>> विवेक दिगंबर वैद्य
समस्त तीर्थांमध्ये ‘तीर्थराज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुशावर्त तीर्थात स्नान करून मगच श्रीत्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याची पूर्वापार प्रचलित प्रथा भाविकांकडून सश्रद्ध मनाने पाळली जाते. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली गंगा-गोदावरी पर्वतपायथ्याशी असलेल्या कुंडामध्ये प्रकट झाली तेच हे ‘कुशावर्त’ तीर्थ होय.
श्री त्र्यंबकेश्वराच्या उत्सवाकरिता तयार करण्यात आलेला भव्य रथ सरदार विंचूरकरांनी मंदिरास अर्पण केलेला आहे. श्रीत्र्यंबकेश्वराच्या पंचमुखी पितळी मुखवटय़ाची मिरवणुकीद्वारे ग्रामफेरी काढण्यात येते. या मुखवटय़ावर पेशव्यांनी दिलेला रत्न-हिरेजडित मुकुट घालण्यात येतो. फुलांच्या माळांनी सुशोभित रथ आणि विद्युत रोषणाई यामुळे श्रीत्र्यंबकेश्वराच्या पालखी मिरवणुकीचे दृश्य नयनरम्य भासते.
श्रीत्र्यंबकेश्वराची मिरवणूक मुख्य मंदिर ते कुशावर्ततीर्थ अशी निघते. समस्त तीर्थांमध्ये ‘तीर्थराज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुशावर्त तीर्थात स्नान करून मगच श्रीत्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याची पूर्वापार प्रचलित प्रथा भाविकांकडून सश्रद्ध मनाने पाळली जाते. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली गंगा-गोदावरी पर्वतपायथ्याशी असलेल्या कुंडामध्ये प्रकट झाली तेच हे ‘कुशावर्त’ तीर्थ होय.
पृथ्वीवर अवतरलेल्या गंगेच्या प्रवाहाला गौतमऋषींनी मंतरलेल्या दर्भाच्या काडय़ांनी अडवले आणि पवित्र गंगेत स्नान केले. येथे पूर्वी ‘कुश’ म्हणजे दर्भाची झाडे होती. गौतमऋषींनी या दर्भाचा बांध घालून आपल्या तपःसामर्थ्याने, मंत्रसिद्धीने अभिमंत्रीत केलेल्या दर्भाच्या बळावर गंगेस अडवले म्हणून हे तीर्थ ‘कुशावर्त’ या नावाने प्रसिद्ध झाले. अंदाजे 25 चौ. मी. लांबीच्या कुंडात हे तीर्थ स्थिरावलेले आहे. सन 1750 मध्ये इंदूरकर होळकर घराण्याचे फडणवीस रावजी पारनेरकर यांनी घडीव दगडातून या कुंडाचे बांधकाम केले. या कुंडाला ओवऱया असून चारही बाजूने स्नानाकरिता उतरण्यास पायऱया आहेत. वर्षाकाठी हजारो शिवभक्त व भाविकजन या तीर्थामध्ये स्नान करून जप-दानादी कार्ये करतात. कुशावर्त तीर्थाच्या कोपऱयात एके ठिकाणी शेषशायी विष्णूची मूर्ती असून मूर्तीच्या तळभागातून पाण्याचा ओघ वाहता असतो. पाण्याचा हा प्रवाह ब्रह्मगिरी पर्वतावरील गंगाद्वारावरून येतो असे सांगितले जाते. कुशावर्त तीर्थ परिसरात श्रीगंगा-महादेव आणि श्रीगणेशादी देवतांची मंदिरे आहेत. येथून श्रीत्र्यंबकेश्वराचे मंदिर पायी चालत जाण्याइतपत नजीकच्या अंतरावर आहे.
कुशावर्त तीर्थ हे प्राचीन व पुण्यप्रद असल्याचे मानले जाते. अक्कलकोट येथे भक्तश्रेष्ठ चोळप्पा यांच्या घरातील विहिरीत जल निर्माण करणाऱया श्रीस्वामी समर्थ महाराजांनी त्या विहिरीस ‘कुशावर्त तीर्थ’ असे संबोधले शिवाय, त्या विहिरीत त्यांनी रुद्राक्ष अर्पण केला आणि ‘हा रुद्राक्ष कुशावर्ततीर्थात स्नान करणाऱया ज्या कुणा भाविकाला मिळेल तो भाग्यवंत असेल’ असे उद्गारही काढले होते.
