
>> सुधीर सेवेकर
लेखक बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही गाजलेली कादंबरी. समकालिनांच्या साहित्यापेक्षा वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण. तिला अनेक पुरस्कार मिळाले. हिंदी, इंग्रजी, कानडी या भाषांतूनही ती अनुवादित झाली. या कादंबरीवर चित्रपट काढावा असे अनेकांच्या मनात होते. संभाजीनगरच्या रंगभूमीवर उमेदवारी करून आता मुंबईच्या व्यावसायिक नाटक-सिनेमाच्या दुनियेत यशस्वी ठरलेल्या एका प्रख्यात दिग्दर्शकाने यासंदर्भात पुढाकार घेतला होता. पण बरीच वर्षे उलटली तरी त्यात काही प्रगती दिसेना म्हणून लेखक बाबा भांड यांनी ती कादंबर परत घेतली. शेवटी ‘रंगनील क्रिएशन्स’ या संस्थेतर्फे दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी त्यावर ‘दशक्रिया’ याच नावाने चित्रपट बनवला. त्याला सन 2017 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळय़ात अकरा पारितोषिके मिळाली. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (मनोज जोशी), सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा पुरस्कार (संजय पाटील) आणि सर्वोत्कृष्ट प्रादेशिक दिग्दर्शक (संदीप पाटील) असे पुरस्कार मिळाले. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), कोलकाता आंतरराष्ट्रीय महोत्सव, इंडोजर्मन फिल्मकिम अशा अनेक महोत्सवांतून या चित्राचे कौतुक झाले. पुरस्कार मिळाले, परंतु त्याचवेळी या चित्रपटाच्या देशातील प्रदर्शनास मात्र विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत जोरदार विरोध आणि वादविवादास सामोरे जावे लागले. संभाजीनगर खंडपीठात त्याविरुद्ध याचिका दाखल केली गेली. पुणे, संभाजीनगर व इतरत्र चित्रपटाविरुद्ध आंदोलने केली गेली. चित्रपटाची सारी कहाणी ज्या पैठण नगरीत घडते, तिथे तर भरचौकात या चित्राचे लेखक-दिग्दर्शक यांचा ‘दशक्रिया’ विधी पार पाडला गेला? अलीकडच्या काळात मराठीतील कुठल्याच चित्रपटाच्या वाटय़ाला असा विरोध आणि त्याचवेळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळाले नसावेत!
दोन वर्षांपूर्वी संभाजीनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘दशक्रिया’ दाखवला गेला. त्याला रसिकांचा मिळालेला उत्स्फूर्त उत्तम प्रतिसाद पाहता त्याचे दोन खेळ या महोत्सवात दाखवले गेले. चित्रपट सर्व थरातील सुजाण रसिकांना आवडला. ‘दशक्रिया’ या कादंबरीत लेखक बाबा भांड यांनी धर्माला आलेली अवकळा, विदारक जाती व्यवस्था, अर्थार्जनाचे संतापजनक व करुणाजनक पर्याय, उच्चनीच, वर्ण-वर्गांना पोटासाठी एका पातळीवर आणणारी समाजस्थिती अन् पैशासाठी धर्म, मृत्यू अन् कर्मकांडातून सर्वांचे होणारे शोषण हा विषय मांडलेला आहे. विषय सामायिक, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाचाच आहे. अशा या कादंबरीवर सिनेमा काढायचा हे एक महत्त्वाचे माध्यमांतर आहे. माध्यमांतर हे काम सोपे नाही. अनेक गाजलेल्या साहित्यकृतींवर जेव्हा सिनेमे तयार झाले तेव्हा मूळ साहित्यकृतीचा