श्रीस्वरूपानंद, पावस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विवेक दिगंबर वैद्य

‘पावस’चा प्रेमदीप म्हणून सुपरिचित असलेल्या ‘श्रीस्वरूपानंद स्वामी’ यांच्या पूर्वायुष्याचा परिचय करून देणारा लेख.

रत्नागिरीजवळच्या ‘पावस’ या शांत व निसर्गरम्य गावामध्ये आठ पिढय़ांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या गोडबोले कुटुंबाचा उंबरठा याच गावातील देशमुखांच्या लेकीने, गंगाबाईने ओलांडला आणि परशुरामपंतांची ‘पत्नी’ या नात्याने ती घरात प्रवेशकरती झाली. गोडबोल्यांचे घराणे अतिशय सत्त्वसंपन्न, धर्मप्रवण, परोपकारी आणि कर्तबगार घराणे म्हणून ओळखले जात असे.

पै-पाहुणे व आप्तेष्टांच्या येण्याजाण्याने गोडबोल्यांचे घर सदोदित भरलेले असे. तत्कालीन कुटुंबव्यवस्थेमध्ये पोरासोरांचा पसाराही वाढताच असे. गोडबोले घराण्यातही लहान मुलांचे प्रमाण जाणवण्याइतपत होते. त्या काळी वेळच्यावेळी न झोपणाऱया ‘किरकिऱया’ पोरांना दुधातून थोडी अफू चाटवण्याची पद्धत रूढ व सर्वमान्य होती. अफूच्या अमलाखाली पोरे चटकन झोपत असत. गंगेच्या सासूबाईदेखील पोटच्या पोरांना गरज भासल्यास दुधातून थोडीशी अफू चाटवून झोपवीत असत. एकदा त्यांना काही कामानिमित्त बाहेर जायचे असल्याने त्यांनी लेकरास गंगेच्या हवाली करून ‘हा झोपेनासा झाल्यास त्यास दुधातून अफू चाटव म्हणजे तो शांत झोपेल’ असे सांगितले.

सासूबाईंच्या सांगण्यावरून गंगेने तिच्या लहानग्या दिराला झोप येण्याकरिता दुधातून अफू चाटवली, मात्र अफूचे प्रमाण नेमके किती असावे हे निरागस गंगाबाईला ठावूक नसल्यामुळे बाळ कायमचेच शांत झाले. गंगाबाईच्या हातून लेकरू दगावल्याचे समजताच घरामध्ये काहूर माजला. गंगेच्या हातून अजाणतेपणी अपराध घडला होता. घरातील कर्त्यासवरत्या मंडळींनी गंगाबाईला अनेक दूषणे दिली. त्यांच्या वागण्याचा संताप आल्यामुळे ती मानी स्वभावाची पोर घर सोडून निघून गेली. हातून अजाणतेपणी घडलेल्या घटनेचा सल मनाशी बाळगून गंगा माहेरीदेखील न जाता वाट फुटेल तिथे निघाली आणि मजल दरमजल करीत थेट नरसोबाच्या वाडीला येऊन पोहचली.

या घटनेला जवळपास बारा वर्षे उलटली. गंगाबाई मोलमजुरी करीत, चणे-दाणे खात, प्रसंगी केवळ पाणी पिऊन नरसोबाच्या वाडीला राहू लागली. दरम्यान, पावस येथे गंगाबाईंच्या यजमानांचे, अर्थात परशुरामपंतांचे दुसरे लग्न लावून देण्यात आले, मात्र त्यांचा सातेक वर्षांचा संसार धामधुमीचा झाला. त्यांना दोन मुले झाली असली तरीही ती अल्पायुषी ठरली. नंतरच्या तिसऱया बाळंतपणात नवजात बालकासह पत्नीदेखील देवाघरी गेल्यामुळे परशुरामपंतांच्या नशिबी पुन्हा एकदा संसारवियोग आला. ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात एक तेजःपुंज संन्यासी आला व त्यांना सांगता झाला, ‘अरे, तुझ्या कुळाची गृहलक्ष्मी नरसोबाच्या वाडीस भणंगाचे जिणे जगत आहे, त्या निष्पाप पोरीला परत घेऊन ये. तीच तुझ्या संसाराला आकार देईल. ही दत्त महाराजांची आज्ञा आहे समज आणि लगेच निघ.’ परशुरामपंत पहाट होताच उठले आणि घडला प्रकार आईच्या कानावर घालून थेट नरसोबाच्या वाडीकडे रवाना झाले.

