शिरीषायन – गेले ते दिन गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

दिलीप कुमारचं रडवणं आठवून रडू येतं.

लता मंगेशकरचं गाणं आठवून रडू येतं.

माझी ‘सपोर्ट सिस्टिम’ उद्ध्वस्त झाल्येय. आता कुठल्याही आधाराशिवाय मी अधांतरी जगतोय. किती काळ हा जगण्याचा आभास मी टिकवू शकणार आहे? माझी दोन माणसं वर गेलीत. अण्णा-माई तर कधीच गेलेत. मग मी एकटा खाली काय करतोय? तुम्ही विचारायचा प्रश्न मीच मला विचारतोय. मला अन्न पचत नाही आणि इथे कोटय़वधी रुपये खाऊन माणसं साधा ढेकरही देत नाहीत. चारित्र्य हा शब्द शुद्ध लिहिता न येणारी माणसं समाजात बोकाळलीत. रोज पेपर उघडायचा आणि आज कोणी कोणावर काय आरोप केलेत ते आणि कोविड रुग्णांची संख्या वाढली की रोडावली हे वाचायचे. पह्नवरही हेच बोलायचे.

यात दिलीपकुमार कुठे आहे?
यात लता मंगेशकर कुठे आहे?
यात मी कुठे आहे?

आसपासचं वातावरण श्वास घेणं कठीण जावं इतपं दूषित कधी झालं? नातेसंबंध पैशापुढे कःपदार्थ कधी झाले? फायदे-तोटय़ाच्या तागडीत माणसं एकमेकांना कधी तोलू लागली? पक्षांतर हे कपडे बदलण्याइतके सहज व सोपे कधी झाले? पर्यटनाला जावे तद्वत माणसं तुरुंगात केव्हा जाऊ लागली? पोलीसप्रमुखच फरारी व्हायला लागले? बँकेचे चेअरमनच कोटय़वधी रुपयांची अफरातफर करू लागले? परीक्षेत पैसा चारून, सर्रास कॉपी करून पोरं पास व्हायला लागली? डिग्री नसलेले भामटे खेडय़ापाडय़ात खुशाल डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करू लागले? सौंदर्यप्रसाधनाच्या बळावर मुली स्वतःला लग्नाच्या बाजारात खपवू लागल्या? मुलं योग आणि जिम यांच्या नावाखाली दारूच्या गुत्त्यावर पडून राहायला लागली? वडिलांना गाढव ठरवणारी व म्हणणारी अवलक्षणी पिढी जन्माला आली?…

भावुक स्वप्नरंजनात रमणारे आम्ही कालबाहय़ ठरलो. आमचे मित्र जुनाट झाले. आमच्या भावना बोथट ठरून त्यांना गंज लागला. आमची नावे हास्यास्पद ठरली. आमचे अट्टहास वेडे गणले गेले. आमच्या चारित्र्याला नामर्दपणाचं नाव दिलं गेलं. आमचा आनंद जुनापुराणा व शिळा झाला. आमचं दुःख फुटकळ व तिरस्कारणीय झालं. आमचा राग हास्यास्पद ठरला. आमच्या विनोदांवर न हसवणारे असा शिक्का बसला. एकूणच आम्ही टाकावू व ब्याद ठरलो. आम्ही जात का नाही, असा चिडखोर प्रश्न समोरच्याच्या चेहऱयावर येऊ लागला. आपण निरक्षर असतो तर बरं झालं असतं असं वाटत राहिलं.
हे दिवस येताना दिसले कसे नाहीत? 15 ऑगस्ट 1947 रोजी मी अण्णांबरोबर त्यांच्या ससून हॉस्पिटलमध्ये जेवायला गेलो होतो. स्वातंत्र्य दिनाचं सेलिब्रेशन. लांबच लांब कॉरिडॉरमध्ये टेबल-खुर्च्या लागल्या होत्या. मी अण्णांच्या अंगावर रेलून उभा होतो. ताटात जिलबी होती. एवढं आठवतंय. अण्णा एक घास स्वतः खायचे, एक मला भरवायचे. घास भरवणारा हात फार काळ राहणार नाही असला विचार करण्याचं ते वय नव्हतं.

दर शनिवारी आम्ही बापलेक सायकलवरून डबल सीट भिकारदास मारुतीला जायचो. अण्णा सोबत दोऱयात ओवलेली भोकाच्या पैशांची माळ घेऊन यायचे. मारुतीच्या दारात अण्णा ती माळ सोडवायचे. मग मी त्यातला एक-एक पैसा वाकून वाकून तिथं ओळीनं बसलेल्या भिकाऱयांच्या वाडग्यात टाकायचो. माझ्या पाठीला रग लागायची. आज कशानं पाठीला रग लागली की माझं मन खूप खूप मागे जातं. मी लहानगा होऊन भिकारदास मारुतीपुढच्या भिकाऱयांचे आशीर्वाद घ्यायला लागतो. उगीचच वाटत राहतं की, ती पुण्याई कुठेतरी कामाला येत असली पाहिजे. मुंबईत वडाळय़ाला गोण्या मारुतीबाहेर बसलेल्या म्हाताऱया भिकारणीला भीक घालताना माझी हीच भावना होती. त्या माझ्या आजीच्या वयाच्या होत्या. म्हणूनच असेल कदाचित मी त्यांच्या डोळय़ात बघायचं टाळायचो. त्यांना भीक घेणं सोपं जावं एवढय़ासाठी मी त्यांना चपला संभाळायला द्यायचो… माझे भिकारदास मारुतीसमोर भोकाचे पैसे वाटून झाले की अण्णा म्हणत, ‘मिस्टर शिरीष, भिकारी संपले, पैसेही संपले. चला घरी.’ मग आम्ही आई नसलेल्या घरी जायचो.

आई नसलेलं घर. मी तेच पाहिलंय. पुढे अण्णा नसलेलं घर पाहणंही भाळी आलं. देव नाही देव्हाऱयातचा अर्थ कळला. अण्णांना घेऊन जाऊन, मला बेवारशी करून देवानं नक्की काय साधलं? माझ्या जिव्हारी घाव घालायचा एवढाच त्याचा उद्देश होता का? मी त्यातून कधीच बाहेर आलो नाही; आता काय येणार? एक गुपित सांगू का? मी पुण्याला गेलो ना की, या खेपेला आवर्जून भिकारदास मारुतीला जाईन आणि दुरून लपून बघीन. भोकाच्या पैशांची माळ घेतलेले अण्णा मला दिसतील का हो? त्यांचे शब्द ऐकू येतील का? मी त्यांच्याबरोबर घरी जाईन. आई नसलेल्या घरी…

– [email protected]