
>> सुजाता बाबर
एकपेशीय सूक्ष्म जीव किंवा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा जरी आपल्याला सापडल्या तरी एकूणच ‘परजीव सृष्टी’चा वेध घेता येऊ शकतो. त्यानुसारच शुक्रावर जीवन असण्याची शक्यता यापूर्वीदेखील अमेरिकेतील (मूळचे हिंदुस्थानी) डॉ. संजय लिमये व त्यांच्या समूहाने व्यक्त केली होती. कार्डिफ विद्यापीठातील प्रा. ग्रीव्हज व त्यांच्या समूहाने नुकताच शुक्रावरील फॉस्फिन या दुर्मिळ व विषारी वायूच्या अस्तित्वाचा शोध लावला आहे. त्यामुळे शुक्र हा परजीवांचे घर असू शकतो हे अनुमान पुढे आले आहे.
विश्वामध्ये मानव हा सर्वश्रेष्ठ आणि बुद्धिमान प्राणी आहे असा आपला समज आहे. आपल्याइतका हुशार किंवा जास्त हुशार प्राणी या विश्वात कुठे असेल का याची मानवाला कायमच जिज्ञासा वाटत आली आहे. यासाठी आपण हर तऱहेचे प्रयत्न करीत असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील वेगाने होणाऱया प्रगतीने हा शोध घेणे आता शक्य आहे. खगोल जीवशास्त्र्ा ही आता एक आघाडीची आणि आव्हानात्मक शाखा उदयास आली आहे. केवळ मानवसदृश प्राणी नव्हे, तर साधासा एकपेशीय सूक्ष्म जीव किंवा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा जरी आपल्याला सापडल्या तरी एकूणच ‘परजीव सृष्टी’चा वेध घेता येऊ शकेल.
शुक्र हा ग्रह यात सध्या खूपच चर्चेत आहे. खरे तर शुक्रावर जीवन असण्याची शक्यता यापूर्वीदेखील वर्तविली गेली होती. यामध्ये 2018 साली एका शोध निबंधामध्ये अमेरिकेतील (मूळचे हिंदुस्थानी) डॉ. संजय लिमये व त्यांच्या समूहाने हे अनुमान मांडले होते. कार्डिफ विद्यापीठातील प्रा. ग्रीव्हज व त्यांच्या समूहाने नुकताच शुक्रावरील फॉस्फिन या दुर्मिळ व विषारी वायूच्या अस्तित्वाचा शोध लावला आहे. त्यामुळे शुक्र हा परजीवांचे घर असू शकतो हे अनुमान पुढे आले आहे.
शुक्र हा आपला सख्खा शेजारी. सूर्य आणि पृथ्वी यामधील ग्रह असल्याने आपण त्याला अंतर्ग्रह असे म्हणतो. सूर्याच्या जवळ असल्याने सूर्यासोबत उगवणारा आणि मावळणारा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसतो आणि त्यामुळे कविकल्पनांमध्ये याला ‘तारा’ असेही म्हटले जाते. शुक्राचा आकार व वस्तुमान पृथ्वीशी कमालीचे मिळतेजुळते आहे. त्यामुळे त्याला पृथ्वीचा जुळा बंधुग्रह असेही म्हटले जाते.
शुक्रावर फॉस्फिन सापडणे हा तिथे जीव असल्याचा थेट पुरावा नसला तरी मार्गदर्शक संशोधन मात्र निश्चित आहे. पृथ्वीवरील फॉस्फिनचा वास हा सडलेल्या माशासारखा असतो. तसेच काही औद्योगिक प्रक्रियांतून फॉस्फिन तयार केला जातो. शिवाय बॅक्टेरिया आणि सूक्ष्म जंतूंसह अनएरोबिक जिवांद्वारेदेखील फॉस्फिन तयार केले जाते. त्यामुळेच फॉस्फिनचे अस्तित्व म्हणजे एक प्रकारची ‘बायोसिग्नेचर’ किंवा ‘जीवनाचा संकेत’ आहे. यापूर्वीदेखील विश्वातील इतरत्र असणाऱया काही खडकाळ ग्रहांवर फॉस्फिन मोठय़ा प्रमाणात सापडला आहे आणि तोदेखील ‘जीवनाचा संकेत’ मानला गेला आहे.
