छोटीशी गोष्ट – कॅक्टस?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुरेश वांदिले

गॅलरीतील बागेमध्ये तेजोमयीच्या आईने मोठय़ा प्रेमानं ब्रह्मकमळ लावलं होतं. या झाडास फूल आलं की, आई त्याविषयी आजूबाजूच्यांना, नातेवाईकांना उत्साहाने साग्रसंगीत सांगायची.

कळी आल्यापासून ते कळीचं रूपांतर पूर्ण फुलात होईपर्यंत आईचं ब्रह्मकमळमय होऊन जाणं हे नित्याचंच झालं होतं. याचं आताशा बाबा आणि तेजोमयीस फारच नवलं राहिलं नव्हतं.

मात्र काही महिन्यांपासून आईच्या ब्रह्मकमळ साग्रसंगीत उत्सवात अलेक्झांडरचा (द डॉगी) समावेश झाला होता. या वर्षी तोही ब्रह्मकमळमय होऊन गेला.

यंदा आईने कळी आली त्या दिवसापासून दररोज व्हिडीओ चित्रीकरण केलं. त्यामुळे कळीची वाढ, पूर्ण उमललेलं फूल असा प्रत्येक टप्पा चित्रित झाला. हा यंदासाठी आईचा नवा आनंद होता.

या आनंदात परवा एक मिठाचा खडा पडला. तिच्या चुलत बहिणीने ब्रह्मकमळाविषयी एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर आलेली माहिती पाठवली. त्यात म्हटलं होतं की, अनेकांच्या घरी असतो तो खरा ब्रह्मकमळ नाहीच्च मुळी! तो एक प्रकारचा कॅक्टस आहे. खरा ब्रह्मकमळ फक्त हिमालयातच एके ठिकाणी उगवतो.

आईने ती माहिती जोराने वाचून दाखवली.
“मग आई, तू आता काय करणार?” तेजोमयीने विचारलं.
“दु:खी बिख्खी होऊ नकोस” बाबांनी सल्ला दिला.
“अहो, मी कशाला दु:खी होऊ! आपल्या घरी असणारं झाड कॅक्टसचं असेल म्हणून काय झालं, त्याला येणारी कळी, मग आठ-दहा दिवस तिचं हळुवार मोठं होणं आणि एके दिवशी रात्री छान उमलणं, किती आनंददायी असतं. हे फूल समजा ब्रह्मकमळाचं नसेलही, पण पूर्ण उमललेलं फूल, त्यातले डोलणारे तुरे, कमळाच्या आकाराच्याच पाकळ्या, थोडा करडय़ा रंगाची छटा ल्यालेला पांढराशुभ्र रंग… अहाहा, याचा आनंद काय वर्णावा!” आई म्हणाली.
बाबा आणि तेजोमयी आईकडे बघतच राहिले. छोटय़ा छोटय़ा गोष्टीतही आनंद शोधणारी आई खूप ग्रेट असल्याचं तेजोमयीस वाटलं.
तुझ्याआधी ते मला कळलं बाई, असे भाव त्या वेळी अलेक्झांडरच्या डोळ्यांत उमटले होते.
आपणांस हे कधी बरं जमेल, असं त्या वेळी बाबांना वाटून गेलं.