
>> विवेक दिगंबर वैद्य
मालवण येथे समाधिस्थ झालेल्या श्रीरांगोळी महाराज यांच्या अवतारकार्याचा परिचय करून देणाऱया लेखाचा हा उत्तरार्ध.
श्रीगुरू श्रीकृष्णसरस्वती यांच्या सहवासातून आणि मार्गदर्शनातून श्रीरांगोळी महाराजांना अवतारकार्याची नेमकी दिशा ठाऊक झाली. श्रीगुरूंमुळे त्यांना अनेक साधूसंतांचा सहवास लाभला. पुढे श्रीकृष्णसरस्वती समाधिस्थ झाल्यानंतर श्रीरांगोळी महाराजांनी ठिकठिकाणी भ्रमण केले. त्यांनी भक्त नारायण धुरी यांच्यासोबत तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, हरिद्वार, मथुरा अशा अनेक यात्रास्थळांना भेट दिली. या भ्रमंतीत त्यांना रामगडवासी सुर्वेबुवा, मंगळूरकरबाबा, दादू महाराज, दाणोलीकर श्रीसाटम महाराज, कणकवलीचे श्रीभालचंद्र महाराज या आणि अशा अनेक तत्कालीन सिद्धसत्पुरुषांचा सहवास प्राप्त झाला.
श्रीरांगोळी महाराजांकडे जनसामान्य आकर्षित झाले त्यामागे श्रीमहाराजांविषयी प्रसिद्ध झालेल्या अनेक विस्मयकारक गोष्टी होत्या. कसाल गावाहून मालवण येथे जाणारा ट्रक श्रीमहाराज बसले असता इंधनाशिवाय अपेक्षित जागी पोहोचला. श्रीमहाराजांची चारचौघात कुचेष्टा व्हावी या हेतूने बाबा पाटकर नावाचे गृहस्थ आले असता, श्रीमहाराजांनी त्यांच्या सर्व शंकांची उत्तरे त्यांनी एकही प्रश्न न विचारता सांगितली होती. मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमधील एका ड्रॉईंग शिक्षकाला त्यांनी सर्वत्र शिवलिंगाचे दर्शन घडविले होते.
सन 1944 मध्ये मुंबई येथे गोदी परिसरात मोठा स्फोट झाला होता. त्याच्या नजीक एका बंगल्यात जमनादास शेट नावाचे श्रीरांगोळी महाराजांचे एक भक्त राहात होते. स्फोट होण्याआधी काही काळ श्रीमहाराज त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘तुमच्या बंगल्यात मी काही काळ एकटाच राहणार आहे. तुम्ही सर्वजण तुमच्या पाहुण्यांकडे लोणावळ्याला निघून जा.’ श्रीमहाराजांवर अपार श्रद्धा असल्याने त्यांच्या त्या विचित्र आज्ञेचा मान ठेवून जमनादास शेट त्यांच्या कुटुंबीयांसह लोणावळा येथील त्यांच्या दुसऱया घरी निघून गेले.
पुढे, ज्या दिवशी गोदीमध्ये स्फोट झाला त्या दिवशी शेटजींच्या बंगल्यात श्रीमहाराजांनी स्वतःला कोंडून घेतले होते. त्या महाभयंकर स्फोटात परिसरातील आजूबाजूच्या घरांचे आणि इमारतींचे अपरिमित नुकसान झाले मात्र जमनादास शेट यांच्या बंगल्याची वीटसुद्धा हलली नाही. गोदीतील स्फोटाची बातमी समजल्यावर दुसऱया दिवशी घाबरेघुबरे झालेले शेटजी घरी आले तेव्हा घडलेल्या परिस्थितीचे आकलन होताच त्यांनी श्रीमहाराजांचे चरण धरले. विज्ञानशास्त्राला चकित करणाऱया अशा अनेक अगाध लीला श्रीमहाराजांनी केल्या.
श्रीरांगोळी महाराजांकडे श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, लहान-मोठा अथवा स्वधर्मी-परधर्मी असा भेदभाव नव्हता. त्यांच्यापाशी आलेल्या सर्वांनाच ते सन्मानाने वागवीत असत. अन्नदान करण्याकडे त्यांचा विशेष कल असे. श्रीरांगोळी महाराज पशुपक्ष्यांवर अपार माया करीत असत. अनेक कुत्री नेहमीच त्यांच्या अवतीभवती असत. एकदा ‘वायरी’ येथे एका उन्मत्त बैलाने अनेकांना जखमी केले, म्हणून त्या उपद्रवी बैलाला गोळी घालून ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु श्रीमहाराजांची कृपा होताच तो बैल ‘लोण्याहूनही मऊ रांगोळीदास’ झाला. श्रीमहाराजांनी त्याला नजरेच्या केवळ एका कटाक्षाने कह्यात आणला.
