
>> विवेक दिगंबर वैद्य
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील कोर्ले हे श्रीस्वामी समर्थांचे ‘बखर’कार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीगोपाळबुवा केळकर यांचे मूळ गाव. शे-सवाशे घरांची वस्ती असलेल्या कोर्ले गावातील रामचंद्र केळकर यांच्या पोटी सन 1847 मध्ये गोपाळबुवांचा जन्म झाला. घरची सांपत्तिक स्थिती फारशी ठीक नसल्याने गोपाळबुवांचे शिक्षण इंग्रजी तिसऱॊया इयत्तेपर्यंत झाले. ब्रिटिश सरकारच्या राजवटीत इंग्रजी तिसरीपर्यंतचे शिक्षण, नोकरी, उपजीविका करण्यासाठी पुरेसे होते. त्यामुळे गोपाळबुवांना रेल्वे खात्यामध्ये सहज नोकरी मिळाली आणि स्थिरस्थावर होताच विवाहदेखील झाला. संसारसुखाची गाडी प्रपंचमार्गावर हळूहळू चालू लागली. पुढे काही कारणाने केळकर मंडळी नागपूर येथे स्थलांतरित झाली तेव्हा गोपाळबुवादेखील काही काळ नागपूर येथे वास्तव्यास राहिले.
नागपूर येथील वास्तव्यादरम्यान गोपाळबुवांना पोटदुखीची असह्य व्याधी जडली. अनेक वैद्य, हकीम, डॉक्टर झाले. अनेक उपाय केले. बराच पैसा खर्च झाला तरी गुण येईना. दिवसेंदिवस अशक्तपणा वाढल्याने पोटातील रोग वाढू लागला. चालण्याची शक्ती उरली नाही. अंगात वायू शिरला की, सर्वांगास कळा लागत असत. सकाळ-सायंकाळ प्रकोपामुळे वायू असा खेळे की, जीव नकोसा होई. अन्नावरची वासना उडाली. पायाचे त्राण नाहीसे झाले. निद्रानाश सतावू लागला. ‘मरण येईल तर बरे’ असा विचार बुवांच्या मनात डोकावू लागला.
गोपाळबुवा खरे तर दैववादी नव्हते. मात्र शारीरिक त्रासामुळे परिस्थितीला शरण जाण्याशिवाय अन्य पर्याय नजरेसमोर दिसत नसल्यामुळे त्यांनी मनातल्या मनात, ‘‘जो कुणी या जगताचा चालक असेल, त्याने माझा वातरोग जर आठ दिवसांत बरा केला, तर त्या ईश्वराखेरीज अन्य कुणाची चाकरी मी करणार नाही’’ असा नवस केला. आश्चर्य असे की, गेले काही महिने शरीरास छळणारा वायू प्रकोप अवघ्या आठ दिवसांत थंडावला आणि पुढे कायमचा नाहीसा झाला. गोपाळबुवांच्या शरीरात थोडी शक्ती निर्माण झाली तेव्हा केलेल्या नवसाची सांगता करण्याचे त्यांनी ठरविले. मात्र, त्यासाठी कुण्या देवापाशी जावे हे न सुचल्यामुळे गोपाळबुवांनी सर्वत्र चौकशी केली तेव्हा तत्कालीन स्थितीत सटाणा येथे श्रीदेवमामलेदार आणि अक्कलकोट येथे श्रीस्वामी समर्थ हे दोन प्रख्यात साधुपुरुष आहेत असे त्यांना समजले.
गोपाळबुवांनी अक्कलकोट येथे जाण्याचे ठरविले. मजल-दरमजल करीत ते अक्कलकोटास पोहोचले. गाठीशी असलेल्या पाच पैशांपैकी एका पैशाच्या खारका घेऊन ते अक्कलकोटच्या खासबागेत गेले. तेव्हा श्रीस्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्यासमोर खारका ठेवून गोपाळबुवांनी नमस्कार केला. श्रीस्वामी महाराजांची तेजस्वी मनोहर मूर्ती पाहून बुवांच्या मनात अपार शांतता आणि समाधान दाटून आले. त्यांना श्रीस्वामी महाराजांच्या सहवासाचे असे काही पिसे लागले की, त्यांनी अक्कलकोटातच राहण्याचे निश्चित केले. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे आणि त्रिकाळ श्रीस्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे हा गोपाळबुवांचा अक्कलकोटातील नित्यक्रम झाला.
अक्कलकोटी वास्तव्यास असलेल्या गोपाळबुवांच्या मनात श्रीस्वामी समर्थांकडून अनुग्रह प्राप्त व्हावा अशी इच्छा जागृत झाली. मात्र तसे काही घडले नाही तेव्हा एकदा त्यांच्या मनात असे आले की, जेव्हा आपण श्रीस्वामी चरणांवर डोके ठेवू तेव्हा श्रीस्वामींच्या मुखातून जे शब्द निघतील तोच मंत्र म्हणून स्वीकारावा आणि त्याचाच जप करावा. मात्र ती इच्छादेखील फलद्रूप झाली नाही. कारण जेव्हा जेव्हा बुवा श्रीस्वामी चरणांवर डोके ठेवीत असत तेव्हा, तत्पूर्वी श्रीस्वामी कुणाशी बोलत असले तरी त्यावेळी त्यांचे बोलणे बंद होत असे.
