शिरीषायन – घटस्फोट

>> शिरीष कणेकर

माझा एक जुना, जवळचा, समवयस्क मित्र मागल्या भेटीत मला सांगायला लागला, ‘‘मला घटस्फोट घ्यायचाय.’’
‘‘आँ?’’ मी उडून म्हणालो, ‘‘आता या स्टेजला? मला माहित्येय की, तुमचं अजिबात पटत नाही. एकाही गोष्टीवर तुमचं एकमत नसतं. तोंड उघडलं की, भांडणासाठीच उघडतं, पण म्हणून या वयात घटस्फोट?’’
‘‘का नको? टेल मी, का नको? यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. अनेक कारणांनी तो घेतला गेला नाही. ही चूक होती हेही मान्य, पण म्हणून चूक कधी सुधारायचीच नाही का? इतकी वर्षे सहन केलं म्हणून उरलेले थोडे दिवसही सहन करायचं हे कुठलं तर्कशास्त्र? मी माझ्या मर्जीप्रमाणे शांतपणे उर्वरित आयुष्य जगायचं नाही का?’’
मी माझ्या मित्राकडे कुतूहलानं पाहिलं. शाळेपासून आमची मैत्री होती. आम्ही एकमेकांना पूर्णपणे ओळखून होतो. तरीही त्याच्या या घटस्फोटाच्या निर्णयानं मी हलल्यासारखा झालो.
‘‘या वयात?’’ मी पुनः पुन्हा विचारत राहिलो.
‘‘माझा ज्योतिषीही हेच म्हणत होता. त्याचा भरही वयावरच होता. माझ्या कुंडलीत घटस्फोट लिहिलाय का, हे जाणून घेण्यासाठी मी त्याच्याकडे गेलो होतो, पण कुंडली गुंडाळून ठेवून त्याने स्वतःची सल्लागारपदी परस्पर नेमणूक केली. सल्ला तर मी तुलाही विचारला नाही. कारण सल्ल्याची स्टेज मी केव्हाच मागे टाकलीय. आता या निरुपयोगी सोपस्कारात मला मौल्यवान वेळ फुकट घालवायचा नाही. आय सिंपली वांट टू गेट रिड ऑफ हर.’’
‘‘जस्ट लाइक दॅट?’’ मी विचारले.
‘‘जस्ट लाइक दॅट’’ तो उत्तरला.
‘‘किती वर्षे संसार केलात? चाळीस-पंचेचाळीस वर्षे?’’
‘‘असेल. त्याचं काय?’’
‘‘एवढय़ा वर्षांत प्रेम, आपुलकी, अटॅचमेंट, सवय…काहीच निर्माण झालं नाही?’’
‘‘माझ्या बाजूनं नक्कीच नाही’’ तो ठासून म्हणाला, ‘‘तिच्या बाजूनं असल्यास मला ते दिसू, कळू व समजू शकलेलं नाही. माझं जग वेगळं, तिचं जग वेगळं.’’
‘‘तुझ्या जगात ती नाही?’’
‘‘नाही.’’
‘‘तिच्या जगात तू नाहीस?’’
‘‘नसणार. कारण असतो तर पदोपदी मला ते जाणवलं असतं. मला मनस्ताप देणाऱया गोष्टी तिनं टाळल्या असत्या. निदान त्यादृष्टीने तिचे प्रामाणिक प्रयत्न होतायत हे मला दिसलं असतं. तेवढंही मला पुरेसं वाटलं असतं. ती नफ्फड आहे. मला आता शिव्या द्यायला लावू नकोस.’’
‘‘तुम्ही दोघे एकत्र बसून शांतपणे या विषयावर बोललायत?’’ मी म्हणालो, ‘‘बोलला असलात तर काय बोललात अन् बोलला नसलात तर का नाही बोललात?’’
‘‘नाही बोललो. आता तू कारण विचारणार. गेली काही वर्षे आमच्यात बोलणं चालणं पूर्णपणे बंद आहे. नाइलाज असेल तेव्हाच आम्ही कम्पल्सरी तुटक बोलतो. अनेकदा शब्दांची देवाणघेवाण टाळण्यासाठी आम्ही मोबाईलवरून ‘मेसेज’ पाठवतो. कालच मी ‘मेसेज’ केला, ‘मला कालवण नको, आंबट वरण वाढ’. बोलून प्रश्न सुटण्याची वेळ केव्हाच सरल्येय. हे वाईट, दुरावलेले कटू संबंध फार काळापासून आहेत. बाहेर तुम्हाला ठाऊक नसले तरी ते नाहीत असं होत नाही.’’
‘‘मुलांशी बोललायस?’’
‘‘नाही अजून’’ तो तत्काळ म्हणाला, ‘‘त्यांचं मत का घ्यायला हवं, मला कळत नाही. प्रॉब्लेम त्यांचा नाही, माझा आहे. त्यांनी त्यांचं घर, त्यांचा संसार सांभाळावा. ठरलेल्या थोडय़ा दिवसांत मी कसं जगावं हेदेखील ठरविण्याचा मला अधिकार नाही का? समजा मुलांनी कडाडून विरोध केला तर माझ्या मताला, निर्णयाला, विचाराला काहीच महत्त्व नाही का? अन् समजा, त्यांनी माझ्या घटस्फोटाला मान्यता दिली तर त्यामुळे माझा निर्णय योग्य, उचित व स्वीकारार्ह ठरतो की काय?’’
थोडा वेळ आम्ही काही न बोलता नुसतेच बसून राहिलो. मग मी बोलू लागलो, ‘‘देव सगळय़ाच माणसांत सद्गुण व दुर्गुण भरतो. चांगल्या-वाईट गोष्टींची सरमिसळ करतो. तू बायकोतल्या सद्गुणांची व चांगल्या गोष्टींची दखलच न घेण्याचा धोरणात्मक निर्णय फार वर्षांपूर्वी घेतलास. आता नो गोइंग बॅक. परतीचे दोर तू कापून टाकलेस. आता तिच्या दुर्गुणांनी व वाईट गोष्टींनी तुला पिसाळून सोडलंय. तुला सहन होत नाही. तिनं मुलांकडे जावं व सुखी व्हावं. मात्र मला सोडावं असं तुला तीव्रतेनं वाटत असावं. तुला एक सांगतो, तू घटस्फोट घेणार नाहीस ही दगडावरची रेघ आहे. एकाएकी तुला तिच्याविषयी ममत्व वाटू लागेल म्हणून नव्हे, तर घटस्फोटातील कायद्याच्या बाबी, पोटगी, समाजात उडणारा धुरळा, नातेवाईकांची विषारी कुजबुज, घरातील नवीन तरतुदी या सगळय़ांचा समर्थपणे सामना करण्यासाठी लागणारं शारीरिक व मानसिक बळ आता तुझ्याकडे नाही. तू गोष्टी अशाच कुजत पडू देणार. दिवस जाणार. ते जातातच. तू आधी जाणार व मग ती जाणार किंवा ती आधी जाणार व मग तू जाणार. संपलं. तू घटस्फोटाच्या गोष्टी तोंडाने बोलतोस. कारण त्यामुळे तुझ्यात नसलेला जोर अंगात संचारल्याचा तुला भास होतो. हा भास तुझ्यासाठी सुखद हवेची झुळूक आणतो.’’
माझा मित्र हसला व कडवटपणे म्हणाला, ‘‘आमच्या पश्चात अनभिज्ञ जग म्हणेल, काय एकसुरी व आदर्श जोडपं होतं नाही?’’
 [email protected]