कोकण संस्कृती – कोकणची लोककला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेश चव्हाण

नमन-खेळे हा उत्तर कोकणातील अतिशय लोकप्रिय असा लोककला प्रकार आहे. होळीच्या सुमारास कुणबी समाज गावच्या देवीच्या नावाने नमन-खेळे करण्यास प्रारंभ करतो. यांना ‘देवीचे खेळे’ म्हणूनही संबोधले जाते.

मन-खेळे हा उत्तर कोकणातील अतिशय लोकप्रिय असा लोककला प्रकार आहे. बहुजन (कुणबी) समाज हा कला प्रकार सादर करतो. धार्मिक विधी म्हणूनच या लोककला प्रकाराकडे पाहिले जाते. लग्नकार्य, सत्यनारायण, नामकरण विधी अशा शुभप्रसंगी खेळे केले जातात. हे खेळे पेशवाई काळापासून होत असावेत. खेळय़ांच्या काही गीतांतून राघोबादादाच्या नावाचा उल्लेख आढळतो. 1728 साली शामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार आणला, त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावला व नमन-खेळे रत्नागिरी जिह्यात होऊ लागले. नृत्य, नाटय़ व संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार ‘यक्षगान’ या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवितो. दोन्हीकडे पायघोळ झगे वापरले जातात. तसेच रामायण, महाभारतातील भागांचे गायन कोरसचा वापर करून केले जाते व पात्र त्यावर अभिनय करतात. अंगसोंगे व लाकडी सोंगे याबाबतीत ‘लळिता’शीही खेळय़ांचे साम्य आढळते. यामध्ये ब्राह्मण, गावचा पाटील, सरकारी अधिकारी अशांची सोंगे आणून त्यात शब्दांच्या कसरती व अंगविक्षेप करून लोकांना पोटभर हसविणे व त्यांची करमणूक करणे हे दोन्हीकडे केले जाते. यामध्ये चेहऱयावरील भावदर्शनाला भरपूर वावर असतो. खेळय़ातील मुखवटा-नाटय़ाचे साम्य ‘भोवाडय़ा’तील मुखवटा नाटय़ांशी आढळून येते. मात्र भोवाडय़ातील पात्र मूक असतात, तर खेळय़ातील पात्र बोलतात. खेळय़ांवर लिखित स्वरूपात फारसे काही आढळून येत नाही. ही मौखिक परंपरा आहे.

साधारण फाल्गुन महिन्यात होळीच्या सुमारास कुणबी समाज गावच्या देवीच्या नावाने नमन-खेळे करण्यास प्रारंभ करतो. वैशाख महिन्यापर्यंत वेगवेगळय़ा गावांतून हा लोककला प्रकार चाललेला असतो काही गावांतील देवीची पालखी आणि खेळे कलावंतांबरोबरच बाहेर पडतात, म्हणून यांना ‘देवीचे खेळे’ म्हणूनही संबोधले जाते. प्रत्येक गावची ग्रामदेवता व तिची पालखी स्वतंत्र असते. देवींची नावेही वेगवेगळी असतात. उदा. सोमजाई, चंडिका, जाखमाता वगैरे. रवळनाथ हा देव मात्र सगळीकडे आढळून येतो. हे खंडोबाचं एक नाव असून त्याच्या मूर्तीतही साम्य आढळते. अशीही देवीची सजवलेली पालखी त्या गावातील प्रत्येक घरात ढोल, ताशाच्या गजरात फिरवली जाते. पालखी गेली की, खेळे येतात. पायघोळ झगे, उपरणे, डोक्यावर पगडी, हातात टाळ अशी वेशभूषा केलेली दहा-बारा मंडळी अंगणात येऊन देवीची नमने म्हणायला सुरुवात करतात. या वेळेस मृदुंग वादक, संकासुर व स्त्र्ााr वेषातील पुरुष (कोळीण) खेळय़ापुढे नाचत असतात. काही नमने झाल्यावर यजमानांकडून आरती व दक्षिणा घेऊन मंडळी पुढील घरी जातात. हा त्यांचा मान समजला जातो.

नमनाची सुरुवात करण्यापूर्वी दोन बाजूला दोन मृदुंग वादक उभे असतात. मध्यभागी सूत्रधार असतो. नमनाची सुरुवात सूत्रधार करतो व त्याच्या मागून इतर मंडळी त्याच ओळींची आवर्तने करतात. अशा तऱहेने बारा नमने होतात. यात देवादिकांबरोबर चंद्र, सूर्य, समुद्र, गावचा पाटील व प्रेक्षकांनाही अभिवादन असते. बारा नमनांनंतर ‘संकासुर’ प्रवेश करतो. याचा पोशाख दशावतारातील संकासुरासारखाच असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. तिने त्याचा संपूर्ण चेहरा झाकलेला असतो. दिसण्याकरिता दोन छिद्रे ठेवलेली असतात. हा मूकपणे नृत्य करीत असतो. कधी कधी याच्या बरोबर स्त्र्ााr वेषातील पुरुषही (गोमू) नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा संकासुर, मृदुंग वादक व कोळीण यांचा गाण्याच्या व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो.

खेळय़ात प्रथम गणपतीचे सोंग आणले जाते. सूत्रधार गणपतीच्या जन्माची कथा गीतातून सांगत असतो. प्रेक्षकांसमोर पडदा धरला जातो (यक्षगानातही तो पात्रांच्या आगमनापूर्वी धरला जातो). सूत्रधाराच्या गणपती स्तवनाबरोबर पडदा मृदुंगाच्या तालावर हलत असतो आणि थोडय़ाच वेळात पडद्याच्या वर गणपतीचा मुखवटा दिसू लागतो. गाण्याच्या व मृदुंगाच्या ठेक्यावर मुखवटा डोलू लागतो. गणपतीच्या निर्गमनानंतर नटवा हे लौकिक पात्र येते. जो नटतो तो नटवा म्हणून त्याने माणसाचा मुखवटा घातलेला असतो. यानंतर काही अंगसोंगे येतात. त्यात दोघे तिघे मिळून एखाद्या घटनेवर उत्स्फूर्त संवादातून नाटय़ उभे करतात व त्यातून करमणूक करण्याचा प्रयत्न करतात. इथे पूर्वरंग संपतो.

उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथानकांचा समावेश असलेले एखादे आख्यान लावले जाते. यामध्ये रामायण, महाभारतातील कथांचा विशेष समावेश असतो. सूत्रधार गाण्यातून कथाभाग जोडत असतो व कथानक पुढे नेत असतो. काही लाकडी मुखवटे घातलेली देवादिकांची व प्राण्यांची सोंगेही आणली जातात. शेवटी रावणाचे सोंग येते. दहा तोंडांचा मुखवटा घालून रावण प्रेक्षकांतून ढोल -ताशांच्या तालावर नाचत आरोळय़ा ठोकत प्रवेश करतो. शेवटी राम-रावण युद्ध होते व रावण मारला जातो. रावणवधानंतर खेळय़ांचा मुख्य सूत्रधार यजमानांकडून आरती घेतो. खेळे देवांची आरती म्हणतात व रात्रभर चाललेला हा खेळ पहाटे समाप्त होतो.

– [email protected]