दिमाखदार तुरा

240

>> विद्या कुलकर्णी

पुराणांमधून व दंतकथेतून अनेक पक्ष्यांचा उपयोग ‘निरोप्या- दूत’ असा केलेला आढळतो. ‘हुदहुद  या पक्ष्यानेही पैगबंर हजरत सुलेमानच्या काळात दूताचे काम केले, असा उल्लेख आहे. इजिप्तमध्ये या पक्ष्यांना पवित्र मानले आहे म्हणूनच कबरी आणि मंदिराच्या भिंतींवर या पक्ष्यांचे चित्रीकरण केलेले आहे. 

 हा पक्षी ‘हु-पो – पो, हु – पो – पो, असा आवाज काढतो म्हणून त्याला ‘Hoopoe’ म्हणतात.

 हे पक्षी ‘नाकतोडे, झुरळे, टोळ, मुंग्या’ असे शेतीला नुकसान करणारे सर्व प्रकारचे किडे खात असल्यामुळे शेतकऱयांचे मित्र आहेत.

हे पक्षी नदी, ओढे आणि तळ्याच्या अवतीभोवती एकेकटे किंवा जोडीने वावरतात. नदीकाठच्या किंवा उद्यानामधल्या हिरवळीवर ‘चट्टेरी पट्टेरी अंगरखा’ नेसलेले हे पक्षी मान खाली घालून घाईघाईत त्यांच्या टोकदार चोचीने जमीन खोदताना दिसतात. चोच हे त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे हत्यार आहे. चोचीने जमीन पोखरीत हे पक्षी किडय़ांना अचूक पकडतात. एकमेकांशी भांडतानासुद्धा चोचीचा उपयोग करतात. उडण्याऱया कीटकांचे पंख, पाय चोचीने उखडून त्यांना खडबडीत जमिनीवर आपटून मारतात.

हे पक्षी एका मोसमात एकाच जोडीदाराबरोबर राहतात. नर वारंवार ओरडून आपल्या भागाची मालकी जाहीर करतो. मादीला मिळवण्यासाठी नरांमध्ये खूपच मारामारी होते. मारामारीत प्रामुख्याने चोचीचा उपयोग केला जातो. या पक्ष्यांमध्ये प्रियाराधनेच्या काळात नर मादीचे मन जिंकण्यासाठी तिला आवडणारे कीटक देऊन तिला आपलेसे करण्याचा प्रयत्न करतो. फेब्रुवारी ते मेदरम्यान झाडाच्या खोडात असलेल्या भोकात किंवा पडक्या घरात छपराखाली असलेल्या सपाट भागात हे पक्षी घरटे बांधतात. या पक्ष्यांकडे घरटय़ाचे संरक्षण करण्यासाठी एक वेगळीच क्षमता आहे. मादीला धोक्याची चाहूल लागली की ती लगेच एक अतिशय घाणेरडे वास येणारे द्रव्य बाहेर टाकून घरटय़ाभोवती पसरवते त्यामुळे शत्रू आपोआपच दूर जातो. या वासामुळे शिकाऱयांना रोखण्यास मदत होते तसेच संभाव्यतः संसर्गजन्य जिवाणूंपासून पिलांचे संरक्षण होते. पिले सक्षम झाली की मादीची हे द्रव्य निर्माण करण्याची क्रिया थांबते. प्रदेशानुसार मादी 4 ते 12 पर्यंत अंडी एकाच वेळी न घालता क्रमवारीने घालते त्यामुळे पिले वेगवेगळ्यावेळी अंडय़ातून बाहेत येतात. अंडी गोलाकार असून मखमली निळ्या रंगांची असतात. ती उबवण्याचे काम मादी 15 ते 18 दिवस घरटय़ातच राहून एकटीच करते. नर मादीला अन्न पुरवण्याचे काम करतो. मादी पिलांचे संगोपन 9 ते 14 दिवस घरटय़ातच राहून करते, पण नंतर मात्र तीसुद्धा अन्न मिळवण्यासाठी नराबरोबर बाहेर पडते. 26 ते 29 दिवसांत पिले सक्षम होऊन घरटय़ाबाहेर पडतात.

मी झालना व भरतपूर येथे हुदहुद पक्ष्यांचे फोटो काढले आहेत. सर्वसाधारणपणे जमिनीवरच हे पक्षी आढळतात त्यामुळे आपल्यालाही खाली बसूनच कॅमेऱयामध्ये टिपावे लागते. या पक्ष्यांचे तुरा फिस्कारलेले फोटो काढताना वाटले.

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या