शिरीषायन: दिल भी तेरा हम भी तेरे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिरीष कणेकर

अफाट गुणवत्तेचे पुरेपूर चािrज झालेले संगीतकार-शंकर जयकिशन.
भव्यतेचा व दिव्यतेचा परीसस्पर्श लाभलेला अभिजात संगीतकार- नौशाद.
लताशिवाय कारकीर्द गाजवणारा एकमेव संगीतकार- ओ. पी. नय्यर.
ज्याच्या गुणांपेक्षा अवगुणांना अवाजवी महत्त्व दिलं गेलं असा संगीतकार- सज्जाद हुसेन.
शेवटी आत्महत्या करायला भाग पडलेला गुणी संगीतकार- बुलो सी. रानी.
ज्याचे असामान्य गुण जाणून घेण्याचे कोणी प्रयत्नच केले नाहीत असा गुणाढय़ संगीतकार- विनोद ऊर्फ एरिक रॉबर्टस्.
शंकर-जयकिशन आधीची तुफान जोडी- हुस्नलाल-भगतराम.
बनिया व्हायचे ते संगीतकार झाले अशी जोडी- कल्याणजी-आनंदजी.
गुणांच्या मानानं जास्त यश मिळालेला संगीतकार- रवी.
जगावेगळा संगीतकार- ए. आर. रहेमान.
मधाळ चालींचे कोठार मालकीचं असणारा संगीतकार- सी. रामचंद्र.
हिंदीदेखील धड न येणारा महान संगीतकार- एस. डी. बर्मन.
आंग्लाळलेला जातिवंत हिंदी संगीतकार- मदन मोहन.
गाण्यांना व चित्रपटांना भरपूर यश मिळूनही उपेक्षित लेखून कमी लेखण्यात आलेला महान, दर्जेदार, हरहुन्नरी संगीतकार- रोशन.
रोशनलाल नागरथ खरोखरच दुर्दैवी संगीतकार होता. त्यानं काय करायचं बाकी ठेवलं होतं? त्यानं साध्या साध्या चित्रपटांची संगीतयात्रा बनवली. त्याच्या गाण्यांनी रसिकांना वेड लावलं. ‘ये इश्क इश्क है इश्क इश्क’ ही बारा मिनिटे चालणारी लाजवाब कव्वाली रोशननं ‘बरसात की एक रात’मध्ये दिली होती. मागे निवडणुकांचे निकाल येत असताना टीव्हीने ‘बरसात की एक रात’ दाखवला. देवाच्यान् सांगतो, निकाल गेले तेल लावत, मी एकापाठोपाठ एक गाण्यांची वाट पाहत होतो. निकालांचा व्यत्यय माझं डोकं फिरवीत होता. वाचा… ‘जिंदगीभर नहीं भूलेगी वो बरसात की रात’ (रफी), ‘मैने शायद तुम्हे’ (रफी), ‘मुझे मिल गया बहाना’ (लता), ‘निगाहे नाजके मारोंका हाल क्या होगा’ (आशा, सुधा, शंकर शंभू व कोरस), ‘जी चाहता है चूम लू’ (आशा, सुधा, बलबीर, बंदे, हसन व कोरस), ‘न तो कारवां की तलाश है’ (मन्ना डे, आशा, सुधा, बातिश व कोरस), ‘जिंदगीभर नहीं भूलेगी’ (लता), ‘ गरजत बरसत सावन आयो रे’ (सुमन, कमल बारोट)… या चित्रपटात भारत भूषण होता म्हणे! पाहिला कोणी? पाहायला मधुबाला व ऐकायला रोशन होते.
रोशनचा जन्म 14 जुलै 1917 रोजी जलालपूर (आता पाकिस्तानात) झाला. लखनौला मॉरिस संगीत कॉलेजात त्यानं रीतसर संगीताचं शिक्षण घेतलं. प्रसिद्ध शास्त्र्ााrय गायक व वादक मनोहर बर्वे यांच्या समवेत रोशननं देशभ्रमण केलं. तो दिलरुबा व सारंगी उत्तम वाजवायचा. त्यानंतर दिल्ली आकाशवाणीवर तो दहा वर्षे वादक म्हणून कार्यरत होता. ‘बावरे नैन’ हा रोशनचा दुसराच चित्रपट गाजला. त्यातली ‘तेरी दुनिया में दिल लगता नहीं’ (मुकेश), ‘सुन बैरी बलम’ (राजकुमारी), ‘मुझे सच सच बता दो’ (राजकुमारी व मुकेश), ‘खयालों में किसी के’ (गीता राय व मुकेश) ही गाणी गाजली. त्यानंतर कामाची कमतरता रोशनला कधीच भासली नाही. त्याला दिलीप कुमार व देव आनंदचा एकही चित्रपट मिळाला नाही, पण हातात आहेत त्या चित्रपटांना सुपरहिट संगीत त्याने दिलं. ही काही नावं घ्या- ‘हम लोग’, ‘मल्हार’, ‘नौबहार’, ‘रागरंग,’ ‘शीशम’, ‘मालकीन’, ‘बाराती’, ‘चाँदनी चौक’, ‘टकसाल’, ‘अजी बस शुक्रिया’, ‘मधू’, ‘ताजमहाल’, ‘दादी माँ’, ‘देवर’, ‘ममता’, ‘चित्रलेखा,’ ‘भीगी रात’, ‘नई उमर की नयी फसल’…
मिळेल तिथे जाऊन रोशनची ही गाणी ऐका- ‘मेरे खयालों में आकर’ (‘गुनाह’- तलत), ‘उनको अपना बनाके छोड दिया’ (‘मालकीन’- लता), ‘और है दिल की लगी’ (‘रागरंग’- तलत), ‘ए री मैं तो प्रेमदिवानी’ (‘नौबहार’-लता), ‘सारी सारी रात’ (‘अजी बस शुक्रिया’ – लता), ‘बार बार तोहे क्या समझाये’ (‘आरती – रफी व लता), ‘जो वादा किया’ (‘ताजमहाल’ – लता व रफी), ‘बहारोने मेरा चमन लूटकर’ (‘देवर’ – मुकेश)…
सी. रामचंद्र एकदा सांगत होते- ‘रोशन नेहमी यायचा. उगीच उष्टावल्यासारखा प्यायचा, खूप रडायचा व निघून जायचा.’
रोशन एकदा अनिल विश्वासकडे गेला व खंतावून म्हणाला, ‘‘दादा, मी तुमच्यासारखी गाणी का देऊ शकत नाही?’’
अनिलदा रागावला व म्हणाला, ‘‘खुळा की काय तू? अरे, उत्तम काम करतोयस तू. दोन कडव्यांतलं जोडकाम तर तुझ्यासारखं कोणीच करत नाही. हे खूळ डोक्यातून काढून टाक.’’
लता मंगेशकर ‘भैरवी’ नावाचा चित्रपट काढणार होती. त्याचं संगीत तिनं रोशनकडे सोपवलं होतं. आणखी काय मान्यता हवी?
16 नोव्हेंबर 1967 रोजी हा 57 चित्रपटांचा संगीतकार वरळीला कोणा निर्मात्याच्या घरी हसता हसता हृदयविकाराच्या तीक्र झटक्यानं गेला. आयुष्यभर रडला आणि नेमका गेला तेव्हा हसत होता.

– [email protected]