी’ टी.व्ही.वर चालू असलेली ‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ ही मालिका मी सहसा चुकवत नाही. वास्तविक मी बाबा-बुवा करणारा माणूस नाही. मी पोथ्या-पुराणात रमत नाही, देव-देव करत नाही, जप-जाप्य ठावे नाही, स्तोत्र-मंत्र म्हणत नाही. शेगावशी, अक्कलकोटशी, शिर्डी संस्थानाशी माझी बांधिलकी नाही. एखादा माणूस संत आहे व त्याच्यात तुमचं दुःखहरण करण्याची; किंबहुना जगाचा उद्धार करण्याची दैवी शक्ती आहे, या भाकडकथांना माझ्याकडे स्थान नाही. तो चमत्कार करू शकणारा देव झाला? (खुद्द देवाच्या अस्तित्वाविषयी शंका आहे ती वेगळीच.) एखादा माणूस चांगला, सज्जन, सन्मार्गी, निर्व्यसनी, पापभिरू, व परोपकारी असला की लगेच त्याला देव बनवणार का? परोपकारी सोडून बाकी सगळं मीदेखील आहे. तर मग मला गेला बाजार  ‘अर्धदेव’ का म्हणत नाही..?

मी एक चमत्काराचा, दैवी अनुभूतीचा किस्सा वाचला होता. साईबाबांचा निवास असलेल्या द्वारकामाईत एक दिवशी एक पाल भिंतीवर (जिथं कालनिर्णय असावे असं म्हणतात.) तुरूतुरू इकडून तिकडे धावत होती. हे नवीनच होतं. भक्तांनी बाबांना विचारले, ‘‘ही पाल अशी का धावत्येय?’’ (बाबांना हे विचारणारेही धन्यच.) ते म्हणाले, ‘‘तिची बहीण परगावहून तिला भेटायला येणार आहे म्हणून ती आनंदात आहे.’’

थोडय़ा वेळात बाबांचे एक भक्त सहकुटुंब बाबांच्या दर्शनाला आले. त्यांच्या सामानातून एक पाल उडी मारून बाहेर पडली व ती धावतच भिंतीवरल्या बहिणीला भेटायला गेली. त्यांची गळाभेट झाली व त्या निघून गेल्या.

भक्तांना चमत्काराचा प्रत्यय आला. पण आपली एक बहीण परगावी आहे व ती आपल्याला आज भेटायला येणार आहे हे त्या यःकश्चित पालीला कसं कळलं? तिच्यात दैवी अंश होता? हा किस्सा कोणी नाकारल्याचं, खोडून काढल्याचं वाचण्यात किंवा ऐकण्यात नाही. कारण तसं करणं म्हणजे ‘ब्लास्फमी’ (ईश्वर निंदा) या सदरात येतं. ती कशाला कोण करेल व ईश्वरी कोप ओढवून घेईल?

या माझ्या अश्रद्ध, नफ्फड पार्श्वभूमीवर मी या संत मालिकेत एवढा गुंतून का पडतो? सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे यातले साईबाबा हे पात्र अगदी असायला हवे तसे आहे. शांत व सौम्य. त्याच्या चेहऱयावर एक सुरेख मार्दव आहे, दिसेल न दिसेल असं अस्फुट मंदस्मित आहे आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे डोळय़ात अपार करुणा आहे. या सगळय़ांनी मला भुरळ घातली.

माणसानं देवासारखं वागावं ही अपेक्षा नाही. ते शक्य नाही. पण माणसानं माणसासारखं वागावं ही अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे? मालिका ही अपेक्षा पूर्ण करते. साईबाबांना माणसांविषयी प्रेम आहे, कणव आहे, त्यांच्या उपयोगी पडण्याची मनापासून तळमळ आहे. हे माझ्या मनाला भावते. घरात अन्नाचा दाणा नसलेल्या गरीब माणसाचं घर जादूनं धान्य, भाज्या व फळे यांनी भरून टाकणे हे माझ्या प्रकृतीला मानवत नसेल पण कोणीही उपाशी झोपू नये यासाठी जीव पाखडणारा पवित्र आत्मा माझ्या मनाला भिडतो. कोणा एकानं विस्तव हातात घेतला तर त्याला काही न होणे व त्याच्या ऐवजी साईबाबांच्या हातावर फोड येणे हे सायन्सला मान्य नाही; असं वास्तवात घडत नसतं. नसेना का, पण दुसऱयाची पीडा आपल्यावर घेणं हे तर सायन्सला मान्य आहे ना? यानं मी भारावतो. ही वृत्ती समाजात अभावानेच पाहायला मिळते. बघताना अनेकदा माझे डोळे पाणावतात. चांगली, प्रातःस्मरणीय माणसं एवढी कमी झालीत का हो? अनुकंपा ही भावना नाहीशी होत चालल्येय का? ती यापुढे मालिकेतूनच बघायला मिळणार का..?

माणूस म्हणून जगण्यास पात्र ठरण्यासाठी अनुकंपा असणे गरजेचं आहे. एरवी माणसात व श्वापदात काय फरक राहिला? तो  तसा राहू नये यासाठी माणसंच यशस्वी प्रयत्न करताना आढळतात. अनुकंपा हा शब्द यापुढे शब्दकोषात शोधावा लागेल.

अनुकंपेची ही उद्बोधक व मन हेलावणारी कहाणी वाचा. परदेशातील गोष्ट आहे. एक खूप खूप गरीब मुलगा होता. एका दुकानाच्या शो-केसमध्ये ठेवलेले बूट त्याच्या मनात भरले होते. विकत घेण्याचा प्रश्नच नव्हता. तो तासन् तास बाहेर उभा राहून त्या बुटांकडे एकटक बघत राहायचा. एक बाई त्याला नेहमी बघायची. अखेर ती त्याला आत घेऊन गेली व त्याला मोज्यांचे सहा जोड घेऊन देत तिनं विचारले, ‘‘बाळा, तुझ्याकडे बूट आहेत ना?’’ त्यानं नकारार्थी मान हलवली.

‘‘तुला कुठले बूट आवडतात ते घे.’’ ती म्हणाली.

त्याचे डोळे चमकले. त्याचा चेहरा उजळला. त्यानं ते शो-केसमधले त्याला आवडलेले बूट घेतले. मग सद्गदित होऊन त्यानं त्या अपरिचित उपकारकर्तीला विचारले, ‘‘कोण आहात तुम्ही? आर यू मिसेस गॉड?’’

त्याचा प्रश्न अगदी रास्त होता. कोण कोणासाठी एवढं करतो? देवच करू शकतो. ही तर बाई आहे. म्हणजे ती मिसेस गॉडच असणार.

डोळय़ांच्या कडा चुरचुरल्या ना? चुरचुरायलाच हव्यात. माझी देवापाशी एकच मागणी आहे. देवा, माझ्या मनात दुसऱयाविषयी अनुकंपा निर्माण कर. बस्स, एवढंच..!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या