
>> स्वप्नील साळसकर
सुंदर तेचि वेचावे, सुंदर करोनी मांडावे स्व-इतरांसाठी, स्वीकारलेले काम नेटाने पार पाडणे हाच यशाचा मार्ग, प्र्रयत्न करत रहा आणि आनंदाने जगा असे अनेक शुभेच्छा संदेश पोस्टकार्ड पत्राच्या माध्यमातून संग्रहित करण्याचा आगळावेगळा छंद निकेत पावसकर या तरुणाने जोपासला आहे. नुकताच ‘टपाल दिन’ साजरा झाला. त्यानिमित्ताने निकेतची ही पत्रमैत्री समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरे या छोटय़ाशा गावात राहणाऱया या अवलियाने वयाच्या 21 व्या वर्षापासून देशविदेशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून मिळवलेली जवळपास साडेबाराशेहून अधिक पत्रे त्याची जीवनसोबती बनली आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून हा अनमोल ठेवा सर्वांसमोर मांडत असल्यामुळे निकेत हस्ताक्षर संदेशाचा संग्राहक म्हणून सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे.
अनेकांना लहानपणापासूनच तिकिटे, शंखशिंपले, वृक्षांची पाने, पक्ष्यांची पिसे यासारखे वेगवेगळे छंद असतात, तर काही वेळेला उशिराने छंद जोपासण्याची सवय जडते. त्याला निमित्तही तशीच घडत असतात. शुभेच्छांसह हस्ताक्षर संग्रहाचे वेड हे अशाच प्रकारे सुचले. त्या वेळेला निकेतचे वय साधारण 21 वर्षे होते. त्यावेळी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ही बातमी कळल्यानंतर आपणही त्यांना शुभेच्छा द्याव्यात असे निकेतला वाटले आणि मग एका पोस्टकार्डवर त्याने आपली एक कविता लिहून त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे अभिनंदन केले. पत्र पोहोचल्यानंतर काही दिवसांत त्या पत्राचे उत्तर आले आणि निकेतचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्यासारख्याच्या शुभेच्छांना न चुकता उत्तर देणाऱया विंदा करंदीकरांच्या पत्राने एक वेगळी ऊर्जा निर्माण केली आणि इथेच या अक्षररूपी शुभेच्छा संदेश पत्रसंग्रहाचा जन्म झाला आणि त्या वेळेपासून मनात एकच विचार निकेतला स्वस्थ बसू देईना.
निकेतने मग साहित्यिक, कवी, अभिनेते, दिग्दर्शक, शास्त्र्ाज्ञ, खेळाडू यांच्याशी पत्रमैत्री जपण्यास सुरुवात केली. त्यासाठी तो आपल्या संग्रहातील आवाहनपत्र दोन पोस्टकार्ड, लखोटा आपल्या पत्त्यासहित पाठवतो. काही पत्रे 50 ते 60 वेळा पाठवूनही उत्तरे मिळाली नाहीत, काही पत्रे माघारी आली. परंतु निराश न होता इंटरनेटशिवाय इतर माध्यमांतून मान्यवरांचे राहत्या ठिकाणचे पत्ते मिळवत पुन्हा पत्र पाठवून अखेर शुभेच्छा मिळवण्यात निकेत यशस्वी झाला. मात्र शुभेच्छा संदेश देताना पोस्टकार्डचा हट्ट त्याने कायम ठेवला. आजच्या घडीला निकेत येथील महाविद्यालयात क्लार्कची नोकरी करून एका वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि त्यात आपला छंदही जोपासतो. आठवडय़ातून रविवारी किंवा अन्य सुट्टी दिवशी त्याचा हा पत्रप्रपंच सुरू असतो. तळेरेसारख्या ग्रामीण भागात राहून एका पत्राच्या निमित्ताने देशविदेशातील अनेक व्यक्तींशी त्याची पत्रमैत्री जुळली आहे. आज म्हणता म्हणता साडेबाराशेहून अधिक पत्रांच्या विचारांचा खजिना निकेतने जमा केला. त्याचबरोबर माघारी आलेली पत्रेही जपून ठेवली आहेत.
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील निकेतचे ‘स्वप्नपूर्ती’ निवासस्थान अक्षरांनीच भरले आहे. आतापर्यंत ललित लेखक रवींद्र पिंगे, नटवर्य आत्माराम भेंडे, डॉ. विद्याधर करंदीकर यांच्याशी निकेतची उत्तम पत्रमैत्री झाली. अभिनेते संजय खापरे, प्राजक्ता वाडये, कवी प्रा. प्रदीप पाटील, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, दिग्दर्शक प्रदीप कदम यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी निकेतने जोपासलेला हा अनमोल ठेवा आवर्जून पाहिला आहे.
इंटरनेट, सोशल मीडियाच्या दुनियेत पोस्टकार्ड गायब झाले असले तरी अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभेच्छांमुळे ते आपल्याकडे कायमस्वरूपी राहणार आहे असे निकेत सांगतो. पत्रसंग्रहाचे पहिलेच प्रदर्शन जळगावमध्ये भरले. त्यानंतर बेळगाव, नाशिक आणि सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली तालुक्यात कासार्डे, तळेरे, मालवण तालुक्यातील आचरा येथे आयोजित प्रदर्शनांनाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यावेळी मान्यवरांचे संदेश आणि सह्या पाहून सर्वांच्याच येणाऱया प्रतिक्रिया बोलक्या होत्या. शिवाय आकर्षकपणे केलेली त्यांची ठेवण सर्वांनाच भावली.
सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरे या छोटय़ाशा गावात राहणाऱया या अवलियाने वयाच्या 21 व्या वर्षापासून देशविदेशातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून मिळवलेली जवळपास साडेबाराशेहून अधिक पत्रे त्याची जीवनसोबती बनली आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून हा अनमोल ठेवा सर्वांसमोर मांडत असल्यामुळे निकेत हस्ताक्षर संदेशाचा संग्राहक म्हणून सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे.
महनीय व्यक्तींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार
शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून दिलेले संदेश प्रेरणादायी असून अशा महनीय व्यक्तींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी शाळांमध्ये प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस आहे आणि त्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिह्यातील शाळांमधून करणार असल्याचे निकेत आवर्जून सांगतो. शिवाय हा सांस्कृतिक खजिना ‘स्वप्नपूर्ती’ या निकेतच्या निवासस्थानी पाहता येईल. यासाठी 9403120156 या क्रमांकावर संपर्क साधावा.





























































