स्त्री-लिपी – भूमिकन्या बहिणाबाई!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

भारतीय स्त्री किती भूमिका बजावत असते, ती आतून किती कणखर आहे, खंबीर आहे याचं प्रत्यंतर बहिणाबाईंची कविता देते. बहिणाबाईंच्या मातीतील अस्सल कवितेचा हा प्रवास आत्मशोधाचा अन् तितकाच माणूसपणाच्या शोधाचाही ठरला.

स्त्रियांच्या कविता लेखनाच्या सुरुवातीच्या काळात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इथल्या मातीतली अस्सल कविता लिहिली ती बहिणाबाई चौधरी यांनी. मात्र तिला प्रकाशात यायला 1952 साल उजाडावं लागलं. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या कविता त्यांचे पुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी काहीशा संकोचानं आचार्य अत्रे यांना दाखवल्या. अत्र्यांना त्या कविता म्हणजे जणू ‘शेतात सापडलेला मोहरांचा हंडा’ वाटल्या आणि त्यांनी तत्काळ त्या प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे प्रकाशित झालेल्या त्या संग्रहाला फार सुंदर आणि जिव्हाळ अशी प्रस्तावनाही अत्र्यांनी लिहिली.

1880 चा बहिणाबाईंचा जन्म. जळगावच्या परिसरात, शेतात काम करताना त्यांची प्रतिभा बहरून आली आणि मराठी साहित्य विश्वाला ‘साहित्य सोनियाची खाण’ गवसली. रूढ अर्थानं शिक्षण नसताना, अक्षर ओळख नसताना या प्रतिभाशाली कवयित्रीनं ज्या रचना केल्या त्यांचं नातं थेट आपल्या संतपरंपरेशी आहे. ईश्वरावर त्यांची श्रद्धा आहे, पण आपण काहीच हातपाय न हलवता त्याच्यावर सारा भार टाकून राहणं त्यांना अयोग्य वाटतं. सोपानदेवांनी एक आठवण लिहून ठेवली आहे. त्यांच्या घरात एक चतुर्भुज विष्णूचं चित्र होतं. त्याकडे पाहून त्या म्हणाल्या, अरे देवाचे हात तरी कुठे रिकामे आहेत. त्याला त्याची कामं आहेत. ऊठसूट त्याला आपल्या मदतीला हाक मारू नका.

आपल्या कवितेत त्यांनी शेतीच्या सर्व बारीकसारीक कामांची चित्रे रेखाटली आहेत. ‘सुगरणीचा खोपा’ किंवा ‘अरे संसार संसार’ ही त्यांची गीतं तर मराठी साहित्यात अजरामर झालीच आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले तेव्हा त्या अवघ्या तिशीच्या होत्या. पदरात दोन मुलं होती. बाईंनी कंबर कसली आणि हिमतीनं शेतात राबून स्वाभिमानानं मुलांना मोठं केलं. ‘नका नका आया बाया नका करू माझी कीव…झालं माझं समाधान आता माझा मले जीव’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत’ असं आत्मविश्वासानं म्हणतात. हे खरं आत्मबळ!

ज्याच्यातून पीठ येतं त्याला ‘जाते’ का म्हणायचे, गुढी उभारतात त्या सणाला ‘पाडवा’ का म्हणायचे? माय म्हणताना ओठ एकमेकांच्या जवळ येतात आणि सासू म्हणताना दूर जातात, त्यातून नुसती हवा बाहेर पडते…असे अनेक भाषाशास्त्राrय बारकावे त्यांनी टिपले आहेत.
त्यांच्या काही कल्पना फार सुंदर आणि अस्सल आहेत.

हिरवे हिरवे पानं, लाल फयं जशी चोच
आलं वडाच्या झाडाले, जसं पीक पोपटाचं

किंवा

धर्तीवरील हिर्वय, गेली उडत उडत
अरे उडता उडता, झाली नियी आभायात

या कल्पना खास त्यांच्याच आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मातीशी असलेल्या नात्याच्या निदर्शक आहेत.

माझं दुखं माझं दुखं, तयघरात कोंडले
माझं सुखं, माझं सुखं, हंड्याझुंबरं टांगले

किंवा

आधी हाताला चटके तेव्हा मियते भाकर, अशा त्यांच्या ओळी सुभाषित म्हणून रुजल्या आहेत. आयुष्याचा ग्रंथ त्यांनी फार मनपूर्वक वाचला होता. त्यांनी म्हटल्याप्रमाणे जात्यामधून पीठ यावं तसं तसं माझं गान पोटातून येतं ओठी. इतकी कमालीची सहजता आणि उत्स्फूर्तता त्यांच्या भाषेत आहे.

छापलेला कागदही शहाणा होतो, माणसा तू कधी शहाणा होशील? अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस…असं त्यांनी कळवळून विचारलं आहे.
‘मन वढाय वढाय’ या कवितेत मनाचं तंतर न्यारं आहे…हे त्यांनी किती जाणकारीनं सांगितलं आहे. जगणं आणि मरणं यात केवळ एका श्वासाचं अंतर आहे,
आला सास गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं मरनं
एका सासाचं अंतर
असं तत्त्व त्यांना अनुभवातून उमजलं आहे आणि कवितेत उमटलं आहे.
त्यांच्या रचना ओवी छंदात आहेत, प्रासादिक आहेत, गेय आहेत. यमक अनुप्रासांनी सहजपणे लोभस झाल्या आहेत.
त्यांच्या कवितेत आत्मशोध आहेच, पण माणूसपणाचाही शोध आहे. भारतीय स्त्राr किती भूमिका बजावत असते, ती आतून किती कणखर आहे, खंबीर आहे याचं प्रत्यंतर बहिणाबाईंची कविता देते. कधीही या निसर्गकन्येची कविता काढून वाचा. अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही, कौतुकाने मन दाटल्याशिवाय राहत नाही.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)