गाभाच नाहीसा झाला अशी अनेक नामवंत लेखकांची तक्रार असल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील आणि म्हणूनच ‘दशक्रिया’ या कादंबरीचा सिनेमा कसा केला गेला हे मानून घेणे मोठे रोचक ठरणारे आहे. या माध्यमांतराची एक महत्त्वाची पायरी म्हणजे कादंबरीवरून सिनेमासाठीची पटकथा लिहिणे. पटकथेत प्रामुख्याने स्थळ-काळ वर्णन, पात्रे आणि संवाद यांनी युक्त दृश्ये म्हणजे सीन्स लिहावे लागतात. त्यांचा क्रम ठरवावा लागतो. हे काम संजय कृष्णाजी पाटील यांनी केलेले आहे. चित्रपटासाठीची एकूण सत्याहत्तर दृश्ये संवादासह प्रस्तुत दशक्रियेची चित्रकथा’ या पुस्तकात दिलेली आहेत. ती रोचक आहेतच, पण त्याच्याहीपेक्षा कादंबरी ते चित्रपट हा प्रवास कसा झाला याच्याविषयीचे जे एक सुमारे तीस पानी टिपण संजय कृष्णाजी पाटील यांनी दिले आहे, ते अधिक वाचनीय आणि रोचक आहे. उदाहरणार्थ त्यांनी कादंबरीतील संघर्ष आणि एकूण नाटय़ अधिक प्रभावी करण्यासाठी काय बदल केले, ते तसे का केले, चित्रीकरणासाठी योग्य ते ‘लोकेशन’ हुडकण्यासाठी किती फिरले आदी बराच तपशील ते देतात. त्यानुसार ऑक्टोबर 14 ते जुलै 16 असे जवळपास वीसेक महिने या चित्रपटाचे लेखनकाम चालू होते, त्याचे अनेक खर्डे लिहिले गेले. यावरूनही हे काम किती आव्हानात्मक असते ते कळते. संजय पाटील यांनी यापूर्वी जोगवा, पांगिरा, बाहत्तर मैल एक प्रवास असे तीन चित्रपट लिहिलेले आहेत. कविता, नाटक या आकृतीबंधातही उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी यापूर्वी दिलेल्या आहेत आणि हे सगळे त्यांनी त्यांची सरकारी नोकरी करीत यशस्वीपणे केलेले आहे. ते सगळे वाचणे म्हणूनच साहित्य, रसिक, कलावंत, चित्रकर्मी, रंगकर्मी, आम सिनेरसिक अशा सर्वांसाठी मोठे रोचक ठरणारे आहे. इंग्रजीतून काही गाजलेल्या सिनेमांवरती अशी पुस्तके आहेत. सत्यजीत रे यांनीही त्यांच्या काही चित्रांच्या पटकथा प्रसिद्ध केलेल्या आहेत. पण मराठीत अशा माध्यमांतरावरची पुस्तके जवळपास नाहीतच. ती कमी हे पुस्तक अंशतः भरून काढते. पुस्तकात चित्रपटाची श्रेयनमावली हवी होती. म्हणजे कलावंत, तंत्रज्ञ आदीही वाचकांना कळाले असते. चित्रपट लेखनामध्ये ‘शूटिंग स्क्रीप्ट’ म्हणून एक प्रकार असतो. त्यात प्रत्येक दृश्या वेळी कॅमेरा कुठे असेल, चित्रचौकटीत काय दिसेल, कलावंतांचे पोषाख काय असेल, नेपथ्य काय असेल वगैरे खूप बारकाईने तपशील दिला जातो. अगदी मेकप, साऊंड, लाइटस्च्या तपशिलासह.
ते सगळे देणारे पुस्तकही दशक्रिया चित्राचे लेखक संजय कृष्णाजी आणि दिग्दर्शक संदीप पाटील यांनी संयुक्तपणे लिहावे, चित्रपट माध्यम अभ्यासकांसाठी अशा पुस्तकाची उपयुक्तता आणि मोल मोठे राहील. ‘दशक्रियेची चित्रकथा’ या पुस्तकात सिनेमातील अनेक फोटोही आहेत. त्यानेही पुस्तक सुंदर झालेय.
दशक्रियेची चित्रकथा
लेखक – संजय कृष्णाजी पाटील
प्रकाशन – साकेत प्रकाशन प्रा. लि. संभाजीनगर, पुणे.
पृष्ठ – 176 रुपये, मूल्य – 200





























































