प्रश्नांचं उत्तर देणारी शाळा ‘प्रश्नचिन्ह’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शुभांगी बागडे

भीक मागणाऱया, व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांना एकत्रित करून त्यांनी अमरावती जिह्यातील नांदगाव खंडेशर तालुक्यातील मंगरूळ चवाळा या गावी मतीन भोसले यांनी पत्र्यांच्या शेडमध्ये शाळा सुरू केली. या शाळेचं नाव ‘प्रश्नचिन्ह’ असलं तरी या शाळेनं तब्बल साडेचारशे अनाथ आणि फासेपारध्यांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलंय. सरकारच्या कोणत्याही अनुदानाशिवाय ही शाळा चालवण्याचं शिवधनुष्य मतीन यांनी पेललंय.

भटक्या-विमुक्त जातीतील फासेपारधी समाज कायमच भटके जीवन जगणारा. पाली व बेडय़ांवर वास्तव्य करणारा हा समाज. जन्मजात गुन्हेगार म्हणून इतर भटक्यांप्रमाणेच फासेपारधी समाजाकडे बघितलं जातं. उकिरडय़ावरचं जगणं नशिबी आलेल्या समाजाला त्यांच्यातीलच मतीन भोसले या तरुणानं अंधकाराच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हा परिषदेतल्या शाळेतील नोकरीवर लाथ मारून त्यानं भीषण आर्थिक दैन्यावस्था, गरिबी, गुन्हेगारीच्या दलदलीत अडकलेल्या पुटुंबातील भटक्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘प्रश्नचिन्ह’ ही निवासी शाळा सुरू केली आहे.

‘प्रश्नचिन्ह’ या निवासी शाळेत कोणताही आधार नसलेल्या फासेपारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मतीन भोसले करीत आहेत. शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना शिक्षित करण्यात येत आहे. ‘प्रश्नचिन्ह’ ही केवळ एक निवासी शाळा नसून निराधार, मुख्य गरजांपासून वंचित असलेल्या फासेपारधी समाजातील मुलांचा एक परिवार आहे. मतीन भोसले हे फासेपारधी समाजातील मुलांसाठी एक देवदूत, आधारवड ठरले आहेत.

फासेपारधी ही गुन्हेगारीचा शिक्का बसलेली जमात. त्यामुळे या समाजातील लहान मुलांना शाळा माहीत नाही. ही मुले रेल्वे स्थानके, सिग्नलवर भीक मागून आपले आणि पुटुंबाचे पोट भरतात हे बघून अस्वस्थ होत असलेल्या मतीन भोसले या तरुणाने ‘आदिवासी फासेपारधी सुधार समिती’ स्थापन केली आणि त्याद्वारे समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करू लागले. रेशनकार्ड मिळवून देण्यापासून त्यांच्या अनेकविध मागण्यांसाठी आंदोलन करत त्यांची परिस्थिती बदलता येईल का यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले, जे अद्यापही सुरूच आहेत. मात्र त्याच वेळी या समाजातील लहान मुलांच्या बाबतीत काही घटना घडल्या. त्या घटनांनी व्यथित होत मतीन भोसले यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला.

