अख्खा संघच बदला!

>> शिरीष कणेकर

माझा जाड चष्मेवाला मित्र कोपऱयात अंगाची मुटकळी करून शांत बसला होता. त्याचे डोळे मिटलेले होते. उद्योगपती एस. पी. गोदरेज सभेत मंचावर असाच डोळे मिटून बसायचा. तो जागा आहे की झोपलाय हेच कळायचं नाही. त्यालाही व आपल्यालाही, पण तो उद्योगपती होता. तो काहीही करेल. माझा जाड चष्मेवाला मित्र नाना उद्योग करून ठेवायचा, पण तो नुसताच त्याच्या बायकोचा पती होता. पण एवढा माजोरडा माणूस एवढा बापुडवाणा कशानं झाला होता? आज स्वयंपाकघरातून येणाऱया खमंग वासांकडेही त्याचं लक्ष नव्हतं.

‘‘काय झालं रे?’’ मनातील आनंद आवाजात डोकावू नये याची खबरदारी घेत मी विचारलं. त्याची वाचा बंद होणं हे मला न् माझ्यासारख्या अनेकांना वरदान होतं. म्हणजे यापुढे त्याला सहन करणं शक्य होतं. वाघ साबुदाण्याची खिचडी खात होता.

‘‘देशात जे काय चाललंय त्यानं माझी मनस्तापाची सीमा ओलांडली आहे. मी अण्णा हजारेंप्रमाणे बोलणंच सोडण्याचा विचार करतोय.’’ जाड चष्मेवाला मित्र विषण्णपणे म्हणाला.

‘फारच सुज्ञ विचार आहे. शंकाच नाही’ मी म्हणालो, ‘‘मागे तू शेजारणीला गजरा आणून देणार नाही असं म्हणालास, तेव्हाही तुझ्या उदात्त विचारांचे मी असेच स्वागत केले होते. पण असे कळले की, कालांतरानं तू गजऱयांचा पुरवठा पुन्हा चालू केलास. मधल्या गॅपची भरपाई करण्यासाठी आता तू गजऱयाच्या जोडीनं चाफ्याची फुलंही देत असतोस असे कानावर आले. असं काही तुझ्या मौनाच्या बाबतीत होऊ नये ही तळमळ. नाहीतर तू जीभ छाटून घेतोस का?’’
‘‘हे असं अघोरी तुझ्याच्यानं बोलवतंच कसं? मी एकदा सांगितलं की, नाही बोलणार तर नाही बोलणार. गजरा देणार तर देणार. जोडीला चाफा देणार तर देणार. मला निश्चयाचा महामेरू म्हणतात. अजून मी बोलणं थांबवलेलं नाही. तर सांगून ठेवतो की दर बुधवारी, शुक्रवारी व रविवारी खिमा पॅटिस, कोलंबीची खिचडी व बोंबलाची भजी वहिनींना माझ्यासाठी तयार ठेवायला सांग. न बोलता मी खाऊ शकतो.’’

‘‘आणखी एखादी अखेरची इच्छा?’’ मी खवचटपणे विचारले.

‘‘अखेरची? साल्या, अखेरची? मी बोलणं बंद करण्याआधीची इच्छा बोलून दाखवली. ही काही शेवटचा श्वास घेण्याआधीची इच्छा नाही. तू माझ्या मरणावरच टपून बसलायस गिधाडा!’’

‘‘बोलणं हा तुझ्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.’’ मी म्हणालो, ‘‘आता तू ते बोलणंच सोडायला निघालायस. एवढं घडलंय काय?’’
‘‘प्रथमच मुद्दय़ावर आलायस’’ स्वयंपाकघरातून येणारे वास घेत माझा जाड चष्मेवाला मित्र म्हणाला (त्यानं घ्राणेंद्रियही बंद करायला हवे), ‘‘अरे, क्रिकेटचं काय चाललंय या सी. के. नायडूच्या देशात?’’

‘‘काय चाललंय?’’ मी जोरात विचारलं, ‘‘गेली दोन वर्षे आपण जाऊ तिथे नुसते जिंकतोच आहोत. न्यूझीलंडला टी-20मध्ये आपण चारीमुंडय़ा चीत केलं. असा भीमपराक्रम कोणी केलाय? त्यानंतर तीन एकदिवसीय मालिका आपण तीन शून्य अशी गमावली असली तरी एवढं छाती पिटून आक्रंदन करण्याचं काय कारण आहे? मग सतत हरणाऱया इतर संघांनी तुझ्या मते आत्मदहनच करायला हवे असेल.’’