श्रीमहाराजांना वाचासिद्धी प्राप्त होती. त्यांच्या मुखातून येणारा शब्द खरा होत असे. त्यांच्या आशीर्वादाने अनेक भाविकांना प्रापंचिक सौख्य व समृद्धी लाभली. अनेकांच्या अनेक समस्या-संकटे, तसेच शारीरिक व्याधी त्यांच्या कृपेने दूर झाली होती. कोणत्याही रोगावर उपचार म्हणून ते खोबरेल तेल वापरत असत. बिकटप्रसंगी ते भक्तांना आपल्या गळ्यातील शिवलिंगाचा स्पर्श करून बाधामुक्त करीत असत. श्रीमहाराजांनी गळ्यात धारण केलेल्या एका छोटय़ा चांदीच्या डबीत शिवलिंग होते. श्रीमहाराज त्याला ‘आत्मलिंग’ म्हणत आणि ठरावीक दिवशी ते डबीतून बाहेर काढत. विविध रंगांच्या छटा दाखविणाऱया त्या आत्मलिंगाचे दर्शन काही निवडक भक्तांना घडले होते.
श्रीमहाराज समाधिस्थ झाल्यानंतर त्यांच्याकडील आत्मलिंग गळ्यात धारण करून त्यांचा एक शिष्य गिरनार येथे तीर्थयात्रेसाठी गेला, तेव्हा श्रीमहाराजांनी दृष्टांताद्वारे त्याला लिंग न घालण्याविषयी सूचित केले. परंतु त्यांच्या दृष्टांताकडे भक्ताने दुर्लक्ष केले. तेव्हा पर्वस्नान करतेवेळी चांदीच्या बंदिस्त पेटीतील लिंग एकाएकी नाहीसे झाले. हे पाहून त्या शिष्याला पश्चाताप झाला.
श्रीमहाराज अल्प आहार व अल्प निद्रा घेत असत. भक्तांना मार्गदर्शन करताना त्यांना श्रीमहाराज त्यांचा बोध गोष्टीरूपाने समजावून सांगत असत. दत्तोपासना करणाऱया भाविकाला मालवणचे समर्थस्थान सोडून अन्यत्र जाण्याची गरज नाही असे ते ठामपणे सांगत असत. श्रीरांगोळी महाराजांची श्रीकृष्णसरस्वती आणि अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थ महाराज यांच्या चरणी विलक्षण श्रद्धा होती. त्यांच्या प्रतिमेची नित्यनेमाने पूजा करताना आणि मधुर आवाजाची देणगी लाभल्यामुळे श्रीसमर्थ व सद्गुरूंची आरती गोड आणि भावपूर्ण स्वरात म्हणताना ते तल्लीन होत असत. त्यांनी कधीही कुणा भक्ताला मंत्रोपदेश दिला नाही तसेच कुणाला शिष्य करवून घेतले नाही. दर्शनार्थ येणाऱया प्रत्येकाशी ते प्रेमळ संवाद साधत असत. मार्गदर्शन करीत असत. विशेषतः येणाऱया भाविकांना ते श्रीस्वामीसमर्थ आणि श्रीकृष्णसरस्वती यांचे छायाचित्र देऊन त्यांची नित्यपूजा करावयास सांगत तसेच ‘जय जय रामकृष्ण हरी’ अथवा ‘श्रीगुरू स्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ’ हा मंत्रजप करावयास सांगत. भक्तांनी नामस्मरण करावे याकडे श्रीरांगोळी महाराजांचा भर राहात असे.
श्रीरांगोळी महाराजांना ‘मालवण’ प्रांताविषयी विशेष आस्था होती. मालवण येथील मुक्कामात ते धक्क्यावर बसून सूर्यत्राटक करीत असत. भर मध्यान्हकाळीदेखील त्यांचे सूर्यत्राटक चालत असे. त्राटक करतेवेळी सूर्याच्या शीतलतेचा अनुभव येत असल्याचे ते सांगत असत. श्रीरांगोळी महाराजांनी ही उपासना अखेरपर्यंत, खंड न पडता केली होती. मालवण प्रांतातील ‘भरड’ गावात त्यांचे सन 1933 ते 1947 या काळात वास्तव्य झाले. भक्त राजाराम अमरे यांनी, त्यांच्या घराच्या माडीवर श्रीमहाराजांच्या राहण्याची व्यवस्था केली. वैशाख मास, सन 1947 मध्ये येथे श्रीरांगोळी महाराजांनी देह विसर्जित केला. त्यांच्या पादुकांची पूजा अमरे यांच्याकडून केली जाते. श्रीरांगोळी महाराजांच्या पुण्यतिथीस तसेच नैमित्तिक उत्सवास विविध ठिकाणहून भक्तमंडळी दर्शनार्थ येत असतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतश्रेष्ठांसोबत तुलनेने अप्रसिद्ध संत-सिद्धांचाही शोध घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव श्रीरांगोळी महाराजांचे चरित्र अभ्यासल्यावर होते. (उत्तरार्ध)





























