अज्ञान आणि गरिबीमुळे वंचित घटक बनून जीवन जगावे लागणाऱया या समाजातील मुलांचे भविष्य बदलण्याचा निर्धार त्याने केला. त्यासाठी शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी समाजसेवेची कास धारली. पारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शाळा काढण्याचे ठरवले. आर्थिक सुरक्षितता असतानाही खेळत्या वयात फासेपारधी समाजातील मुले रस्त्यावर मरत होती. जगण्याची कोणतीही साधने त्यांच्याकडे नव्हती. त्यांची ही विदारक परिस्थिती मतीन भोसले यांच्या मनाला पुठेतरी आतून पुरतडत होती. सरतेशेवटी नोकरी सोडून मुलांना माणूस बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि ‘प्रश्नचिन्ह’ शाळेच्या माध्यमातून प्रस्थापितांविरोधात बंड उभारले. मुंबई, नागपूर, चेन्नई , हैदराबाद अशा ठिकाणी जाऊन त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱयांनी फासेपारधी समाजातील लहान मुलांना एकत्र केले. ही मुले म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने अनेक पालक त्यांना मतीनकडे सोपवण्यास तयार नव्हते; पण त्यांना समजावून त्या मुलांना शाळेत आणण्यात त्यांना यश मिळाले. मात्र त्यांचे जेवणखाण, कपडेलत्ते यांचा खर्च उचलणे सोपे नव्हते. मतीन यांचे स्वतŠचे काही उदरनिर्वाहाचे साधन नव्हते. म्हणूनच मुलांच्या जगण्यासाठी आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी ‘भीक मांगो आंदोलन’ सुरू करून त्याद्वारे 1 रुपया भीक मागणे सुरू केले. सुरुवातीला त्यांच्याकडे 188 मुले होती. ती सर्व भीक मागू लागली तेव्हा त्यांच्यावर मंगरूळ चवाळा, नांदगाव येथील लोकांनी अनेक आरोप-प्रत्यारोप केले. कोणी त्यांना चोर ठरवले, कोणी लाकूड तस्कर, कोणी दलाल तर कोणी काही हिणवले, पण ते मागे हटले नाहीत.

‘भीक मांगो’ आंदोलनातून 60 हजार रुपये जमले होते. त्यातून पत्र्याची शाळा उभारण्यात आली. यावेळी या मुलांना समजेल अशा त्यांच्या भाषेत संवाद साधणे, शिक्षण मिळणे गरजेचे होते. मतीन यांना पारधी बोलीभाषेतून शिकवणाऱया तीन शिक्षकांची साथ मिळाली. आपल्या समाजाच्या उद्धारासाठी काहीतरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेली ही तरुण मंडळी तुटपुंजे मानधन घेऊन काम करू लागली. मतीन आणि त्यांच्या सहकाऱयांच्या धडपडीची जाणीव झाल्यावर समाजातूनही मदतीचे हात पुढे आले. असे अनेक अनुभव मतीन यांनी सांगितले. त्यातील जालना येथील ‘मैत्र मांदियाळी’ या संस्थेने मुलांसाठी एक इमारत बांधून दिली. याप्रमाणेच इतर काही संस्था दर महिन्याला किराणा सामान, मुलांचे शालेय साहित्य यासाठी मदत करतात. आज या संस्थेत 447 मुले शिकत आहेत. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारी ही मुले तेथेच राहतात. इथं मुलांना शिक्षण, डोक्यावर छप्पर आणि पोटभर अन्न मिळत आहे. आपणही काहीतरी करू शकतो हा विश्वास प्रत्येक मुलाला मिळाला आहे. मुलांना आता ‘प्रश्नचिन्ह’ शाळा आपली वाटू लागली आहे.

भीक मागणाऱया, व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांना एकत्रित करून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेशर तालुक्यातील मंगरूळ चवाळा या गावी पत्र्यांच्या शेडमध्ये शाळा सुरू केली. या शाळेचं नाव ‘प्रश्नचिन्ह’ असलं तरी या शाळेनं तब्बल साडेचारशे अनाथ आणि फासेपारध्यांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलंय. अमरावतीच्या मंगरूळ चव्हाळा इथं मतीन भोसले यांनी ही शाळा सुरू केलीय. सरकारच्या कोणत्याही अनुदानाशिवाय ही शाळा चालवण्याचं शिवधनुष्य मतीन यांनी पेललंय. सरकारनं शाळा देण्याचं आश्वासन दिलं, त्यातही फसवणूक झाली. इथं शिकणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याची एक कहाणी आहे. एकेकाळी शिकार करणारे, भीक मागणारे हात शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत. शिक्षणाची ही वाट या मुलांचे आयुष्य नक्की उजळवून टाकेल. या सगळ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मतीन धडपड करत आहेत.

‘प्रश्नचिन्ह’ शाळेत दर्जेदार शिक्षण मिळेल असा मतीन यांचा कटाक्ष असतो. या शाळांना पक्क्या भिंती नसल्या तरी त्यातून संस्कारक्षम पिढी घडेल हा त्यांचा आत्मविश्वास खूप काही सांगून जातो.

– [email protected]