ही माणसं आली कुठून?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

इलाही जमादार लिहितात-
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?
रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?
दमडय़ा दमडय़ासाठी जीव टाकणारी
त्यासाठी कोणाच्याही नरडीला नख लावणारी
पूर्वसुरीचं कुठलंही ऋण न मानणारी
रक्ताच्या नात्यात खुशाल भेसळ करणारी
ही माणसं आली कुठून?
क्षुद्र प्रमोशनसाठी कोणाच्याही छाताडावर पाय देऊन जाणारी
प्रेमाचा हिशेब फायदा तोटय़ात करणारी
भ्रष्टाचार हाच जीण्याचा मार्ग निवडणारी
खाल्लेला पैसा पचविण्यासाठी ‘जिम’मध्ये जाणारी
ही माणसं आली कुठून?
केसाला कलप करणारी
केस नसतील तर केसांचा ‘विग’ घालणारी
डोईवर खोटे केस विणून घेणारी
‘विग’ चुकून निघाला तर थैमान घालणारी
ही माणसं आली कुठून?
नखांना रंगीबेरंगी रंग लावणारी
नखांवर नखं चढवून बसून राहणारी
कोणाही पेक्षा जास्त नखांची काळजी घेणारी
घरात नखभरही काम न करणारी
ही (बाई)माणसं आली कुठून?
घरात राहून स्वयंपाकघर न वापरणारी
स्वयंपाकघर असूनही हॉटेलात जेवणारी
फोन करून अन्न मागवून घेणारी
चपाती-भाकरी ऐवजी पिझ्झा खाणारी
ही माणसं आली कुठून?
चालत जायचं अंतर टॅक्सीनं जाणारी
शक्य आहे तिथं विमानानं जाणारी
आजकाल विमानप्रवास किती ‘टायरिंग’ झालाय हे सांगणारी
बस व ट्रेन ही वाहनं माहीतच नसणारी
ही माणसं आली कुठून?
पोटच्या पोरांशी इंग्रजीतून बोलणारी
तीही त्याच भाषेत बोलतात याचा अहंकार बाळगणारी
मातृभाषेत बोलणाऱयांना अडाणी समजणारी
आपलं मूळ गाव सांगण्यास टाळणारी
ही माणसं आली कुठून?
कपाटात मद्याची किमान एक बाटली ठेवणारी
कुठलंही सेलिब्रेशन दारूशिवाय साजरं न करणारी
सुखात आणि दुःखात दोन्ही प्रसंगात दारू ढोसणारी
दारू उपासाला चालते असं म्हणणारी
ही माणसं आली कुठून?
ऑफिसात सेक्रेटरीवर व घरात शेजारणीवर डोळा ठेवणारी
संधी मिळताच मोलकरणीवर लक्ष ठेवणारी
मेव्हणीवर आपला हक्कच आहे असं धरून चालणारी
आपण काहीही चुकीचं करीत नाही असं मानणारी
ही माणसं आली कुठून?
क्रिकेटवर ‘बेटिंग’ करणारी
मटक्याचा आकडा लावणारी
नियमितपणे रेसला जाणारी
पत्त्यांचा जुगार खेळणारी
ही माणसं आली कुठून?
येता-जाता बायकोला झोडणारी
काही निमित्तानं पोरांना बदडणारी
शेजाऱयापाजाऱयांच्या अंगावर धावून जाणारी
एकूणच गुरासारखी ओरडणारी
ही माणसं आली कुठून?
देशाविषयी काडीचं पेम नसणारी
प्राणार्पण केलेल्या सैनिकांसाठी दोन अश्रू न ढाळणारी
आक्रमक शत्रूविषयी संतापून न उठणारी
निलाजरेपणे तुमडी भरत जगत राहणारी
ही माणसं आली कुठून?

[email protected]