
>> ऍड. शिवांगी झरकर
आपण महत्त्वाची कागदपत्रे स्वतःच्या वा इतरांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करतो, तसेच डिजिटल युगात माहिती इकडून तिकडे पाठवताना आपल्या डिजिटल स्वाक्षरीचे प्रमाणीकरण करत आपली माहिती गोपनीय ठेवू शकतो. आपली स्वाक्षरी ही फक्त आपणच करू शकतो, ही त्यामागील एक धारणा कायम राहत त्याचे खासगीपणही संरक्षित केले जाते.
आपली सही ही व्यावहारिक जगात आपली एक ओळख असते. या सहीच्या माध्यमातून आपण सर्व कायदेशीर, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक व्यवहार पूर्ण करतो. काही सन्माननीय आणि प्रतिष्ठत व्यक्तींसाठी त्यांची सही ही ऑटोग्राफ असते. याच एका भौतिक सहीला इलेक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून रूपांतरीत करून डिजिटल सिग्नेचर (सही ) बनवली जाते. डिजिटल सिग्नेचर (सही)ला कायदेशीररित्या संपूर्ण हिंदुस्थानात तसेच इतर देशांत मान्यता प्राप्त झाली आहे. जसे कागदपत्रांवर आपण हस्ताक्षर करतो त्याचप्रमाणे डिजिटल सिग्नेचरने (सही) ऑनलाईन कागदपत्रांवर डिजिटली सही करू शकतो.
डिजिटल सहीचा वापर कुठे आणि कसा होतो?
1. ऑनलाईन कागदपत्रे हस्ताक्षरासाठी डिजिटल सहीचा वापर होतो .
2. कंपनी किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) रजिस्टर करताना डिजिटल सहीचा वापर होतो.
3. ई-बिल बनवताना डिजिटल सहीचा वापर होतो.
4. GST किंवा आयकर (Income Tax) भरताना डिजिटल सहीचा वापर होतो.
5. आयात किंवा निर्यात उद्योगात डिझिटल सहीचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो.
6. कस्टम, ई-टेंडर , ई-बिडिंग, ई-ऑक्शनमध्ये डिजिटल सहीचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो.
7. ऑनलाईन कायद्याच्या कागदपत्रांत, ऑनलाईन मेडिएशन (समझोते), ई-ऍग्रीमेंट, ई-कॉन्ट्रक्टमध्ये डिजिटल सहीचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो.
8. ऑनलाईन उद्योग, ई-कॉमर्स, टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर आणि काही मोबाईल ऍपमध्ये हस्ताक्षरासाठी डिजिटल सहीचा वापर होतो.
9. प्रत्येक व्यक्ती खासगी कामांसाठीसुद्धा डिजिटल सही वापरू शकते.
10. ट्रेड मार्क आणि पेटंट रजिस्टर करताना डिजिटल सहीचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो.
11. परदेशात किंवा परदेशी संस्थेसोबत आर्थिक किंवा कायदेशीर व्यवहार करताना डिजिटल सहीचा वापर होतो.
डिजिटल सहीचे फायदे ः
1. सहज आणि सुलभ वापर ः एकदा तुम्ही डिजिटल सही रजिस्टर करून सर्टिफिकेट मिळवले की डिजिटल सहीचा वापर तुम्ही सहज आणि सुलभ पद्धतीने कागदपत्रं डिजिटली हस्ताक्षरीत करण्यासाठी करू शकतात. त्यासाठी विशेष ट्रेनिंगची आवश्यकता नाही.
2. वेळेची बचत ः वेळ निघून गेली की पुन्हा येत नाही. त्यामुळे वेळेचा जपून वापर करणे आवश्यक आहे. डिजिटल सहीच्या माध्यमातून आपण कधीही आणि कुठेही ऑनलाईन कागद हस्ताक्षरीत करून वेळेचा योग्य वापर करू शकतो.
3. उद्योगात आणि उद्योगाच्या प्रगतीत वाढ ः कागदपत्रासाठी वाट बघणे किंवा सहीसाठी कुरिअर करणे यात बराच वेळ निघून जातो आणि कधी कधी होणारी कामे, उद्योग समझोते फिसकटतात आणि संधी हातातून निघून जाते. डिझिटल सहीने कोणतीही औद्योगिक कामे आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे क्षणात हस्ताक्षरीत करून होतात आणि उद्योगाला नवीन दिशा आणि औद्योगिक प्रगती होते.
4. कागदाची बचत ः दरवर्षी करोडो झाडे कागद निर्मितीसाठी कापली जातात. ऑनलाईन कागदपत्रे आणि डिजिटल सहीमुळे या नैसर्गिक नुकसानात कुठेतरी निर्बंध लागत चालला आहे तसेच झाडांची आणि कागदाची बचत होत चालली आहेत.
