‘व्हय म्हाराजा!’ पुण्यभूमी ‘नाशिक’!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पुराणोक्त धार्मिक माहात्म्याने नाशिकभूमीचा इंच न् इंच परिसर व्यापलेला आहे. पौराणिक संदर्भ, प्राचीन वास्तू, लेणी, पुरातन देवालये, रमणीय घाट यातून डोकावणाऱया आणि त्याच पार्श्वभूमीवर आकाशाला स्पर्श करू पाहणाऱया इमारतींचे आगमन या विरोधाभासाच्या कोलाहलात सध्याचे ‘नाशिक’ सामावलेले आहे.

एकीकडे मनाला अचंबित करणाऱया गौरवशाली परंपरेचे स्मरण करणारा ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक प्राचीन महन्मंगल वारसा आणि दुसरीकडे झपाटय़ाने होऊ घातलेले शहरीकरण, सुबत्ता आणि आधुनिकता यांच्यात ‘नाशिक’ तालुक्याचा शहर आणि गाव भाग एकवटलेला आहे असे दिसून येते. पौराणिक संदर्भ, प्राचीन वास्तू, लेणी, पुरातन देवालये, रमणीय घाट यातून डोकावणाऱया आणि त्याच पार्श्वभूमीवर आकाशाला स्पर्श करू पाहणाऱया इमारतींचे आगमन या विरोधाभासाच्या कोलाहलात सध्याचे ‘नाशिक’ सामावलेले आहे.

ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पुराणोक्त धार्मिक माहात्म्याने नाशिकभूमीचा इंच न् इंच परिसर व्यापलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या कुशीत वसलेल्या नाशिक तालुक्याच्या सीमारेषा अहमदनगर, संभाजीनगर, जळगाव, धुळे, ठाणे, बलसाड, डांग या तालुक्यांच्या सीमारेषांसोबत आपले नैसर्गिक ‘सख्य’ जोडून आहेत. पूर्वी ‘मुंबई’ प्रशासकीय विभागाचा एक भाग अशी ओळख बनलेला ‘नाशिक’ तालुका पुढे सन 1981पासून मात्र आपले वेगळे अस्तित्व आणि नवी ओळख निर्माणकरता झाला.

15530 चौरस कि.मी. क्षेत्रफळ लाभलेल्या नाशिक जिह्यात ‘नाशिक’ शहरासह देवळाली, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवले, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, बागलण (सटाणा), नांदगाव, चांदवड, मालेगाव आणि त्र्यंबकेश्वर असे 15 तालुके आहेत. नाशिक जिह्याच्या दक्षिणेस कळसूबाई पर्वताची रांग असून पश्चिमेस सह्याद्री पर्वत, मध्यभागी चांदवड आणि सप्तश्रृंगीचे पवित्र स्थान आहे. त्यासोबत अंजनेरी, आणकाई-टाणकाई, साल्हेर-मुल्हेर, रामशेज यांचा आधार लाभलेला पूर्व भाग आणि आग्नेय भागाचा सखल व सपाट प्रदेश मिळून प्राचीन काळाचा वारसा सांगणारे ‘नाशिक’ आजदेखील हिंदुस्थानातील प्राचीन वैभवशाली शहर म्हणून ओळख टिकवून आहे.

जेथे कुंभ महोत्सव आयोजित करण्यात येतो त्या हिंदुस्थानातील प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आदी महातीर्थांमध्ये ‘नाशिक’देखील एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. सत्य आणि द्वापारयुगातही नाशिक परिसरातील अनेक स्थानांचे माहात्म्य अधोरेखित केलेले दिसून येते. नाशिक जिल्हा हा भौगोलिकदृष्टय़ा पूर्व-पश्चिम आणि मध्य अशा तीन पट्टय़ांमध्ये विस्तारलेला आहे. पश्चिम पट्टा डोंगररांगा आणि दऱयाखोऱयांनी व्यापलेला आहे. जमीन व जंगलाचे समप्रमाण ‘नाशिक’ जिह्यातील माणूस आणि अन्य विविध प्राण्यांसाठी सुरक्षित राहण्याजोगे स्थान उपलब्ध करून देते. उत्तम पाऊस, उन्हाळा-पावसाळा-हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे हवामान तसेच गोदावरी, गिरणा, मोसम, पांझरा, दारणा, कडवा, बाणगंगा या बारमाही वाहणाऱया नद्यांनी ‘नाशिक’ तालुक्याला समृद्धी बहाल केली आहे. ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावून निफाड-नाशिक येथून वाहणारी ‘गोदावरी’ ही नाशिक परिसरातील सर्वात महत्त्वाची नदी मानली जाते.