शुक्राच्या पृष्ठभागावर जीवन असणे अशक्य वाटत असले तरी त्याच्या पृष्ठभागापासून साधारण 56 किलोमीटर उंचावर असलेल्या वातावरणात ते शक्य आहे असेही मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे याच भागामध्ये फॉस्फिन सापडला आहे, परंतु येथील ढग इतके आम्लीय आहेत की, ते कोणत्याही फॉस्फिनचा त्वरित नाश करू शकतात. म्हणजे तिथे असे काहीतरी असायला हवे जे फॉस्फिन निर्माण करीत असेल. शिवाय सापडलेल्या वायूचे प्रमाणदेखील लक्षात येण्याजोगे आहे. त्यामुळे एकत्र कोणत्या तरी रासायनिक किंवा भूगर्भीय प्रक्रियांमधून जसे सूर्यप्रकाश, ज्वालामुखीतील विखुरलेले द्रव्य यातूनही तो निर्माण होत असावा किंवा सूक्ष्म जीवांकडून! हा शोध एक अपघाती शोध मानायला हवा. शुक्राच्या वातावरणात फॉस्फिन असू शकेल का ही केवळ एक संशोधन आधाररेषा मानली जात असताना अचानक शुक्रावरील वर्णपटांमध्ये त्याचे अस्तित्व सापडले. हे संशोधकांनादेखील अपेक्षित नव्हते. हा क्षण जेन ग्रीव्हज आणि त्यांच्या समूहासाठी ‘युरेका’ क्षण होता. शिवाय शुक्रावरील ढगांच्या 20 भाग प्रति अब्ज ढग हे फॉस्फिनचे बनलेले आहेत हेदेखील लक्षात आलेले आहे. गेल्या दशकातील अनेक शोध निबंधांच्या म्हणण्यानुसार फॉस्फिनचे अस्तित्व ही जीवनाच्या अस्तित्वाची निश्चित शक्यता आहे.
पृथ्वीवर जसे ऑक्सिजनचे अस्तित्व हे सजीव सृष्टीचे द्योतक आहे. त्याप्रमाणे काही ग्रहांवर आणि उपग्रहांवर फॉस्फिनचे अस्तित्व हे सूक्ष्म जीवांच्या सृष्टीचे द्योतक असू शकते. या शोधामुळे शुक्र ग्रह पुन्हा एकदा शास्त्र्ाज्ञांच्या सर्वोच्च अग्रक्रमामध्ये आला आहे. फॉस्फिन वायूची निर्मिती, त्याचे प्रमाण, वर्षभरामधील बदलते प्रमाण याचा अनेक वर्षे शोध घ्यावा लागेल. केवळ जीवनाच्या अस्तित्वाचा शोध नाही, पण यामध्ये इतर अनेक रासायनिक व भूगर्भीय घटकांच्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित केले जाईल. असंशोधित स्पष्टीकरणाचा वेध घेतला जाईल. यात सर्वात महत्त्वाचे काम असेल ते म्हणजे शुक्र मोहिमा! आपल्याला जर शुक्राच्या वातावरणाचा शोध घ्यायचा असेल तर तिथे थेट पोहोचणाऱया मोहिमांचा विचार करावा लागेल. शुक्राच्या वातावरणाचा सखोल अभ्यास करावा लागेल. शुक्राच्या वातावरणाचे नमुने परत आणणाऱया मोहिमा आयोजित कराव्या लागतील.
शुक्रावरचे जीवन असले तर ते कदाचित एकपेशीय जिवांच्या स्वरूपात असेल, जे द्रवरूप थेंबांमध्ये असते. हे द्रवरूप थेंब वातावरणातील ढग तयार करतात. शुक्रावरील या थेंबांमध्ये 90 टक्के सल्फ्युरिक आम्ल असते, जे पृथ्वीवरील आम्लीय वातावरणाच्या अब्ज पटीने जास्त आम्लीय आहे. विश्वातील सर्वच सजीव हे पृथ्वीवरील सजीवांप्रमाणे डीएनए पाया असलेले असतीलच असे नाही, तर ते अत्यंत वेगळ्या मूलगामी स्वरूपातले असू शकतात. यात शुक्रावरील जीवन हे एक उदाहरण असू शकते. त्यामुळे आता शुक्र मोहिमांकरिता अनेक देशांमध्ये तयारी सुरू झाली आहे. त्यात आपणही मागे नाही. आपण कदाचित 2023 मध्ये ही मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित करू शकू. जेन ग्रीव्हज यांनी शुक्रावर जीवन असल्याचा कोणत्याही प्रकारचा दावा यात केलेला नाही, परंतु हे संशोधन मात्र त्या दिशेने जाऊ शकते. आजपर्यंत विश्वात जीवसृष्टी कुठे असेल का याच्या शोधार्थ मंगळ, चंद्र अशा अवकाशीय वस्तूंकडे आपले विशेष लक्ष होते. आता मात्र शुक्राने यात आपला पहिला नंबर लावला आहे!
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)
























































