
>> विठ्ठल जाधव
काँग्रेसमधील अनेक बडय़ा नेत्यांना बाजूला सारून 90 च्या दशकात पुण्याच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होताच, परंतु पुण्यात त्यांना मानणारा राजकीय वर्ग त्यांनी निर्माण केला. एवढेच नव्हे तर पुणेरी राजकारणाचा सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी ही प्रतिमा त्यांनी पुणेकरांमध्ये ठसवली. एनडीएमधील खडतर प्रशिक्षणानंतर कलमाडी इंडियन एअर पर्ह्समध्ये 1960 मध्ये दाखल झाले होते. तेथे 1964 ते 72 या कालावधीत ते पायलट होते. 1965 साली पाकिस्तान आणि 1971 च्या बांगलादेशच्या म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानाविरुद्धच्या युद्धात भारतीय वायूसेनेचे पायलट म्हणून कर्तव्य बजावले. स्क्वॉड्रन लीडर म्हणून ते निवृत्त झाले.
कलमाडी 70 च्या दशकात काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी काँग्रेसमध्ये संजय गांधी यांच्या नावाचा बोलबाला होता. तेव्हा उल्हासदादा पवार हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. त्याच वेळी कलमाडी पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. डेक्कन येथील पुना कॉफी हाऊसवर त्यांचा राबता असायचा. 1977 चा तो काळ होता. यादरम्यान तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा टिळक स्मारक मंदिरामध्ये कार्यक्रम होता. त्यांच्या कार्यक्रमाबाहेर युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने होती. मोठा पोलीस बंदोबस्त असतानादेखील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांची गाडी अडवली. एवढेच नव्हे तर गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली. कलमाडी यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन देशभरात गाजले. काँग्रेस नेते संजय गांधी यांचे कार्यक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवल्याने संजय गांधी यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. मग मात्र कलमाडींनी मागे वळून बघितले नाही. 1982 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले. पुण्यातील काँग्रेसचे बडे नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्यासह इतर सगळय़ा नेत्यांना बाजूला सारत सुरेश कलमाडी पुणे काँग्रेसचे प्रमुख बनले होते. गाडगीळ वाडय़ावरील काँग्
पुणे महापालिकेच्या राजकारणात कलमाडी यांचे वर्चस्व दीर्घकाळ राहिले. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यानंतर कलमाडी काँग्रेसमध्येच राहिले. त्यानंतर 2007 मध्ये महापालिका निवडणुकीत पुण्यात कलमाडी यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा पुणे पॅटर्न निर्माण झाला. शरद पवार यांनी सारसबागेजवळ जाहीर सभा घेऊन पुण्याचा कारभारी बदला असे आव्हान केले होते. या पुणे पॅटर्नने कलमाडी यांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली.
2010 पासून सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा सुरू झाली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणात कलमाडी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांनी कलमाडी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे पद सोडावे लागले. या प्रकरणी कलमाडी यांना 9 महिने तुरुंगवासदेखील भोगावा लागला. नुकतेच ते या घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाले. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील वैभवामध्ये भर टाकणारा एक उमदा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.



























