कुशावर्त तीर्थासोबत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात इंद्रतीर्थ, बिल्वतीर्थ, गौतमतीर्थ, रामतीर्थ, नृसिंहतीर्थ, प्रयागतीर्थ, पिशाच्च विमोचनतीर्थ, कनखलतीर्थ, बल्लाळतीर्थ, अहिल्यासंगम, निलांबातीर्थ, गंगासागर, धवलगंगातीर्थ, विमल-निर्मलतीर्थ, मुकुंदतीर्थ, भुजंगतीर्थ, वेणीमाधवतीर्थ, गणेशतीर्थ, विश्वनाथतीर्थ अशी एकूण 20 मोठी तीर्थे आहेत. त्यासोबतच अन्य लहानसहान तीर्थ समूहांनीही श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे माहात्म्य वृद्धिंगत केले आहे. या सर्वच तीर्थामध्ये स्नान केल्याने किंवा त्यांचे दर्शन घेतल्याने पुण्य प्राप्त होते अशी परंपरागत धारणा आहे.
श्रीत्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला देशभरातील भाविक मंडळी येतात. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांच्या मातब्बर राजघराण्यातील असामींपर्यंत व तत्कालीन नामांकित सरदार-उमराव तसेच संस्थानिकांपर्यंत अनेकांनी या पावन क्षेत्राला नित्यनेमाने भेट दिलेली आहे. त्यामुळे येथील तीर्थोपाध्यायांकडे इथे आलेल्या दर्शनार्थींच्या नामावळ्या जवळपास 1400 सालापासून लिखित स्वरूपात नोंदवलेल्या पाहावयास मिळतात तसेच अनेक बडय़ा असामींच्या स्व-हस्ताक्षरातील नोंदीदेखील येथे पाहावयास मिळतात.
श्रीत्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी येणाऱया सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये तीन सर्वोच्च आखाडे तसेच शैवपंथीयांचे आखाडे सामील होऊन सिंहस्थ पर्वाचा आनंद लुटतात. येथे भाविकांकडून अनेक शास्त्र व धर्मविधी केले जातात. नारायण नागबळी, त्रिपिंडी, काळसर्पयोग शांती, जननशांती असे महत्त्वाचे मोक्षदायक, संततीदायक विधी करण्यासाठी सश्रद्ध भाविकांची लगबग कायमच चालू असते.
श्रीत्र्यंबकेश्वर क्षेत्रपरिसराचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या परिसराला लाभलेला संतश्रेष्ठांचा सहवास. संत श्रीज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत येथे त्यांच्या लहानग्या लेकरांसह आले होते. श्रीत्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यावर परतीच्या वाटेवर निघाले असता विठ्ठलपंत आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निवृत्ती यांची रस्त्यात चुकामूक झाली. त्याच वेळी मार्गात वाघाच्या रूपाने डरकाळ्या फोडत साक्षात ‘विघ्न’ समोर येऊन ठेपले तेव्हा तिथे घबराट माजली आणि नंतर झालेल्या पळापळीमध्ये कुमारवयीन निवृत्ती एका गुहेत आश्रय घेते झाले. निवृत्ती ज्या गुहेमध्ये आश्रय घेण्यासाठी गेले होते त्याच गुहेत नाथसंप्रदायातील थोर सिद्ध श्रीगहिनीनाथ ध्यानस्थ बसले होते. निवृत्तींनी त्यांचे दर्शन घेतले तेव्हा श्रीगहिनीनाथांनी निवृत्ती यांना गुहेत आश्रय दिला, काही काळ वास्तव्य करून दिले व यादरम्यान त्याच्यावर अनुग्रह करून त्यास नाथसंप्रदायाची दीक्षा दिली. हे सर्वकाही जणू नियतीने योजलेल्या खेळाप्रमाणेच घडले होते.
नाथसंप्रदायी सिद्धपुरुष श्रीगहिनीनाथांनी नाथसंप्रदायाची दीक्षा दिल्यामुळे निवृत्ती, ‘श्रीनिवृत्तीनाथ’ नावाने ओळखले गेले. पुढे त्यांनी आपले बंधू श्रीज्ञानेश्वर यांना दीक्षा देऊन नाथसंप्रदायाची परंपरा पुढे नेली. श्रीनिवृत्तीनाथांनी पौष वद्य एकादशीस श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. तेथील एका पुरातन वाडय़ात बांधलेल्या समाधीमंदिरात श्रीनिवृत्तीनाथ विराजमान आहेत. त्यांच्या समाधीवर पितळेचा मुखवटा ठेवलेला असून मागील बाजूस श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. शिष्य निवृत्तीनाथांच्या समाधीमागेच ब्रह्मगिरी पर्वतावर त्यांचे गुरू श्रीगहनीनाथ यांचीही समाधी आहे. समोर दिसणारा नीलपर्वत, श्रीनीळकंठेश्वराचे पुरातन मंदिर, श्रीनिलांबिका-मटंबादेवीचे मंदिर, श्रीदत्त व श्रीमारुती यांचे मंदिर तसेच भोवतालच्या नेत्रसुखद परिसराचे स्थानमाहात्म्य अश्रद्धालाही ‘सश्रद्ध’ करेल असे परमरमणीय आहे.





























