5. कायद्याचा पाठिंबा ः हिंदुस्थानात आणि इतर काही देशांत ऑनलाईन कागदपत्रांना आणि डिजिटल सहीला कायदेशीर मंजुरी तसेच कायद्याचा पाठिंबा आहे.
6. कागदपत्रांत अचूकता ः बऱयाच वेळेला कागदपत्राचे प्रमाण जास्त असले की काही कागदपत्रांवर नकळत सही करायची राहून जाते. परंतु डिजिटल सही ही अचूक पद्धत आहे. त्यामुळे पूर्ण कागदपत्रं अचूकरीत्या हस्ताक्षरीत केली जातात.
7. सहीत समरूपता ः कागदपत्रांचे प्रमाण जास्त असले तर सही करून करून कधी कधी सहीत बदल होतो किंवा समरूपता निघून जाते. परंतु डिजिटल सही ही अचूक पद्धत आहे. त्यात डिजिटल सहीत काहीही बदल होत नाही. एक कागद असो वा एक करोडो, सर्व कागदपत्रांवर एकाच पद्धतीने डिजिटल सही हस्ताक्षरीत केली जाते.
8. पैशाची बचत ः डिझिटल सहीमुळे कागदपत्रांचा खर्च, कुरिअर खर्च, प्रिंटिंग खर्च आणि इतर असे बरेच खर्च वाचतात आणि डिजिटल कागदपत्रे डिजिटल सहीने आरामात हस्ताक्षरीत केली जातात.
9. ग्राहकांमध्ये वृद्धी ः तुमचे ग्राहक, डिजिटल सहीने डिजिटल कागदपत्रं कधीही आणि कुठेही सही करून घेऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांचा वेळही वाचतो आणि कंपनी/उद्योगाविषयी निष्ठाही वाढते.
आजच्या डिजिटल युगात, आधुनिक औद्योगिक आणि व्यावसायिक जगात डिजिटल सिग्नेचर (सही) याचे एक वेगळेच आणि अद्वितीय स्थान आहे. परंतु साध्या सहीपेक्षा डिजिटल सिग्नेचरची विशेष काळजी घ्यावी लागते. डिजिटल सिग्नेचरचा वापर योग्य ठिकाणी आणि काळजीपूर्वक करावा.
डिजिटल सहीचे सर्टिफिकेट कोण विकत घेऊ शकते?
1. वैयक्तिक वापरासाठी कोणीही व्यक्ती
2. हिंदुस्थानी कंपनी आणि संस्था
3. परदेशी व्यक्ती आणि परदेशी संस्था
4. IEC कोड होल्डर
डिजिटल सहीचे तोटे आणि धोके
1. ऑनलाईन कागदपत्र साठवणुकीची अपूर्ण जागा ः जेव्हा आपण एखादे डिजिटल सहीचे सॉफ्टवेअर घेतो तेव्हा ऑनलाईन कागदपत्र साठवणुकीची पूर्ण माहिती घ्यावी, नाहीतर काहीच कागदपत्रे सही केल्यावर सर्व्हरवर जागेची कामतरता भासू शकते.
2. सुरक्षित विक्रेता ः डिजिटल सही सॉफ्टवेअर घेताना मिळणारे फायदे, सेवा, सुरक्षितता आणि सॉफ्टवेअरचे नियम जाणून घ्या आणि मगच डिजिटल सही सॉफ्टवेअर रजिस्टर करा. बाजारात काही विक्रेते स्वस्तात डिजिटल सही सॉफ्टवेअर सेवा देतात; परंतु एकदा पैसे आले की सुरक्षित सेवा देत नाहीत.
3. ऑनलाईन फसवणूक ः सध्या सायबर फसवणुकीचे गुन्हे वाढलेत. तुमच्या डिजिटल सहीचा वापर करून ऑनलाईन फसवणूक मोठय़ा प्रमाणात होऊ शकते.
4. अनधिकृत हस्ताक्षर ः काही विक्रेते, उद्योजक किंवा आपलेच कर्मचारी सायबर फसवणूक करून तुमच्या डिजिटल सहीचा अनधिकृत हस्ताक्षर करून फायदा उचलू शकतात. तेव्हा सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे.
5. अनुपालन न झाल्याचे धोके ः ऑनलाईन फॉर्म भरताना, डिजिटल सही अपलोड करताना जर व्यत्यय किंवा त्रुटी आली आणि योग्य नमूद केलेल्या पद्धतीचे अनुपालन झाले नाही तर नुकसान होऊ शकते.‘
n www.advshivangi.com
(Founder of Law Fleeter Adv. Shivangi)


























































