शिरीषायन – रमेश एक्के रमेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

एक प्रख्यात साहित्यिक, रिपोर्टर रमेश गुणे आणि मी एका उत्तुंग इमारतीच्या गच्चीवर सुकी भेळ खात गप्पा मारत होतो.
एकाएकी रमेशनं ‘टँजंट’ देऊन साहित्यिकांना भलताच प्रश्न विचारला- ‘तात्या, त्या फलाण्या फलाण्या नटीबरोबर तुमचं नक्की काय लफडं होतं?’

साहित्यिक खाकरले व मग किंचाळले,-‘हरामखोरा, तुला काय पंचायती करायच्यात? एवढंच सांगतो की तिनं एक दिवशी माझ्या चरणांपाशी जागा मागितली.’

‘ते ठीक आहे,’ रमेश म्हणाला, ‘पण महाराष्ट्रात तिला दुसरे चरण मिळाले नाहीत का?’

साहित्यिक ‘क्लीन बोल्ड’ झाले. त्यांची मधली स्टम्प मुळापासून उखडून कोलांटय़ा उडय़ा खात पार पॅव्हेलियनपर्यंत पोहोचली. रमेशचा प्रश्न समोरच्याच्या वयाचा मान न राखणारा व उद्धटपणाचा असेलही, पण तो मुद्दय़ाचा होता. साहित्यिकाच्या उत्तरानं हे सिद्ध केलं. गुळगुळीत साहित्यिक शब्दांनी तुम्ही तुमच्या गैर वागण्याचं समर्थन करता? तुम्ही सरळ सरळ एका बाईशी संबंध ठेवलेत व त्याला ‘तिनं माझ्या चरणांपाशी जागा मागितली’ म्हणता? (आता तो साहित्यिक कोण हे पह्न करून व ‘मेसेज’ करून विचारू नका.)

संगीतकार कल्याणजीभाईंच्या रेकॉर्डिंग- रूममध्ये रमेश त्याचे ‘जलवे’ दाखवत होता. कोठय़ावर गाणारणीच्या अदा दाखवण्यात तो रमून गेला होता. आपण कोठय़ावरच गेलोय असं मला वाटायला लागलं होतं. शेव बटाटा पुरी खात समोर बसून प्रत्यक्ष दिलीपकुमार बघत होता. रमेशचा अभिनय संपला व त्याला टाळी देत दिलीपकुमार म्हणाला, -‘गलत लाइन में आ गये हो, यार.’

कल्याणभाईच्या याच रेकॉर्डिंग रुमवर त्यानं अमिताभ बच्चनला थेट विचारलं होतं, ‘ये रेखा और जया दो दो पैसे जमता है?’

यावर अमिताभसमोर दोनच पर्याय होते. रम्याच्या थोतरीत मारायची पिंवा त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे. सुसंस्कृत अमिताभनं दुसरा अहिंसक पर्याय निवडला.

‘बहोत प्रॉब्लेम होता है.’ अमिताभ पुटपुटला.

या प्रॉब्लेममधून कसा मार्ग काढायचा हे त्यानं अमिताभला सांगितलं नाही हे आमच्यावर उपकार होते. नशीब त्याला रेखा भेटली नाही; नाही तर अमिताभ गटवायचा मार्ग त्यानं तिलाही सांगितला असता पिंवा स्वतःचा पर्याय पुढे केला असता.

एकदा आम्ही क्रिकेटच्या मैदानाला शोभेल अशा भल्यामोठय़ा अख्खा मजल्याचा मजला व्यापणाऱया पेडर रोडवरच्या फ्लॅटमध्ये गेलो होतो. अशा ठिकाणी आम्ही कसे जायचो (व आता कोणी उभं का करत नाही) आठवत नाही. रमेश गेल्या गेल्या त्याचं काहीतरी ‘पेश’ करायचा. त्यासाठीच नाचे म्हणून आम्हाला घेऊन जायचे की काय कळत नाही. आम्ही सोयिस्करपणे समोर टाकलेली बिस्किटे खायचो आणि रमेश भुंकायला लागायचा. आम्ही नुसतेच शेपूट हलवीत बसायचो. पैशात लोळणाऱया त्या अल्पशिक्षित कुटुंबाची करमणूक व्हायची.

रमेश हॉलच्या मधोमध उभा राहिला व त्यानं विचारलं- ‘तुमच्याकडे पांढरी ‘गांधी पॅप’ असेल ना? घरातील माणसं उगीचच इकडून तिकडे धावली. आपल्या घरात पांढरी टोपी नाही; असण्याची शक्यताही नाही हे घरातल्यांना माहीत नसेल का? परंतु त्यांची धावपळ हा रमेशच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता.

‘पांढरा रुमाल चालेल?’ एकाने विचारलं.

रमेशच्या चेहऱयावर आता या भिकाऱयांकडे काय मागायचे हे तुच्छतादर्शक भाव होते. रमेशमुळे आम्ही परप्रकाशित होतो. तो ढेपाळला की आम्ही बाराच्या भावात गेल्यात जमा होतो. पण नेहमीप्रमाणे त्यानं निभावून नेलं. आम्ही तरून गेलो. रमेशचा लवाजमा बचावला. उद्या रमेश सुळी गेला तर आमची मुंडकी आपसूक धडावेगळी होतील, अशी माझी भावना होती. पुढे रमेश माझ्या एकपात्री प्रयोगाला आला तेव्हा मी मंचावर व रमेश प्रेक्षकात हे मला भलतंच विचित्र वाटत होतं. ‘एक्स्ट्रा’ हिरो व हिरो ‘एक्स्ट्रा’?

अमेरिकेत रमेशनं ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. मग कॉलेजात शिकवलं, प्रॅक्टिस केली, शिबिरं घेतली. छान छान, पण मज मूढाच्या मनात एक प्रश्न उरतोच. रमेशला ‘सायकॉलॉजी’ शब्दाचं स्पेलिंग येत असेल नं? काय असेल ते असो, रमेशच्या नावामागे ‘डॉक्टर’ मला खटकत आलंय. डॉ. मारुती माने, डॉ. हार्दिक पंडय़ा, डॉ. लालूप्रसाद यादवप्रमाणेच ते ‘ऑड’ वाटतं.

रमेशच्या सी. सी. आय.वरच्या पॉश लग्नात त्याची आई बावरलेली, उपरी वाटत होती. कोकणात देवरुखला जन्मलेल्या आपल्या मुलाच्या लग्नात अटलजी असतील हे त्या भांबावलेल्या माऊलीला कसं खरं वाटावं? रमेशच्या चेहऱयावरचे भाव असे होते की, म्हणत असाल तरी मी अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष बुश यांना आत्ता आणू शकतो आणि त्यांना पंपनी म्हणून रशियाचे अध्यक्षही. मधुबालालाही चुटकीसरशी आणली असती पण ती हयात नाही…

– [email protected]