चतुरंगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

सुंदर पिसारा… गुबगुबीत शरीर आणि चार रंगांचा सुरेख मिलाफ. युरोप, अमेरिकेतील हा परदेशी पाहुणा आपल्याकडे मनापासून रमतो.

सात बेटांनी बनलेली आपली मुंबई पाणथळी पक्ष्यांमुळे सुशोभित झाली आहे. हिवाळ्यामध्ये भांडुप, मुलुंड, ठाणे, शिवडी अशा अनेक पाणथळी जागा, गिरगाव, वरळी, प्रभादेवी, शिवाजी पार्क असे सर्वच पश्चिमेकडील समुद्र किनारे इत्यादी ठिकाणी थंड प्रदेशातून, उत्तरेकडून स्थलांतरित पक्षी येतात. त्यात लहानमोठे बगळे, सुरय, अग्निपंख, बदकं असे अनेक पक्षी समाविष्ट असतात. या पक्ष्यांचे सौंदर्य प्रभात फेरी करणाऱया तमाम बांधवांना हमखास बघायला मिळते!

युरोप, आशिया व उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात चतुरंग बदकांचे वास्तव्य असते व प्रजननही होते. हिवाळ्यात दक्षिणेकडील युरोप, आफ्रिका, हिंदुस्थानी उपमहाद्वीप, दक्षिणपूर्व आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका येथे ते स्थलांतर करतात. उत्तर हिंदुस्थानातील पाणथळी जागांमध्येही हिवाळ्यात ते मोठय़ा प्रमाणात स्थलांतर करतात. हिंदुस्थानात येण्यासाठी त्यांना हिमालय पार करून यावे लागते. त्यावेळी ते हिमालयात थोडे थांबून पुढचा प्रवास करतात.
हळदी-कुंकू बदक, नकटा बदक, ब्राह्मणी बदक, खुरपी बदक, भुवई बदक अशा अनेक बदकांमध्ये चतुरंग बदक सर्वात सुंदर आहे. जणू…

कशी वर्णू मी विधात्याची कल्पक रंगसंगती
मोजक्याच रंगातही अद्भुत सृजनता किती!!

चतुरंग बदकांची लांबी 48 सें.मी. असून वजन साधारण 600 ग्रॅम असते व त्यांच्या पंखांचा पिसारा 76 सें.मी. असतो. त्यांचे डोके व मान गडद हिरवी असून छातीचा रंग पांढराशुभ्र आहे. खालील भाग तांबूस आहे. पंखांचा पुढचा भाग पिवळसर निळा असतो व मध्ये पांढरी पट्टी असते. उडताना त्यांचे फिकट निळ्या रंगाचे पुढचे पंख जणू पांढऱया रंगाने हिरव्या शरीरापासून वेगळे केले आहेत असे वाटते. नराच्या तोंडावर दोन्ही बाजूस पांढरा पट्टा असतो. मादीच्या अंगावर धूसर राखाडी व बदामी रंगाचे ठिपके असतात. पंख करडय़ा निळ्या रंगाचे असतात व त्यावर हिरवी पट्टी असते. चोच नारिंगी रंगाची असून चोच साडेसहा सें.मी. लांब असून तिचा आकार फावडय़ासारखा असतो. त्यांच्या चोचीच्या बाहेरच्या बाजूस 110 बारीक खवले / दाते असतात.

चतुरंग बदक त्यांची चोच पाण्यांत बुडवून त्यांचे अन्न (मासे व कीटक) शोधतात. त्यांच्या चोचीच्या आकारामुळे अन्न चोचीत राहून पाणी गाळल्यासारखे वेगळे होते. त्यांच्या चोचीला काटय़ासारखे दात असल्यामुळे त्यांना पाण्यातील खेकडे, कोळंबी, शिंपले पकडण्यास सोपे जाते. या त्यांच्या खुबीमुळे त्यांना अन्न शोधण्यासाठी स्पर्धा करण्याची आवश्यकता नसते. जीवजिवाणूचे प्रमाण जास्त असलेल्या पाणथळीच्या जागा हे त्यांचे आवडीचे ठिकाण.

मातीत खड्डा करून त्यावर पालापाचोळा घालून हे आपले घरटे गवतामध्ये, खोल पाण्यापासून दूर बांधतात. एकावेळी मादी 9 अंडी घालते. मादी जेव्हा घरटय़ातून बाहेर पडते तेव्हा अंडय़ाच्या सुरक्षितेसाठी त्याच्यावर आपली विष्ठा घालते. प्रजननाच्या वेळी नर आपल्या मादीच्या जवळपास राहून तिचे दुसऱया नरांपासून रक्षण करतो. हे आपल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ असतात. आपला जोडीदार हिवाळ्यात निवडून नर-मादी स्थलांतराच्या काळापर्यंत एकत्र राहतात. एकेका मादीला 10-12 नर आकर्षित करत असल्यामुळे नरांमध्ये मादी मिळवण्यासाठी खूप स्पर्धा असते. नर जरी आकाराने मोठे दिसले तरी अतिशय चपळ असतात. नराची साद ‘क्लन्क क्लन्क’ असते, पण मादी मात्र ‘क्कॅक क्कॅक’ असे ओरडते.

नर चतुरंग बदक 16 वर्षे 7 महिने जगलेले आहेत असा संदर्भ आढळतो. आजच्या मितीला जगामध्ये या पक्ष्यांची संख्या 5 दशलक्षांहून अधिक आहे.

– [email protected]