
>> विनायक
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एका प्रचंड अशनीने अवकाशातून प्रचंड वेगाने कोसळून तोपर्यंत पृथ्वीवर पसरलेल्या महाकाय डायनोसॉरचा विनाश केला नसता तर आजचा विकसित माणूस इतकी प्रगती आजच्या अनिर्बंध वेगाने करू शकला नसता. बुद्धीची नैसर्गिक देणगी मिळाल्याने डायनोसॉरच्या बंदोबस्ताची किमया माणसाने केलीच असती, परंतु इतर प्राण्यांना कह्यात आणण्याइतपं ते सोपं मात्र ठरलं नसतं. आजसुद्धा काही रानहत्तींचे किंवा गव्यांचे कळप मानवी वस्तीला हैराण करू शकतात, तर त्यांच्यापेक्षा पैक पटींनी बलशाली आणि अक्राळविक्राळ असणाऱया डायनोसॉरसारख्या प्राण्याचा सामना करणं अवघड गेलं असतं हे निश्चित.
तो प्रश्न निसर्गानेच सोडवला आणि नंतर अनेक प्राण्यांची कुचंबलेली अवस्था संपून तेही आकाराने वाढले. पुढे माणसाने त्या सर्वांनाच वेठीला धरले ते आजतागायत. महाकाय प्राण्यांना ‘माणसाळवण्याचं’ तंत्र त्याने आत्मसात केलं. ते कसं ते नंतरच्या लेखात, परंतु पृथ्वीचं ‘राज्य’ हाती आल्यावर गेल्या काही हजार वर्षांत माणसाने पृथ्वीचा चेहरामोहराच बदलला. अधून-मधून बसणारे सुनामी अथवा भूपंपाचे धक्के पचवत माणूस अजून तरी भूमीवर ठामपणे उभा आहे. इतपंच नव्हे तर या ग्रहाला ‘पर्याय’ शोधावाच लागला तर चंद्र, मंगळाकडेही त्याची नजर लागली आहे.
निसर्गक्रमाने केव्हातरी हिमयुग अवतरलं किंवा प्रलय होऊन मानवी वस्तीला धोका निर्माण झाला तर त्याची चाहूल लागण्यापूर्वीच जगण्याची तजवीज आपण करून ठेवू हे खरं, पण इतर अचल वनस्पती जग आणि स्वतःला न वाचवू शकणाऱया प्राण्यांचं, जिवांचं काय होईल हा प्रश्नच आहे. यातून एक विचार पुढे आला की, माणसासारखं आणखी कोणी ‘बुद्धिमान’ पृथ्वीवर ‘राज्य’ करू शकेल का?
…आणि उत्तर आलं ‘ऑक्टोपस’ पिंवा अष्टपाद! हा सागरतळी वस्ती करून असणारा, क्वचित सागरकिनारी येणारा आणि ‘फिशिंग’मध्ये काही माणसांचं खाद्यही ठरणारा गिळगिळीत जीव तग धरून राहील. कारण ऑक्टोपस ‘बुद्धिमान’ असण्याचे अनेक पुरावे वैज्ञानिकांना आढळले आहेत. सागरतळी, सुमारे साडेसहा हजार फुटांवर विहरणारा हा जलचर फारच विशेष सजीव आहे. या लिबलिबीत जिवाच्या सुमारे 300 प्रजाती असून चार वर्ग प्रकार आहेत. बिलकूल ‘कणा’ नसलेला हा अष्टपाद म्हणजेच आठ ‘पायां’चा ऑक्टोपस. एकेकाळी समुद्री राक्षस पिंवा सी-मॉन्स्टर मानला जायचा इतका उपद्रवीसुद्धा आहे. ग्रीक भाषेतील ‘ऑक्टो’ म्हणजे आठ आणि ‘पस’ म्हणजे पाय. यावरून त्याचं नाव ‘ऑक्टोपस’ पडलं. त्याचे आकार निरनिराळे. पोहताना सगळे ‘पाय’ मागे करून ‘धूमकेतू’ला शेपूट फुटल्यासारखा तो पाण्यातून लीलया संचार करतो. त्याचं सर्वसाधारण वजन 10 ते 50 किलो असतं, परंतु काही महाकाय ऑक्टोपस 70 ते 270 किलो वजनाचेही असतात. काही स्वजातीय छोटे ऑक्टोपस, छोटे मासे आणि इतर सूक्ष्म समुद्री जीव हे त्यांचं खाद्य.
