अशी ही पटवापटवी!

>> शिरीष कणेकर

पटविणारे मुलगी कशी पटवतात हो? या प्रश्नाचं उत्तर न मिळताच मी इहलोकीची यात्रा संपवीन असं मला आताशा वाटायला लागलंय. यात्रा संपल्याचं दुःख नाही, पण एका साध्या प्रश्नाचं उत्तर हयातीत मिळू नये याचं दुःख वाटतं. अनुप जलोटाला विचारावं का? नको, तो सध्या ‘बिग बॉस’मध्ये आहे. ‘दुनियावालोंसे दूर अशा ‘बिग बॉस’च्या कडीकुलूपातल्या घरात तू असताना तुझी नवी, ताजी, बायको तुला सोडून निघून तर जाणार नाही कशावरून?’ असं मला त्याला विचारावं लागेल. तो पासष्ट असला तरी मी पंचाहत्तर आहे. (लग्नाच्या) बायका कुठे तोंड काळं करीत नाहीत हा या देशातील बहुसंख्य पुरुषांसमोरचा प्रॉब्लेम आहे. सॉरी, मी फुटवण्याविषयी नाही तर पटवण्याविषयी बोलत होतो. आता या वयात मी भजन गायला शिकून त्याचा प्रभावी प्रयोग करून कोणी मासोळी गळाला लावणे कितपत शक्य आहे? खरीखुरी मासोळी समुद्रात पकडताना कोळीही भजनच म्हणत असतील का? ऐसी लागी लगन (मिळाली सुरमई), मीरा हो गयी मगन (मिळालं पापलेट)…

पण मला सांगा, पटवापटवीसाठी भजन गाणं हा एकच मार्ग आहे का? भजनामुळे भक्तिरसाची निर्मिती बंद होऊन प्रेमरस कधीपासून दुथडय़ा भरून वाहू लागला? विराट कोहलीनं अनुष्का शर्माला भजन ऐकविलं होतं का? की तिला भजनी मंडळीत सोडून तो क्रिकेट खेळायला गेला होता? सलामीवीर मुरली विजयनं यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची बायको पटवली व तिच्याशी लग्न केलं. आता ती विजय (व विजयी) झाली. कार्तिक बिचारा काय करणार? तो यष्टी सांभाळणार की बायको?

माझा एक मित्र रूपारेल कॉलेजमध्ये होता. कॉलेजमध्ये होता म्हणजे कॉलेजबाहेर होता. आत जाऊन काय करणार? कॉलेज उघडायच्या सुमाराला तो नटूनथटून गेटमध्ये उभा राहायचा. पोरींचा घोळका येताना दिसला की हा दोन्ही हात पसरून सुहास्य वदनानं त्यांना म्हणायचा, ‘तुमच्या कोणाच्या स्वप्नातील राजकुमार मी असू शकेन का?’

सहसा चकार शब्द न काढता त्या त्याला ओलांडून निघून जात. तो कधीही त्यांच्या अंगचटीला गेला नाही. फक्त एक निरागस प्रश्न. कोणी त्याच्या थोबाडीत मारल्याचं ऐकिवात नाही. त्यानं सांगितलं नाही तर कळणार तरी कसं म्हणा? रूपारेलला दोन गेटस् असल्यानं नक्की मोर्चेबांधणी कुठं करायची याबाबत त्याचा गोंधळ व्हायचा. त्रासून तो शेवटी रूपारेल सोडून रूईयाला गेला. आता तो मोठा सनदी अधिकारी आहे. भेटला तर मला त्याला एवढंच विचारायचंय – ‘तुझी मुलंही गेटमध्ये उभं राहण्यासाठी रूपारेलला जातात का?…’

