स्त्री-लिपी – स्वयंभू व्यक्तिमत्त्वाची ‘खूण’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

स्त्री-पुरुष समानतेच्या वरवरच्या देखाव्याला ‘समानतेची फसवी मृगजळे’ मानणाऱ्या कवयित्री मनकर्णिका जोग. संवेदनशीलतेबरोबरच अत्यंत प्रगल्भ विचारी मन लाभलेल्या या कवयित्रीच्या कवितांनी स्त्रीवादाचे बीज पेरले.

थोर पवाडे पतिव्रतेचे
गाऊनि करिती कौतुक साचे
परि ते अमुच्या पराभवाचे
प्रतीक सुंदर, कसे आजवर
उमगले न आम्हा?

ही अशी सणसणीत कविता लिहिली आहे मनकर्णिका जोग या कवयित्रीनं. त्यांचा जन्म 1911चा आणि या ओळी लिहिल्या आहेत 1945 मध्ये!

विशेष म्हणजे ज्या काळात महाराष्ट्र नवविचारांनी घुसळून निघाला होता त्या काळात या मनकर्णिका जोग 16व्या वर्षी प्रा. श्रीधर दत्तात्रय जोग यांच्याशी विवाह होऊन मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश इथे वास्तव्यास होत्या. महाराष्ट्रात त्या 1930-31 मध्ये आल्या. एकत्र कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना इतर कुठल्याही माध्यमातून बाह्य विश्वाशी परिचय घडण्याची संधी त्यांना नव्हती की अन्य कुठल्या माध्यमातून नवविचार झुळकावे अशीही परिस्थिती नव्हती आणि तरीही कवयित्रीनं 1938-1945 या काळात अशा विलक्षण आधुनिक आशयाच्या स्त्रीविषयक कविता लिहिल्या! वर उधृत केलेल्या ओळींतून निर्जीव बाहुलीसारखं जीवन जगणाऱ्या स्त्रीच्या जीवनाविषयी जशी खंत प्रकटली आहे, तसे परखड आत्मचिंतनही.

ज्या काळात पुरुषाच्या अंकित असणं भूषण वाटत होतं त्या काळात ‘पतिव्रतेचे पवाडे गाणे’ हे आमच्या पराभवाचे प्रतीक आहे असं म्हणण्याचं धाडस त्यांच्यात कुठून आलं असेल? असा प्रश्न पडतो. ‘वंशकुलाचा ध्यास कशाला हवा?’ असा प्रश्नही त्यांनी दुसऱ्या एका कवितेत विचारला आहे. आपल्या मुलीला उद्देशून केलेल्या एका कवितेत त्या म्हणतात, तू होऊ नकोस कुणाचे खेळणे, बाळ गमतीचे – आपल्या मुलीच्या लग्नानिमित्त रचलेल्या मंगलाष्टकांतही त्यांनी

सेवा-त्याग हवा, परि न दुबळा,
सीमा तयाला हवी
स्वत्वाची नीज जाग ती महिवरी
वाढावया थोरवी

असा सावधानतेचा इशाराही देऊन ठेवला आहे.
पतीच्या प्रतिष्ठेत, त्याच्या वैभवात स्वतचे मोठेपण पाहणाऱ्या, ते मिरवणाऱया स्त्रिया आजही दिसतात, पण त्या काळात वकिलीण, मामलेदारीण, डॉक्टरीण म्हणून मिरवणाऱ्या स्त्रिया आजूबाजूला वावरत असताना मनकर्णिका बाईंना या ‘ईण’ उपाधीचा मनापासून राग येई. ‘स्त्री जातीस आवाहन’ या कवितेत त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे,

पतिवंशकीर्तीचा गौरव मात्र करावा
श्रेयात परि त्या मान तुझा न गणावा

लग्नानंतर नाव न बदलणाऱ्या किंवा माहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही नावे लावणाऱ्या स्त्रियांकडे आजही काहीशा उपहासानं किंवा फॅशन/फॅड म्हणून पाहिले जाते, पण या कवयित्रीनं 1944 साली

तू जन्मापासून चालविशी जे नाव
ते सोडू नको, जरि बघशील दुसरा ठाव
असं बजावलं आहे.

स्त्री-पुरुष समानतेच्या वरवरच्या देखाव्याला त्या ‘समानतेची फसवी मृगजळे’ म्हणतात. दिवाणखान्याची केवळ शोभा बनून राहू नकोस. स्वतच्या शिक्षणाला, विद्येला तू बंदिवान करू नकोस, असं त्या स्त्रीला कळवळून सांगतात.

त्या बनारसला असताना त्यांनी एकदा एका मुलीला गल्लीतून धावत जाताना पाहिलं. ती एका घराचे दार ठोठावी, दार उघडून कुणी तिला हाकलून देई. मग ती पळत जाऊन दुसऱ्या एका घराचे दार वाजवी. तिथेही कोणी दार उघडून तिला हाकलून लावी. ती पहिल्या घरातून दुसऱ्या घरी, मग परत पहिल्या घरी अशी धावत होती. अधिक चौकशी करता त्यांना समजलं, एक घर तिचं सासर होतं आणि दुसरं माहेर! दोन्ही घरी ती नको होती. सहजच त्यांच्या कवितेत ते दाहक वास्तव उतरलं…‘मालकी नसे ऐलतीराची, पैलतीराची आस फुकाची…’

‘मुळीच कन्यादान करणार नाही’ अशी शपथ त्यांनी घेतली आणि पुढे खरोखर ती कृतीत आणली. स्त्रियांच्या परवशतेचं मूळ पुरुषप्रधानतेत आहे हे या स्त्रीनं 1930 च्या दशकातच ओळखलं होतं. संवेदनशीलतेबरोबरच अत्यंत प्रगल्भ विचारी मन त्यांना लाभलं होतं.

काही विशुद्ध भावकविता, काही आध्यात्मिक आशयाच्या कविताही त्यांच्या ‘खुणेचं पान’ या संग्रहात समाविष्ट झाल्या आहेत. त्यांचा हा संग्रह खूपच उशिरा म्हणजे 1985 मध्ये त्यांची कन्या डॉ. शांता साठे आणि नातू नाटककार मकरंद साठे यांनी प्रकाशित केला आणि मग त्यांची कविता खऱ्या अर्थानं प्रकाशात आली !
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)