हरवलेलं संगीत (भाग 12) – असे संगीतकार अशा गमती

1953मध्ये इरॉस चित्रपटगृहात झालेल्या मेळाव्यात संगीत दिग्दर्शक सुरुवातीला सरस्वतीपूजन करीत आहेत. (डावीकडून) गुलाम महंमद, हंसराज बहल, नौशाद, मदन मोहन, सी. रामचंद्र, मुकेश, अनिल विश्वास, हेमंतकुमार, लता मंगेशकर (आनंदघन), महंमद शफी, रोशन, जयकिशन, शंकर.

>> शिरीष कणेकर

सी. रामचंद्र अनिल विश्वासला गुरुस्थानी मानत. एकदा रामचंद्र आपली एक चाल घेऊन अनिलदांना भेटायला गेला आणि म्हणाला, ‘माझी एक चाल मला तुम्हाला ऐकवायची आहे. ऐकल्यावर मला तुम्ही जोडय़ानं माराल हे मला माहित्येय, पण तरी ऐकाच.’

सी. रामचंद्रनं ती चाल अनिलदाला ऐकवली. संपूर्ण गाणं ऐकल्यावर अनिल विश्वास म्हणाला, ‘मी तुला जोडय़ानं तर मारणार आहेच, पण मला आणखी एक गोष्ट तुला सांगायची आहे. तुझं हे गाणं सुपरडुपर हिट होणार आहे. मार्क माय वर्डस्.’

ते गाणं होतं – ‘आना मेरी जान मेरी जान, संडे के संडे’ – गीतकार प्यारेलाल संतोषी – गायक सी. रामचंद्र व शमशाद बेगम – साल 1947.

अनिलदाचे शब्द खरे ठरले. तो जोडय़ानं मारण्याचा कार्यक्रम झाला की नाही, माहीत नाही. अनिलदानं असं गाणं स्वतः कधी दिलं नसतं व नाहीच दिलं, पण पब्लिकची नस तो किती ओळखून होता बघा. सी. रामचंद्रनं गुरूदेखील योग्यच निवडला होता.

————————————–
गीतकार दीनानाथ मधोक बहुगुणी होता. तो गाणी तर उत्तम लिहायचाच, पण आपल्या गीतांना चाल लावूनच संगीतकारांना द्यायचा. मधोकची हौस त्यांच्या पथ्यावर पडायची. त्यांना आयती चांगली चाल मिळायची व चालीचं श्रेयही त्यांनाच मिळायचं. त्यामुळे हा उभयपक्षी खुशीचा मामला होता. आपली चाल संगीतकार स्वीकारतोय यातच मधोकला आनंद होता. मात्र मधोक व सज्जाद ही जोडी एकत्र आली तेव्हा साहजिकच ठिणग्या उडाल्या. कंत्राटाचा कागद वरून खालून वाचून सज्जाद निर्मात्याला म्हणाला, ‘यात माझं नाव कुठाय? माझं नावच नाही.’

‘असं कसं होईल?’ निर्माता गडबडून म्हणाला, ‘हे काय लिहिलंय-संगीतकार सज्जाद.’

‘पण चित्रपटातली गाणी मी लिहीन असं कुठं त्यात म्हटलंय?’

निर्माता काय ते समजला. मधोकही समजला. त्यानं गपचुप आपलं गाणी लिहिण्याचं काम केलं. अशा रीतीनं ‘सैंया’ (साल 1951) चित्रपटातील मधुबालाच्या तोंडची ही गाणी तयार झाली – ‘काली-काली रात रे’, ‘वो रात दिन वो शाम की गुजरी हुवी कहानियाँ’, ‘तुम्हे दिल दिया, ये क्या किया मैने.’ हे शेवटचे गाणे अप्रतिम व दुर्मिळ आहे. मधोक व सज्जादची ही कमाल चित्रपटातून कापली गेली होती. आता तर ‘सैंया’ची प्रिंटही बाजारात उपलब्ध नाही. सगळी ‘क्रिएटिव्हिटी’ नामशेष झाली. अनोखे शब्द व त्यांना लावलेली अनोखी चाल असे हे ‘तुम्हे दिल दिया’ माझ्या आग्रहाखातर ऐका.

