शिरीषायन – मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

अनेक लोक (त्यात काही हितचिंतकही मोडतात) मला विचारतात की तुम्हाला सतत मरणाचे डोहाळे का लागलेले असतात? जरा चान्स मिळाला की आवेगानं तुम्ही मृत्यूला कवटाळायला निघाल्याची नाटकं का करता?

नाटकं?

‘हो, कारण पुढल्याच आठवडय़ात तुम्ही खदखदून हसवणारं विनोदी लिहिता. अंताकडे झेपावणारा माणूस हे कसं करू शकतो? ज्याचे नेत्र पैलतीरी लागलेत तो हसतो हसवतो? म्हणून नाटकं!’

त्या त्या वेळी त्या त्या भूमिकेत मी समरस झालेला असतो, हे उत्तर मी त्यांना देत नाही. कारण ते त्यांना पटणार नाही. ते पटवून घेणार नाहीत. प्रत्येक माणूस तुम्हाला त्याच्या चौकटीत बसवू पाहतो. तुम्ही बसलात तर ठीक आणि नाही बसलात तर त्याच्या लेखी तुमच्यात काहीतरी मूलभूत बिघाड असतो. आता मला माझं घर, माझी खोली, माझी खुर्ची प्राणप्रिय आहेत. आमची बिल्डिंग ‘रीडेव्हलपमेंट’ला चाललीय. म्हणजे काही वर्षांसाठी मला इथला गाशा गुंडाळावा लागणार. घर जाणार, खोली जाणार, खुर्ची जाणार. या गोष्टी जाणार असतील तर मीदेखील गेल्यासारखाच नाही का? बिल्डिंग नवीन होऊन तिच्यात परत येईपर्यंत मी या जगात असेन याची काय शाश्वती? नसण्याची शक्यता केव्हाही जास्त. अंपायर बोट वर करण्याआधीच बॅट काखोटीला मारून परत फिरणारा फलंदाज मला जवळचा वाटतो तो याच कारणासाठी. त्या सर्वश्रेष्ठ अंपायरला मला हे सांगायला आवडेल की तुझं बोलावणं येण्याची वाट बघत मी थांबू इच्छित नाही. मी निघालो. रोक सको तो रोक लो…

माझ्या डॉक्टर मुलानं एक दिवशी मला अकस्मात विचारलं, ‘पपा, तुम्ही कोणाचा मृत्यू पाहिलाय का?’

मी शहारलो, त्यातून बाहेर पडण्यासाठी विनोद करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत मी हसून म्हणालो, ‘नाही. आता माझा पाहीन तो पहिलाच असेल.’
मी मृत्यू पाहिला नसला तरी कानांनी ऐकला होता. त्या काळी मुलुंडच्या एका कंपनीत मी ट्रेनी म्हणून काम करीत होतो. तिथं मला फोन आला – ‘तुझे वडील सीरियस आहेत, लगेच निघून ये.’

मी लगेच निघालो. सीरियस आहेत? काय झालं एकदम? मी सकाळी घरून निघालो तेव्हा व्यवस्थित होते. मी सुन्न झालो. काही विचारच करवत नव्हता. भायखळा स्टेशनवर उतरून मी तडक घरी गेलो. बाहेरच्या वऱहांडय़ात खुर्च्या टाकून आजी आणि आजोबा बसले होते. आजोबा नुसतेच लाल डोळय़ांनी व सैरभैर नजरेनं माझ्याकडे बघत होते. आजी कापऱया आवाजात मला म्हणाली, ‘अरे, काय म्हणताहेत हे लोक? काय झालंय तुझ्या वडिलांना? जा तू बघून ये.’

‘तुम्ही आत बसता का?’ मी कसंबसं विचारलं.

‘नको.’ आजी म्हणाली, ‘आत आणखीच चैन पडणार नाही. तू परत येईपर्यंत आम्ही इथेच बसतो.’

तेवढय़ात शेजारीण टपकली. म्हणाली, ‘मी पण येते.’ तिला विरोध करण्याचे मानसिक बळ माझ्यात नव्हते. आम्ही टॅक्सीतून निघालो. ती पार्श्वभूमीवर सतत बोलत होती. मला ऐकू येत होतंही आणि नव्हतंही. मध्येच तिच्या एका वाक्यानं माझ्या काळजाचा ठाव घेतला. ‘आम्ही तर ऐकलं की ते ऑलरेडी गेलेत.’ ती म्हणाली.

सुन्नच्या पुढे काय असेल तर ते माझं झालं. ऑलरेडी गेले? अण्णा गेले? असे कसे मला एकटय़ाला जगात सोडून गेले? इकडे मी विचारांच्या वावटळीत भेलकांडत होतो आणि तिकडे टॅक्सी जे.जे. हॉस्पिटलला मागे टाकून माझगावकडे निघाली होती. मी भानावर आलो व टॅक्सी मागे फिरवायला सांगितली. टॅक्सीवाला भडकला. ‘पहेले होश में नहीं थे क्या?’ तो माझ्या अंगावर ओरडला. आता त्याला काय सांगू? बाबापुता करून मी त्याला टॅक्सी फिरवायला लावली.

अण्णांच्या रुममध्ये जाऊ देत नव्हते. तिथे डॉक्टरांची गर्दी होती. मी शेजारच्या खोलीत जाऊन थांबलो. काय चाललंय तेच कळत नव्हतं. एकाएकी एका डॉक्टरचे शब्द तरंगत माझ्या कानावर आले- ‘ही इज डेड’.

15 मार्च 1966 हा तो काळाकुट्ट दिवस होता. माझं अवघं विश्व उद्ध्वस्त झालं. आजही ते उद्ध्वस्तच आहे. आई-वडील एकेकच असतात. ते पुन्हा मिळत नसतात.

त्या दिवशी घरी आल्यावर वऱहांडय़ातील आजी-आजोबांना ओलांडून मी आत गेलो आणि फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली काढली. आज छप्पन्न वर्षांनंतर फ्रीज उघडला तरी तोच क्षण मला प्रत्येक वेळेला आठवावा या कर्माचं मी काय करू?

थांबा जरा. ऐका, कोणीतरी दारावरची बेल वाजवतोय. कोण असेल या वेळेला? कोणाला बोलावलं तर नव्हतं. बोलावणं न धाडता येतो तो मृत्यू असेल का? पण मृत्यूला बेल वाजविण्याची गरज कधीपासून पडायला लागली?

– [email protected]