उत्तम पर्जन्यमान, अनुकुल हवामान आणि गर्द वनराई यांमुळे नाशिक जिह्याचा परिसर शेतीसमृद्ध आहे. बहुपयोगी औषधी वनस्पती, महाकाय वृक्ष, शेती व्यवसायाला पूरक ठरणारी पिके, फळे यांची विविधता, यांसोबत देशात स्वतःचे स्थान निर्माण करणारे कांदा व द्राक्ष यांचे मुबलक उत्पादन यामुळे नाशिक जिल्हा देश-विदेश पातळीवर महत्त्व प्राप्त करून आहे. द्राक्षाचे पीक काढण्यासाठी अनुकूल अशा वातावरणामुळे उत्तम चवीच्या ‘वाईन्स‘ उपलब्ध करून देणाऱया अनेक ‘वायनरीज’ देशविदेशात प्रसिद्ध आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा, हिंदुस्थानातील जागृत अशा ‘बारा’ ज्योतार्ंलगांमधील ‘श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर’ हे एक ज्योतार्ंलग, श्रीदेवीमातेच्या साडेतीन शक्तिपीठातील अर्धपीठ अर्थात श्रीसप्तश्रृंगीदेवीचे वास्तव्यस्थान असलेला सप्तशृंगगड (वणी येथे), स्थापत्यकलेचे अद्भुत दर्शन घडविणारी पांडवलेणी, चामरलेणी, मांगीतुंगी हे जैन धर्मियांचे तीर्थस्थान, मुक्तीधाम मंदिर, बौद्ध स्मारक, इगतपुरीचे विपश्यना केंद्र, नाथसंप्रदायाशी नाते राखणारा ब्रह्मगिरी, हनुमंताचे जन्मस्थान अंजनेरी, पंचवटी, श्रीदेवी निलांबिका स्थान, श्रीनिवृत्तीनाथांची समाधी, गोदावरीचा घाट, श्रीकपिलधारा तीर्थ, श्रीगजानन महाराज (शेगांव) यांचे तपश्चर्या स्थान म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पंपासरोवर (कावनाई), श्रीसाईबाबांचा प्रथम दर्शन व सहवास लाभलेले भक्त चांदभाई यांचे ‘चांदवड’ गाव, कुशावर्ततीर्थ, अष्टविनायकातील ‘ओझर’चे श्रीगणेशस्थान, श्रीस्वामीसमर्थ (दिंडोरी) मठ या आणि अशा अनेक स्थानांच्या माहात्म्यांमुळे नाशिक क्षेत्राचे पावित्र्य वाढलेले आणि वृद्धिंगत झालेले आहे.

नाशिकच्या पुण्यभूमीला अनेक देवदेवतांचे, संतसज्जनांचे तसेच लोकोत्तर कार्य करणाऱया दिग्गज गुणीजनांचे सान्निध्य लाभलेले आहे. श्रीशिवशंकर, श्रीविष्णू, श्रीनारदमुनी, श्रीराम-सीता-लक्ष्मण, अंजनीदेवी, श्रीहनुमान, श्रीसप्तश्रृंगी, श्रीमच्छिंद्रनाथ-श्रीगोरक्षनाथादी दोन नाथसंप्रदायी प्रमुख सत्पुरुष), श्रीघोलपस्वामी (यांचा उल्लेख अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थांच्या चरित्रात बाबा घोलप असा आहे), श्रीवामनबुवा वांबोरीकर (श्रीगुरुलीलामृताचे लेखक), श्रीआनंदनाथ महाराज (वेंगुर्ला) या दोन स्वामीभक्त-शिष्याचाही वावर काही काळ नाशिकक्षेत्री होता. येथील एकमुखी दत्तमंदिरात श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष श्रीरामानंद बिडकर यांचे काही काळ वास्तव्य होते. येथील काळाराम मंदिराच्या ओवरीमध्ये अवलिया सिद्धपुरुष श्रीगोपाळदास महंत (श्रीनरसिंह महाराज) यांचे वास्तव्य होते. त्यांची समाधी गोदावरीच्या पात्रात आहे. येथून जवळच ‘मामलेदार’ पदावर कार्यरत असलेले यशवंतराव भोसेकर नावाचे संसारी गृहस्थ जे पुढे संतपदावर पोहोचले आणि ‘देवमामलेदार’ म्हणून प्रसिद्ध झाले त्यांचीही समाधी आहे. येथे अनेकदा इंदौरचे श्रीमाधवनाथ महाराजदेखील येत असत. श्रीसाईबाबांच्या अवतारकार्यातील अनेक भक्तगणही नाशिक परिसरात राहावयास होते. संत ज्ञानेश्वरादी भावंडांचा चरणस्पर्श ज्या पुण्यभूमीला झालेला आहे त्या नाशिक तीर्थक्षेत्राच्या ‘स्थान’माहात्म्याविषयी पुढे येणाऱया काही लेखांमधून जाणून घेऊया.

– [email protected]