परशुरामपंत गंगाबाईंचा शोध घेण्यासाठी नरसोबावाडीस आले. बारा वर्षांनंतर पूर्णतः पालटलेले गंगाबाईंचे रूप ओळखणे परशुरामपंतांसाठी अवघड असले तरी अशक्य नव्हते. देहरक्षणापुरते विटके लुगडे, कृश शरीर अन् कपाळावर ठसठशीतपणे रेखलेले सौभाग्यचिन्ह यातूनही गंगाबाईंची ओळख पटवून घेणे परशुरामपंताना कठीण गेले नाही. श्रीमहाराजांच्या पादुकांना सतत प्रदक्षिणा घालण्यामुळे अन् वाडी येथील नित्य वास्तव्याच्या प्रभावामुळे गंगाबाईंच्या चेहऱयावरचे सात्त्विक तेज खुलून आले होते. परशुरामपंतांनी त्यांची भेट घेतली. घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला आणि पुन्हा स्वगृही व संसारात परतण्यासाठी त्यांच्यापाशी आर्जवे केली.

गंगाबाईंनी परशुरामपंतांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्या म्हणाल्या, ‘मी येईन, मात्र श्रीस्वामी महाराजांनी तशी परवानगी दिली तरच!’ त्यांचे उत्तर ऐकून परशुरामपंत गोंधळले. गंगाबाईंनी पंतांना, तेथील घाटावर वास्तव्यास असलेल्या एका तपस्वी संन्याशाकडे नेले. त्या संन्यस्थ सत्पुरुषाकडे पाहताच परशुरामपंतांना स्वप्नदृष्टांताचे स्मरण झाले. त्या दृष्टांतामध्ये नरसोबावाडीस जाण्याविषयीचे सूतोवाच करणाऱया तेजःपुंज संन्याशापाशीच ते येऊन पोहोचले होते. या विलक्षण योगायोग विस्मयचकित करणारा होता. गंगाबाईंनी त्या संन्याशास काही सांगण्याआधीच तो सत्पुरुष हसून म्हणाला, ‘मुली, हा तुझा पती आहे हे मी जाणतो, त्याच्यासोबत निश्चिंत मनाने माघारी जावे, मनात कसलाही विचार आणू नये. हे विधिलिखित आहे. तुझ्या येथील बारा वर्षांच्या तपसाधनेचे हे फलित आहे. यातूनच तुझ्या पुण्याईला सुकृताची जोड मिळेल, आणि त्यायोगे तुझ्या वंशात अध्यात्मजगतास वंदनीय ठरणारा सत्पुरुष जन्म घेईल हे लक्षात ठेव.’

श्रीदत्त महाराजांच्या साक्षीने आणि त्या संन्याशाच्या आशीर्वादाने निश्चिंत झालेल्या गंगाबाई ‘मनोहर’ पादुकांचे अखेरचे दर्शन घेऊन परशुरामपंतांसोबत ‘पावस’ येथे आल्या. या घटनेपावेतो त्यांच्याविषयी असलेला कुटुंबीयांचा रोषही मावळला होता. सर्व काही स्थिरस्थावर झाले. परशुरामपंत व्यासंगी होते, उच्चविद्याविभूषित होते. शिक्षण खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले परशुरामपंत बेळगाव-धारवाड येथे नोकरीचा कार्यकाळ पूर्ण करून सन 1883 मध्ये सेवानिवृत्त झाले. दोन मुलगे, सुना आणि नातवंडे अशा भरल्या संसारामध्ये रममाण होऊन अखेरीस 1909 साली, वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्यांनी देह ठेवला.

सन 1869 मध्ये परशुरामपंत आणि गंगाबाईंचे ‘सुपुत्र’ या नात्याने गोडबोले घराण्यास वंशाचा दिवा लाभला. या मुलाचे नाव ‘विष्णू’ ठेवण्यात आले. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर विष्णू नोकरी करण्याच्या निमित्ताने काही काळ आजूबाजूच्या गावांमध्ये राहता झाला मात्र त्यानंतर ‘पावस’ येथे परतून घरच्या कारभारात आणि शेतीवाडीत लक्ष घालणे त्याला सोयिस्कर वाटू लागले. कालांतराने विष्णूचा विवाह जवळच्याच ‘गोळप’ या गावातील सावकार आणि व्यापारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विसाजीपंत गोखले यांची कन्या, रखुमाई हिच्यासोबत पार पडला. विष्णू व रखुमाई या उभयतांना चार मुली व तीन मुलगे अशी सात अपत्ये होती. नातवंडांना गंगाबाईंचा सहवास लाभला नसला तरीही आजोबा, परशुरामपंतांची माया काही काळापुरती का होईना, लाभली. विष्णू-रखुमाई यांची चार अपत्ये दुर्दैवाने अल्पायुषी ठरली असली तरीही द्वारका, गणपत आणि राम या तीनही मुलांना मात्र योग्य शिक्षण व चांगले आयुष्य लाभले.

लौकिकार्थाने, 15 फेब्रुवारी 1903 या दिवशी, विष्णू-रखुमाई यांच्या संसारवेलीवर उमललेले चौथे अपत्य ‘राम’ या नावाने परिचित असले तरीही अध्यात्म जगतासाठी त्यांची ओळख पुढे ‘श्रीस्वरूपानंद स्वामी’ या गौरवपूर्ण संबोधनाने दृढ व चिरंतन झाली. (पूर्वार्ध)

– [email protected]