
>> उदय देवळाणकर
यंदाच्या अमृत महोत्सवी हिंदुस्थानी स्वातंत्र्यदिनाला कोरोना संकटाची एक गडदसर पार्श्वभूमी आहे. संपूर्ण जग आज या संकटाचा सामना करण्यात व्यग्र आहे. पण सद्यस्थितीत मानवी समाजाने शांतपणाने आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. गावखेडय़ांमध्ये कृषी उत्पादनावर तिथेच प्रक्रिया करण्यास प्राधान्य द्यायला हवे. भांडवलाचा हव्यास कमी करायला हवा. तसे झाले तर आपल्या मातीत, माणसांत आणि शेतीत इतकी क्षमता आहे की,अशा समस्यांना निश्चित उत्तर मिळू शकेल.
जगाच्या सुरुवातीला म्हणजे मानवी संस्कृतीचा विकास सुरू झाल्यानंतर जगात दोन प्रकारच्या प्रमुख विचारांनी आणि संस्कृतींनी जन्म घेतला. एक होती उत्पादकांची संस्कृती. सामाजिक कौशल्य, सामाजिक सद्भावना, सामाजिक कामांचं वाटप, त्यातून आयुष्याची प्रत किंवा गुणवत्ता वाढवतील अशा पदार्थांचं उत्पादन यातून हिंदुस्थानी संस्कृतीचा विकास होत गेला. युरोपीय देशांमध्ये शेतीचा हंगाम पाच-सहा महिन्यांचा असतो. विषुववृत्तीय वातावरण असलेल्या भागात रेनफॉरेस्ट आहेत आणि तिथे दररोज पाऊस पडतो. त्यामुळे तेथे नियंत्रणातील शेती करणे शक्य होत नाही. अन्य ठिकाणी वाळवंटीय प्रदेशात पर्जन्यमान अत्यंत कमी असल्याने सलग शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे तेथे मानवी संस्कृतीचा विकास करणे शक्य नव्हते. युरोपातही सहा महिने बर्फ पडलेला असल्याने तिथे अन्न प्रिझर्व्ह करून टिकवलेले असायचे; पण त्याला एक प्रकारचा वास यायचा. त्यात व्हॅल्यू ऑडिशन करण्याचे काम हिंदुस्थानी मसाल्यांनी केले. हिंदुस्थानातून जो व्यापार सुरू झाला त्यातून लवंग, दालचिनी, तमालपत्र, लसूण, कांदा, आले हे हिंदुस्थानी पदार्थ तेथे जाऊ लागले. यामुळे तेथील नागरिकांच्या आयुष्यालाही एक रुची आली. कापडाचा शोधही हिंदुस्थानने लावला.
जुन्या जगात आपल्या खेडय़ांमध्ये बारा बलुतेदार आणि 18 कारखाने अशी व्यवस्था होती. त्यातून तयार झालेल्या उत्पादनांचे वहन करून राजस्थानात नेले जायचे. तेथे शेती कमी असल्याने हिंदुस्थानातून जाणाऱया या मालाची वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये विभागणी, साठवणूक व्हायची. तिथून मग बंजारा, बलुचांच्या टोळ्या हा माल अटकेपार घेऊन जायच्या. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा माल जायचा. याखेरीज नालासोपाऱयापासून जॉर्डनपर्यंत जहाजाद्वारे हा माल वाहून नेला जात असे. या सर्व मालाचे देयक देण्यासाठी चलन म्हणून सोन्या-चांदीच्या मुद्रा दिल्या जायच्या. त्यातून हिंदुस्थानचे सुवर्णवैभव वाढत गेले. या गोष्टी जर हिंदुस्थानकडून जगाने शिकल्या असत्या तर एक प्रकारचा समतोल कायम राहिला असता. हिंदुस्थानात कृषी संस्कृतीचा, विचारांचा विकास होत असताना अशा प्रकारची शेती करता येईल असे कौशल्य जगाला सापडले नाही. त्याऐवजी संघटित टोळ्यांकडून जिथे खाण्याचे पदार्थ आहेत, वस्त्र्ा आहे, जडजवाहिरे आहेत ते लुटण्याची पद्धत सुरू झाली. हिंदुस्थानातून जो माल जायचा त्याची युरोपियन देशांना मोठी गरज होती. सहाव्या शतकात ग्रेट पर्शियन वॉर झाले. या युद्धात मुस्लीम जग आणि ख्रिश्चन जग यांच्यात फार मोठा संघर्ष झाला. हा संघर्ष सहाशे-सातशे वर्षे चालला. अनेक कारणांनी अखेरीस हे युद्ध लयाला गेले. परंतु या संघर्षामुळे हिंदुस्थानचा सोमालियापर्यंतचा जो व्यापार होता तो बाधित झाला. आपल्या पदार्थांना बाजारपेठा मिळवणे अवघड जाऊ लागले.