‘‘गेल्या कित्येक वर्षांत आपण एकदिवसीय मालिकेत सर्व सामने गमावलेले नाहीत. तुझ्या दृष्टीनं या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला नको का?’’ माझा जाड चष्मेवाला मित्र सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट केल्यागत बोलला. वकीलही तोच व न्यायमूर्तीही तोच. कधी कधी तर फाशी देणारा जल्लादही तोच असायचा. अशा वेळी तो बरोबर दोरखंड बाळगायचा.

‘‘घेतली गंभीर दखल. पुढे?’’

‘‘पुढे काय? संघात अयोग्य व्यक्तींचा भरणा आहे हे कटूसत्य आधी स्वीकारा. मग त्यांना तांदळातील खडय़ांप्रमाणे वेचून संघाबाहेर फेकून द्या. नो दयामाया. संघाच्या कामगिरीचा प्रश्न येतो तेव्हा ‘अग्गोबाई सासूबाई’ या मालिकेतील आसावरीप्रमाणे ‘बबडय़ा-राजा-सोन्या’ करून चालणार नाही. ‘शो फादर नाहीतर श्राद्ध कर’ असा रोखठोक ऍप्रोच हवा.’’

क्रिकेटचा विषय असल्यानं मी इच्छेविरुद्ध त्यात ओढला गेलो. मी विचारलं, ‘‘तुला काय विराट कोहलीला संघातून काढायचंय की काय?’’
‘‘व्हाय नॉट? आय से, व्हाय नॉट? क्लीनिंग अप प्रोसेस शूड स्टार्ट फ्रॉम द टॉप. तीन सामन्यांत त्यानं एकमेव अर्धशतक काढलं.’
‘‘थोडक्यात, तुझ्या मते राहुल सोडून सगळय़ांनाच सोडचिठ्ठी द्यायला पाहिजे तर?’’

‘‘होय, राहुलही गोलंदाजी करतो का बघायला लागेल. स्वतःच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षणही करू शकतो. असे अष्टपैलू खेळाडू आपल्याला हवेत. केदार जाधवला तुम्ही एक ओव्हरही देणार नसाल तर तो त्याचं अष्टपैलुत्व कसं सिद्ध करणार? पुण्यात एवढा आलिशान बंगला बांधणाऱयाला तुम्ही दाबून ठेवता? अन् तान्याच्या नवऱयाचं काय?’’

‘‘कोण, तान्याचा नवरा?’’

‘‘घ्या! कोण तान्याचा नवरा? उमेश यादवची दुसरी काय ओळख आहे? हे प्रवासी जादुगार काय कामाचे?’’

‘‘तू तर कोणालाच सोडायला तयार नाहीस.’’ मी हतबुद्ध होत म्हणालो.

‘‘नाहीच सोडणार.’’ तो ठासून म्हणाला, ‘‘तीन सामन्यांत एकही विकेट घेऊ न शकणाऱया जसप्रीत बुमराहला काय तिथं व्याहीभोजनाला घेऊन गेलेत? शार्दुल ठाकूर व कुलदीप यादव काय धावांची खिरापत वाटण्यासाठी नेलेत? ऋषभ पंतला संघात घेत नाहीत, पण जेव्हा बघावं तेव्हा तो दात काढून हसत असतो. कसलं हसू येतं रे बाबा एवढं तुला?..’’

‘‘ठीक आहे, तुला संघात अकरा जण कोण हवेत ते तरी सांग.’’

‘‘ही घे नावं.’’ माझा जाड चष्मेवाला मित्र तावातावानं म्हणाला, ‘‘शिखर धवन, रोहित शर्मा, शुभमल गिल, सूर्यकांत यादव, अंकित बावणे, कुणाल पंडय़ा, आदित्य तरे, तुषार देशपांडे, अभिमन्यू मिथुन, जयदेव उनाडकर, पीयूष चावला.’’

‘‘तुझ्या संघात राहुलही नाही?’’

‘‘नकोच. त्याच्यावर कोहली, बुमराह यांचे वाईट संस्कार झाले असतील.’’

‘‘ओह, आय सी’’ मीही इंग्लिशवर आलो, ‘‘तू कायमचं मौन धरतोयस हे लाख करतोयस बघ. केव्हा सुरू होतंय तुझं हे मौन? हिंदुस्थानी क्रिकेटसाठी तुझं बोलणं बंद होणं अत्यावश्यक आहे…’’

z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या