मात्र एके दिवशी गोपाळबुवा निजले असता रात्री श्रीस्वामी महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि ‘‘तुझा रोग आम्ही नाहीसा करतो’’ असे म्हणून बुवांच्या पोटावरून हात फिरवून निघून गेले. थोडय़ा वेळाने बुवांना जागृती आली आणि ते लघवी करण्यास गेले तेव्हा त्यांना सुमारे दोन तांबे इतके भरपूर लघवीस झाले. बुवांना तक्षणीच आपले पोट सैल झाले असल्याचे आणि तब्येतीस पुरता आराम पडल्याचे जाणवले. बुवा दुसऱया दिवशी सकाळी दर्शनास गेले असता त्यांच्याकडे पाहत श्रीस्वामी म्हणाले, ‘‘भटाचे आता पोट पहा.’’ श्रीस्वामीकृपामाहात्म्याची साक्षात प्रचीती व प्रत्यंतर आल्याने गोपाळबुवांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यांच्या मुखातून कृतज्ञता प्रकटली, ‘‘वैद्य, जीवाचे आप्त किंवा द्रव्य वगैरेपेक्षा श्रींचा अधिकार केवढा मोठा! धन्य आहे सद्गुरूंच्या लीलेची!’’
या घटनेपासून पंधराव्या दिवशी गोपाळबुवांना आणखी एक स्वप्नदृष्टांत घडला. त्यामध्ये श्रीस्वामी महाराज काही सेवेकऱयांसह एका शेतात बसले असता पाचपन्नास अविंध ‘दीन, दीन’ पुकारा करीत नंग्या तलवारी घेऊन त्यांना मारण्यास आले. सर्व मंडळी भयभीत झाली. गोपाळबुवा भयाने कापू लागले. तोच श्रीस्वामी समर्थांनी गोपाळबुवांना उचलून खांद्यावर घेतले व एका डोंगरात जेथे पुष्कळ झाडी असून नदी वाहत आहे अशा ठिकाणी ठेवले. घोर संकटातून मुक्त करणाऱया श्रीस्वामीरायांच्या चरणांवर डोके ठेवून बुवांनी ‘‘महाराज, कृपा करून अनुग्रह द्यावा’’ अशी प्रार्थना केली. तेव्हा श्रीस्वामी समर्थ म्हणाले, ‘‘अवकाश आहे’’. गोपाळबुवांना हे स्वप्न विस्मयकारक वाटले.
या घटनेपासून सुमारे महिनाभराने एके दिवशी श्रीस्वामी महाराज हंचनाळ येथे गेले. त्यांच्यासोबत सेवेकरी अन् गोपाळबुवादेखील होते. बुवांना चिलीम ओढण्याची सवय होती. रात्रीच्या वेळी चिलीम ओढावीशी वाटली म्हणून विस्तवाकरिता ते इथे तिथे पाहू लागले; परंतु विस्तव मिळाला नाही. श्रीस्वामींची स्वारी कुलकर्ण्यांच्या वाडय़ात अंगावर शालजोडी पांघरून निजलेली होते. त्यांच्या शेजारी समई तेवत होती. गोपाळबुवा तिथे गेले. त्यांनी विस्तवाकरिता सुंभाची गुंडी समईवर धरली. अर्धी गुंडी पेटली. इतक्यात अंगावरची शालजोडी दूर करून श्रीस्वामी उठून बसले. बुवांच्या अंगात कापरे भरले आणि हातातील गुंडी खाली पडली. श्रीस्वामी समर्थ बुवांकडे एकटक पाहू लागले. तेव्हा धीर एकवटून गोपाळबुवांनी श्रीमहाराजांचे चरण धरले आणि हात जोडून मनातल्या मनात अनुग्रहपूर्ततेसाठी प्रार्थना केली. श्रीस्वामी समर्थांनी नुसत्या नजरेच्या कटाक्षाने गोपाळबुवांवर अनुग्रह केला. अखेर अशा अनपेक्षित रीतीने गोपाळबुवांच्या मनातील इच्छेची पूर्तता झाली.
अक्कलकोट येथे श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या सहवासाचे अपार सौख्य लुटल्यावर एके दिवशी गोपाळबुवांना मुंबईच्या कांदेवाडी मठात जाण्याची आज्ञा श्रीस्वामी महाराजांनी दिली. श्रीस्वामी समर्थांच्या मुंबापुरी गादीचे प्रमुख श्रीस्वामीसुत महाराज यांच्या सान्निध्यात आल्यानंतर श्रीगोपाळबुवा केळकर यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. हा श्रीस्वामीलीलेचा एक पूर्वनियोजित संकेत होता.(पूर्वार्ध)































