ब्रिटिशांनी 126-27 देशांवर राज्य केले. पण जगभरात राजवटी करताना शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण केली गेली. त्यातून मोठय़ा शहरांची निर्मिती झाली. अनैसर्गिक पद्धतीने माल, पैसा, पदार्थ यांचे केंद्रीकरण सुरू झाले. संचय केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांना क्षमता वाढवावी लागली. यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे युग आले. तसेच कामगारांची चणचण भासू लागली. ती दूर करण्यासाठी शेतीवर दबाव आणण्यात आला. गावागावातील उद्योग बुडवून त्यांना शहरांकडे पलायन करण्यास भाग पाडले. यातून ब्रिटिशांना स्वस्तात कामगार मिळू लागले. यातूनच एका मोठय़ा भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला आणि तो यशस्वी झाला. पण याच व्यवस्थेमुळे अतिश्रीमंत आणि अतिगरीब व्यक्तींचा समावेश असलेली जास्त घनतेची शहरे आकाराला आली. या शहरांमध्ये ज्यांच्याकडे प्रचंड उत्पादनाचे कौशल्य होते ते न टिकल्याने गरीब बनलेले लोक अकुशल काम करू लागले. ज्याचे वडील कधी एकेकाळी उत्कृष्ट सुतार होते – चाके बनवायचे त्यांची नातवंडे या शहरांत विटा उचलण्याचे काम करताना दिसू लागली.
वास्तविक आपल्याकडे कृषककौशल्य आठ-दहा हजार वर्षांपूर्वीपासूनचे आहे. रामायणातील राम आणि सीता हे परस्पर पूरक का होते. कारण जनककन्या सीतेला वनाचे पूर्ण ज्ञान होते. कुठल्याही झाडाला त्याचा जीव न घेता त्यापासून अन्न कसे मिळवायचे याचे कौशल्य सीतेकडे होते. कंदमुळांपासून सर्वांचे ज्ञान सीतेला अवगत होते. सीतेच्या या कृषककौशल्याविषयी रामानेही कृतज्ञताभाव व्यक्त केला होता. सीता हा शब्दच मुळात नांगराशी संबंधित आहे. पण आपल्या संस्कृतीच्या या सर्व धारणांवरच घाला घालण्यात आला. मानवी अव्यवस्थापनाचे हे प्रतीक आहे.
आज मुंबई, बँकॉक, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, सॅनफ्रान्सिस्को, जास्त घनतेच्या झगमगीत महानगरांमध्ये काय दिसते? जुगाराचे अड्डे, प्रचंड प्रमाणात येणारा काळा पैसा यांची सद्दी दिसते. ज्याला-ज्याला आपण असंस्कृतिक गोष्टी म्हणतो त्यांना इकॉनॉमीच्या खाली इथे संरक्षण दिलेले दिसते. इथे उधळण्यात येणारा प्रचंड प्रमाणातील पैसा हा पृथ्वीचे दोहन करून, कष्टकऱयांचे शोषण करूनच आलेला असतो. या भांडवलाची हाव प्रचंड असल्याने आपण एका दलदलीत फसत चाललो आहोत. कोरोनाच्या महामारीनंतर हे उजागर झाले आहे.