‘सैंया’ पूर्वी वर्षभर आलेल्या ‘तराना’मध्ये मधुबालानं पाळलेल्या कोकराचं नाव ‘सैंया’ होतं. तेच नाव ‘सैंया’त मधुबालाचं होतं.
————————–
‘उडन खटोला’मधलं नौशादचं ‘मेरा सलाम ले जा’ (लता आणि कोरस) तुफान गाजलं होतं. पण लता त्या काळी परदेशात गेलेली असल्यानं ‘मेरा सलाम ले जा’ सुधा मल्होत्राच्या आवाजात रेकॉर्ड करूनही टाकलं होतं. लता परत आल्यावर नौशादनं साळसूदपणे तिला ‘मेरा सलाम’ गाण्यासाठी बोलावलं. लता आली. ‘मेरा सलाम ले जा’ रेकॉर्ड झालं. संगीतकार गुलाम महंमदचा भाऊ तेव्हा नौशादचा सहाय्यक होता. रेकॉर्डिंग झाल्यावर तो लगबगीनं लताकडे आला व म्हणाला, ‘अच्छा हुवा बेटी तुम आ गयी. उसने तो गाने का सत्यानाश किया था.’

‘किसने?’ लतानं आश्चर्यानं विचारलं.

तेव्हा तिला झाला प्रकार कळला. त्या काळी एकानं गायलेलं गाणं दुसऱयानं गायचं नाही असा पार्श्वगायकात संकेत होता. लता नौशादकडे गेली व आधीचंच सुधा मल्होत्राचं गाणं नौशादनं ठेवावं अशी तिनं गळ घातली. लताच्या आवाजात रेकॉर्ड केल्यावर आधीचं सुधा मल्होत्राचं गाणं ठेवणं त्याच्या जिवावर आलं. इकडे आड, तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली. अखेर त्यानं लताची समजूत घातली – ‘तू चिंता करू नकोस. मी सुधाशी बोलतो. तिला समजवतो. ती माझी जबाबदारी.’

अखेर आपण ऐकतो ते लताच्या आवाजातील ‘मेरा सलाम ले जा’ चित्रपटात राहिलं. बिचाऱया सुधा मल्होत्राचं गाणं ऐकायलाही मिळालं नाही. तिचा काय दोष होता?

‘मेरा सलाम ले जा’च्या रेकॉर्डिंगला हजर असलेल्या कोणी तरी ती चाल हुस्नलाल-भगतराम यांना जाऊन सांगितली. त्यांनी लगेच तिच्यावरून ‘शामे बहार आयी, करके सिंगार आयी’, (चित्रपट ‘शमा परवाना’, गायक सुरैय्या व रफी, साल 1954) हे गाणं बनवलं. आपला माल राजरोस मारला गेलाय हे कळल्यावर नौशाद चिडला. त्यानंतर रेकॉर्डिंगला संबंध नसलेला माणूस उपस्थित असता कामा नये असा त्यानं दंडक घेतला व अखेरपर्यंत पाळला.

———————————————–

काही संगीतकार गप्पा मारीत बसले होते. मध्येच के. दत्तांनी (दत्ता कोरगावकरांनी) उंगली केली. ते अनिल विश्वासला म्हणाले, ‘तुझं गाणं आहे ना ते, ‘मोरे अंगने मे लागा अंबवाका पेड’ ते सहीसही कॉपी आहे!

‘काय?’ अनिल किंचाळला. हा आरोप त्याला सहन होण्यासारखा नव्हता.

‘माझ्या लहानपणी माझी आजी नेहमी एक गाणं म्हणायची, ‘बाई ढेकणानं मजला पिसाळलं.’ कोरगावकर म्हणाले, ‘सेम टु सेम चाल.’

‘अरे, पण मी कुठं गेलो होतो तुझ्या आजीची चाल ऐकायला?’ अनिल गुश्श्यातच म्हणाला.

‘नसशील गेला.’ कोरगावकर शांतपणे म्हणाले, ‘पण तुझ्या आधी कोणा मराठी माणसाला ही चाल सुचली होती एवढं तरी मान्य करशील की नाही?’

अनिल विश्वास निरुत्तर झाला. हा किस्सा मला सांगतानाही वृद्ध कोरगावकरांना हसू आवरत नव्हतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या