ऑक्टोपसचं वैशिष्टय़ म्हणजे त्याची कमालीची संवेदनशील त्वचा. त्याद्वारे तो श्वसनही करतो आणि धोकेही ओळखतो. ही ‘श्लेष्मल’ किंवा ‘म्युकस’ची त्वचा इतकी लवचिक (खरं तर गिलगिलीतच) असते की, संकटसमयी मोठय़ा आकाराचे ऑक्टोपससुद्धा आपल्या देहाची ‘पुरचुंडी’ करून पाच सेंटिमीटर भेगेमध्ये जाऊन लपतात. ऑक्टोपसचे आठ हात असतात. त्यातल्या मागच्या दोनांचा त्याला ‘पाया’सारखा वापर करता येतो. दोन टपोरे डोळे आणि चोचीसारखं तोंड याद्वारे त्याला सभोवतालची जाणीव होते व भक्ष्यसुद्धा मिळतं. पाण्यातला प्राणवायू 65 टक्के घेत त्याचं श्वसन चालतं.
त्यांच्या पुनरुत्पत्तीची गोष्टच निराळी. मीलनानंतर नर ऑक्टोपस मरतो आणि हजारो अंडी घालून त्यातून बाल ऑक्टोपस बाहेर आले की मादीचाही अवतार संपतो. ऑक्टोपसचं जीवन सहा महिने ते चार वर्षांचं असतं. बहुतेक ऑक्टोपस एकलकाsंडे असतात. काही प्रजाती मात्र गटागटाने पोहताना दिसतात. फलनानंतर नव्या ऑक्टोपसचा जन्म सुमारे दहा महिन्यांत होतो.
आता असा हा अल्पजीवी जलचर माणसाशी काय स्पर्धा करणार? पण त्याची बुद्धिमत्ता वाखाणण्याजोगी असते हे खरं. तो संकटकाळी अनेक रंग बदलतो. क्षणात पिवळा, लाल, नारिंगी, तपकिरी किंवा काळ्या ठिपक्यांचं शरीर ‘धारण’ करण्याची ‘जादू’ त्याच्या शरीरात नैसर्गिकरीत्या असते.
त्यांच्यावर झालेल्या प्रयोगातून असं दिसतंय की, ते वेगवेगळे आकार ओळखतात. त्यांची स्मरणशक्ती आणि शिकण्याची वृत्ती तल्लख असते. डॉल्फिन माशांप्रमाणे त्यांनाही ‘शिकवता’ येतं. मात्र त्यांच्यापैकी निळं कडं किंवा ब्लू-रिंग असलेले ऑक्टोपस विषारी असतात.
हिमयुग आल्यावर ते कदाचित इतर जिवांपेक्षा जास्त तग धरतील ते याच लवचिकतेच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर. शिवाय समुद्रात बर्फाखाली ते कितीही काळ राहू शकतील, पण म्हणून ते माणसांची ‘जागा’ घेतील असं म्हणणं हे सुतावरून स्वर्गाला जाण्यासारखं. कारण सभोवतालच्या परिस्थितीत आपल्याला अनुकूल आणि अनेकदा आमूलाग्र बदल करण्याची क्षमता फक्त माणसातच आहे. त्यामुळे ऑक्टोपसची प्रजाती जरूर टिकेल, पण त्यांना ‘संस्कृती’ निर्माण करता येणार नाही.




























