माझा एक शाळकरी वर्गसोबती होता. (नाम न लू मैं उस पापीका) सगळी ढ मुलं एकाच वर्गात कोंबायचा त्या काळी रिवाज असू शकेल का? तो दिवसभर डब्यातून आणलेलं काय काय चोरून खायचा व जेवणाच्या सुट्टीत मागल्या बाकावर सुस्तावून झोपायचा. त्यानं डब्यातून आणलेल्या तळलेल्या मासळीचा घमघमाट वर्गात पसरायचा. सुरुवातीला आम्हाला वाटलं की, तो वास त्याच्याच अंगाला येतो. मी वैशंपायन मॅडमना तसं सांगितलंदेखील. त्यांनी वर्गभर पोलिसी कुत्र्यासारखा वास घेतला व अखेर त्या मासळीच्या डब्यापर्यंत पोहोचल्या. त्यांनी डबा जप्त केला व ‘टीचर्स रूम’मध्ये एकटय़ानं फस्त केला. पुढे माझा वर्गमित्र चोरून त्यांच्यासाठी वेगळा डबा आणू लागला. वैशंपायनबाईंच्या विषयात माझा शाळूसोबती पहिला आला त्याचा त्या नियमितपणे पुरवल्या जाणाऱया मासळीयुक्त डब्याशी कृपया कोणी संबंध जोडू नये. त्याच्यावर जळणाऱयांत मी आघाडीवर होतो.

असं बाळकडू मिळाल्यानंतर पुढे तो ‘मिशन पटवापटवी’त तरबेज नसता झाला तरच नवल. माझ्या कानावर आलं की पोरीशी पहिल्या किंवा दुसऱया भेटीतच हा तिला थेट काहीबाही विचारायचा.

माझं डोकंच गेलं. मी त्याला चिडून तावातावानं विचारलं तेव्हा तो थंडपणे म्हणाला, ‘‘फटाफट पटवापटवीसाठी आपल्याकडे फालतू वेळ नाही.’’

‘‘वेळ नाही?’’ मी त्याच पट्टीत, त्याच चिडीनं विचारलं, ‘‘तुला काय कामाचे डोंगर उचलायचे असतात?’’

आपण नक्की कशावर चिडलोय हेच मला कळत नव्हतं. मला गाढवासारखे वाटणारे त्याचे प्रयत्न यशस्वी ठरावेत याचा मला राग येत होता. थोडक्यात माझाच मला राग येत होता. एवढं वाट्टेल तसं बोलायचं, वागायचं? पोरगी पटवून तिच्याशी लग्न करायचं एवढीच पटवापटवी मला अभिप्रेत होती.

‘‘वैशंपायनबाई सध्या कुठे असतात रे?’’ मी तळाच्या पायरीवरूनच त्याला विचारले.

तो खांदे उडवून निघून गेला. तो पायरी ओळखूनच वागत असेल का?

पोरगी पटवण्याची किंवा ती पटल्येय याची खात्री करून घेण्याची एक कल्पक, निरुपद्रवी, सुसंस्कृत तऱहा मध्यंतरी वाचनात आली. तो आणि ती. तो तिला नवीन फ्लॅट दाखवायला घेऊन जातो. तो कुठे काय ‘इंटिरिअर’ करून घेणार आहे तपशीलवार सांगतो. ते शेवटी किचनमध्ये येतात. तो म्हणतो, ‘हे तुझं क्षेत्र बाबा. मला काय त्यातलं कळतंय? तुला हवं तसं तू किचन सजव.’ तिच्या प्रतिक्रियेवरून तत्काळ कळेल की पोरगी पटल्येय की नाही ते.

पण ही व्यूहरचना करण्यासाठी आम्ही नवीन फ्लॅट कुठून आणणार होतो? तिला फ्लॅटवर घेऊन जाण्याइतकी तिच्याशी जवळीक कशी साधणार होतो? मुळात तिला कुठे गाठणार होतो? सगळं केलं असतं तरी ती म्हणाली असती ‘मला काय विचारतोस? ते किचन काय माझं आहे?’

अयशस्वी पटवेगिरीचा एक विनोद सांगतो. (कुठल्याही परिस्थितीत आम्हाला विनोद आठवतो किंवा ब्रम्हांड आठवतं.) शेताच्या बांध्यावर एक मुलगा-मुलगी (तरुण-तरुणी असे वाचावे) बसलेले असतात. समोर बैल-गाईच्या तोंडावर तोंड घासत असतो. ते पाहून रोमँटिक होत मुलगा म्हणतो, ‘‘ए, मला पण असंच करावंसं वाटतंय.’’

‘‘कर की मग.’’ मुलगी विरक्तपणे म्हणते, ‘‘तुझीच तर गाय आहे.’’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या