परीक्षण- मर्मग्राही विश्लेषण

>> सुधाकर वसईकर

 

झल हा मूळचा फार्सी काव्य प्रकार आहे. तो अरबी, फार्सी आणि मुस्लिम संस्कृती या तीन संस्कृतींच्या संगमातून मराठीत आलेला मराठी गझलेचा काव्य प्रकार आहे. गेल्या काही वर्षांत जवळपास शेकडो गझल संग्रह प्रकाशित झाले आहेत. या गझलेवर सुरेश भटांचा प्रभाव दिसून येतो. सुरेश भटांनी गझल मराठी भाषेत आणली, मराठी भाषेचे रंगरूप दिले आणि मराठी गझल समृद्ध केली. 1960 नंतर मराठीत जाणीवपूर्वक गझल लिहून सुरेश भट यांनी `गझलयुग’ निर्माण केले. बऱयाचदा उपहासात्मक, उपेक्षेचा सूर लावला जातो. ती उर्दू, हिंदी भाषेप्रमाणे बहरतेय का? असाही सवाल असतो. खरे तर अशा प्रकारे तुलना करणे योग्य नाही. कारण उर्दू गझलेचा 700 वर्षांचा प्रवास आहे, तर मराठी गझलेचा प्रवास जेमतेम 50 ते 60 वर्षांचा आहे. त्यामुळे मराठी भाषेत आजवर जी काही गझल लिहिली गेली, त्याचा अभ्यास, संशोधन करून समीक्षा झाली पाहिजे.

डॉ. श्री. के. क्षीरसागर, डॉ. भालचंद्र फडके, डॉ. द. भि. कुळकर्णी, डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. राजशेखर हिरेमठ, डॉ. अविनाश सांगोलेकर आदी चार-पाच बोटांवर मोजण्याइतक्या समीक्षकांची नावे सोडल्यास गझलेची समीक्षा कोणी केलेली दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2023 मध्ये गझल अभ्यासक डॉ. धनंजय भिसे यांचा डॉ. अविनाश सांगोलेकर यांचा `अविनाशपासष्टी गझल संग्रह : एक शोध’ समीक्षा ग्रंथ प्रकाशित व्हावा ही स्वागतार्ह बाब आहे.

डॉ. भिसे यांनी प्रस्तुत ग्रंथ विषय निवडण्यामागील भूमिका, उद्दिष्टे, गृहितके, अवलंबलेली संशोधन पद्धती आणि प्रकरणश केलेल्या सुटसुटीत मांडणीतून डॉ. सांगोलेकर यांच्या गझलेचा सर्वंकष आढावा घेतला आहे. पहिले प्रकरण उपोद्घाताचे आहे. डॉ. सांगोलेकरांच्या घरात कोणतीही विद्येची, ग्रंथ निर्मितीची परंपरा नसताना त्यांनी त्यांच्या व्यवसायापासून स्वतला अलग केले. वैविध्यपूर्ण साहित्य लेखन करून साहित्य क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली आणि साहित्य उन्नती करून दाखविली. गझल संशोधनाचे अलौकिक असे महान कार्य केले आणि आद्य मराठी गझल संशोधक आणि ज्येष्ठ गझलकार म्हणून ओळख निर्माण केली. त्यादरम्यानच्या प्रदीर्घ साहित्यिक वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, विपुल ग्रंथसंपदा, त्यांना मिळालेले पुरस्कार यांची सालनिहाय नावासहित जंत्री आणि अभ्यासपूर्ण लक्षवेधी माहिती तसेच त्यांचा व्यक्ती आणि वाङ्मयाचा सखोल परिचय प्रस्तुत समीक्षा ग्रंथात करून दिला आहे.

डॉ.सांगोलेकर यांनी आपल्या प्रदीर्घ 40-42 वर्षांच्या साहित्य लेखन कारकीर्दीत विविध साहित्य प्रकार लीलया हाताळलेत. 11 संपादित ग्रंथ, 11 स्वतंत्र ग्रंथ लिहिलेत. इतरही स्फुट लेखन, वैचारिक लेख आदी विपुल लेखनानंतर वयाच्या 65 व्या वर्षी `अविनाशपासष्टी’ हा पहिला गझल संग्रह प्रकाशित केला, जो ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. यात निवडक अशा 65 गझलाच अंतर्भूत आहेत. सर्व गझलांच्या शेवटी मक्त्याची द्विपदी ही हमखास येतेच. त्यात `अविनाश’ हा `तखल्लूस’ (गझलकार) नाम कुशलतेने योजला आहे. प्रस्तावनाकार अरुण म्हात्रे म्हणतात, सांगोलेकरांनी जाणीवपूर्वक केलेली एकमेव गोष्ट म्हणजे गझलेच्या शेवटच्या शेरात आपले नाव तखल्लूस या स्वरूपात आणून आपल्या मनातील 65 आवाहने `अविनाशी’ केली आहेत. त्याचप्रमाणे डॉ. सांगोलेकरांनी आपल्या एका गझलेतून माणदेश चित्रित केलाय. प्रादेशिक कादंबरी हा जसा कादंबरीचा उपप्रकार आहे तसाच गझलेचाही एक उपप्रकार म्हणून प्रादेशिक गझलही पुढेमागे मराठी गझल विश्वात अस्तित्वात येऊ शकते हे या गझलेने सूचित केले आहे. अर्थात मराठी गझलेत असे नवनवीन प्रयोग अपेक्षित आहेत. म्हणूनच प्रस्तुत गझल संग्रह आगळावेगळा ठरतो. परिशिष्टामध्ये रामहरी पंडित ऊर्फ चंद्राशू यांनी `सारा समाज हल्ली एकात्म आढळेना!’ या सामाजिक गझलेचा आणि प्रभाकर साळेगावकर यांनी `ते लोक कोण होते?’ या सामाजिक-राजकीय गझलेची केलेली आस्वादक समीक्षादेखील अत्यंत महत्त्वाची आहे.

`अविनाशपासष्टी’ गझल संग्रह : एक शोध

लेखक : डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय भिसे

प्रकाशक : ग्रंथाली

मूल्य : रु.120/- पृष्ठे : 103