याउलट आज जुन्या पद्धतीप्रमाणे रचना असती, आपल्याकडील लोकांना खेडय़ात काम असते तर आजच्या इतकी भयानक परिस्थिती झाली नसती. जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमावर जेव्हा अणुबॉम्ब टाकण्यात आले त्यानंतर काही क्षणात जपानच्या सम्राटाने केलेले भाषण ही मानवजातीसाठीची एक प्रकारे गीताच म्हणावी लागेल. सम्राटाने असे कबूल केले की, अतिरेकी पिपासू वृत्ती आमच्यात जोपासली गेली त्याचा परिणाम म्हणून हा केवळ जपानवरच बॉम्ब पडलेला नसून ते मानवाचे नष्टचर्य आहे. इथून पुढे जपान हा निःशस्र देश असेल. आम्ही शांततेच्या मार्गाने जाऊ. त्याच वेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांपेक्षा देशांतर्गत तांदळाचे दर तिप्पट करून टाकले. त्यातून जपानमधील झोपडी-झोपडीत पैसा गेला. त्या बचतीतून जपानमध्ये छोटेछोटे उद्योग उभे राहिले आणि आज जपान मोठय़ा उद्योगांचा देश आहे. कोल्हापुरात, पंजाबमध्येही आपण हे पाहिले आहे. गावाखेडय़ांमध्ये कृषी उत्पादनावर तिथेच प्रक्रिया करण्यास प्राधान्य द्यायला हवे. भांडवलाचा हव्यास कमी करायला हवा. तसे झाले तर आपल्या मातीमध्ये, माणसामध्ये आणि शेतीमध्ये इतकी क्षमता आहे की अशा समस्यांना निश्चित उत्तर मिळू शकेल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आजन्म प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्या काळात शेतकरी ज्या धातूने शेती करायचा त्याच धातूने लढाईही करायचा. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी इंग्रजांना निःक्षून ही गोष्ट सांगितली की, तुम्ही आमच्या शेतकऱयांना लुटायचे नाही. पुरू राजाने अलेक्झांडरला सांगितले होते की, तुझी फौज चालत जाण्याने आमच्या शेतीचे नुकसान होते. बाजीराव पेशव्यांच्या फौजा आपल्या ज्वारीच्या शेतातून गेल्यावर मल्हारराव होळकरांनी त्यांना ढेकूळ फेकून मारले होते. मल्हारराव असोत किंवा पुरू राजा यांच्यातील वृत्ती सर्वांमध्ये असायला हवी. शेतीवर पडणारे छोटेसे पाऊल किंवा अतिक्रमण विघातक ठरू शकेल, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.
हिंदुस्थानी स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना कोरोना महामारीमुळे आज सबंध जग एका विचित्र अवस्थेत सापडले आहे. सर्व यंत्रणा, आरोग्य व्यवस्था, बाजारपेठ, मूल्यप्रणाली, शिक्षण व्यवस्था, व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्था आणि एकूणच सृष्टीवर अधिराज्य गाजवण्याचं आपलं मोठेपण हे सारं धोक्यात आलं आहे. आजवर मानवाला या सर्वांवर नियंत्रण मिळवल्याचा अभिमान होता. पण आज कोरोनानं या समजाला छेद दिला आहे. वास्तविक, अतिप्राचीन काळात डायनासोरपासून मॅमॉथपर्यंत अनेक प्रजातींनी अशा अनेक विषाणूंचा सामना केला. त्यांचंही नष्टचर्य आलं. मानवानंही आजवर अनेक संकटांना तोंड दिलं. पण अनेक पशू-पक्ष्यांना जशी आगामी संकटाची चाहूल लागते तशी मानवाला या संकटाची किंवा त्याच्या भयावहतेची चाहूल लागली नाही. असे का झाले? आज जगाची जी अवस्था होऊन बसली आहे त्याचं मूळ कशात आहे?
(लेखक ज्येष्ठ कृषीतज्ञ आहेत.)





























































