‘स्थान’ माहात्म्य – लेखमाला क्र. 15 – श्रीक्षेत्र धनकवडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

‘धनकवडी’ येथील श्रीशंकर महाराजांचे समाधीस्थान हे केवळ पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील जागृत स्थानांपैकी महत्त्वाचे ‘पुण्यक्षेत्र’ मानले जाते. दर महिन्याची अष्टमी, श्रीशंकर महाराजांची पुण्यतिथी-जयंती व सण-उत्सवादी कार्यक्रमात हजारो भाविकांची गर्दी येथे पाहावयास मिळते. भक्तजनांना, श्रीशंकर महाराजांच्या चैतन्याची अनुभूती करवून देणे हेच या स्थानाचे खरे ‘माहात्म्य’ आहे.

मुक्काम पुणे. सन 1946 मध्ये घडलेली घटना. श्रीशंकर महाराज यांनी काही निवडक भक्तांना आपल्यासोबत घेतले आणि ते पुणे शहराबाहेर देवी पद्मावतीच्या मंदिरामध्ये आले. सर्वांनी पद्मावतीचे दर्शन घेतले. श्रीमहाराज तिथे काही काळ थांबले. ते काही काळ थांबून माघारी परततील असा भक्तांचा समज झाला; मात्र श्रीमहाराज मंदिरातून बाहेर येण्याचे नाव काढेनात. बऱयाच वेळाने अचानक ते उठले, बाहेर आले आणि झपाझप पावले टाकत सातारा रस्त्याच्या दिशेने लागले. बऱयाच वेळाने ते एका शेतापाशी थांबले व म्हणाले, ‘ही जागा गावापासून दूर आहे. पद्मावतीमातेच्या निकट आहे. समाधी घेण्यासाठी हे योग्य स्थान आहे तेव्हा मी येथेच समाधी घेणार!’ श्रीमहाराजांचे हे शब्द कानी येताच तिथे उपस्थित असलेल्या भक्तांच्या पायाखालची जमीन सरकली. श्रीमहाराजांच्या मुखातून आलेले वचन म्हणजे ब्रह्मवाक्य. त्यात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. तेव्हा श्रीमहाराज आपल्याला सोडून जाणारच या विचाराने भक्त कासावीस झाले.

तत्पूर्वी, एकदा 1930 साली नगर येथील मुक्कामात श्रीमहाराजांनी समाधिस्थ होण्याचा निर्णय घेतला; मात्र तिथल्या भक्तांचे आर्जव लक्षात घेत श्रीमहाराजांनी त्यांचा निर्णय 17 वर्षांसाठी पुढे ढकलला. पुढे 1947 साल उजाडले तेव्हा श्रीमहाराजांनी तोच निर्णय पुन्हा बोलून दाखविला. ‘यावेळी नगरकर भक्तांप्रमाणेच आपणही श्रीमहाराजांना कळकळीची विनंती केल्यास ते त्यांचा निर्णय रहित करतील’ असे पुणेकर भक्तमंडळींच्या मनात आले; मात्र या खेपेस श्रीमहाराज कुणाचे काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी निश्चित केलेला ‘वैशाख शुद्ध अष्टमी, सोमवार’चा दिवस उजाडण्याची वाट पाहणे इतकेच भक्तांच्या हाती काय ते शिल्लक उरले.

वैशाख शुद्ध सप्तमी, सन 1947. श्रीशंकर महाराज सकाळी उठले. चहा झाल्यावर काही वेळाने ते ढेकणेमामींना म्हणाले, ‘छोटीशी गादी घाला. एक तक्क्या ठेवा. मी आता येथे बसणार आहे. मला कुणाशीही बोलायचे नाही. कुणालाही भेटायचे नाही. तेव्हा कुणाला हे दार उघडू देऊ नका.’ श्रीमहाराजांनी स्नान केले आणि ते ढेकणेमामांनी आतील खोलीत अंथरलेल्या गादीवर जाऊन बसले. सकाळचे दहा वाजले होते. श्रीमहाराजांच्या आज्ञेनुसार खोलीचे दार बंद करण्यात आले. ढेकणेमामा-मामी तो दिवस आणि रात्र दाराबाहेरच थांबून होते.

वैशाख शुद्ध अष्टमी. जेमतेम पहाट होते तोवर श्रीमहाराजांचा संदेश आला, ‘पुढील सोय करा, ही आत्मज्योत आता बाहेर पडत आहे.’

श्रीमहाराजांचा निरोप ढेकणेमामांनी नजीकच्या भक्तांपर्यंत पोहोचवला. श्रीमहाराजांनी देह त्यागला ही बातमी वाऱयाच्या वेगाने पसरली. श्रीमहाराजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ढेकणेमामांच्या घरी भक्तांचा महापूर लोटला. साश्रुपूर्ण नयनांनी सर्वजण श्रीमहाराजांचे मुखदर्शन घेत होते. प्रत्येकाचा कंठ दाटून आला. श्रीमहाराजांनी सर्वांवर आईच्या मायेने प्रेम केले आणि तीच आई आज आपल्या बाळांना सोडून निघून गेली होती. कुणी हुंदके देत होते, तर कुणी कपाळ बडवून घेत होते. ढेकणेमामांचे घर अक्षरशः दुःखाचा अमर्याद सागर झाले.

श्रीमहाराजांच्या परगावी राहणाऱया भक्तमंडळींना तारा पाठविण्यात आल्या. श्रीमहाराजांच्या दर्शनार्थ भक्तांचा लोंढा उसळून येत होता. त्यातील अनेकांना श्रीमहाराजांच्या समाधिस्थ देहाच्या अनेकविध लीला अनुभवण्यास मिळाल्या. श्रीमहाराजांचा देह रथामध्ये ठेवण्यात आला. मिरवणुकीची तयारी सुरू झाली. श्रीशंकर महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी बाबू गेनू चौकामध्ये भक्तांची अभूतपूर्व गर्दी झाली. ढेकणेमामांच्या घरातून निघालेली ही मिरवणूक काका हलवाई दत्तमंदिराजवळ थांबून पुढे मंडई नजीकच्या श्रीअक्कलकोटस्वामी महाराजांच्या मठाजवळ थांबली. श्रीमहाराजांचे हे नित्यनेमाने येण्याचे स्थान होते. श्रीस्वामीरायांचा निरोप घेऊन मिरवणूक शनिपार व पुढे भिकारदास मारुती मंदिरापाशी आली. रस्त्यावर दुतर्फा श्रीमहाराजांचे दर्शन घेण्याकरिता शोकाकुल भक्तगण उभे होते. विविधरंगी फुलांनी झाकलेला श्रीमहाराजांचा देह शांतपणे मार्ग आक्रमीत होता. त्यासोबत चालणाऱया भक्तांना दुःखाचा आवेग आवरणे निव्वळ अशक्य होते. टाळमृदंगाच्या गजरात भजन म्हणत, जयघोष करीत निघालेली ही श्रीशंकर महाराजांची लेकरे पर्वती, अरण्येश्वर येथून अखेर पद्मावती परिसरात आली. पद्मावतीमातेच्या सान्निध्यात काही काळ राहून सर्व भक्तगण समाधीस्थानी पोहोचले. पूज्य श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे व पूज्य श्रीमारुतीराव माळीमहाराज यांच्यासारखे दिग्गज सत्पुरुष गुरुबंधूला निरोप देते झाले. श्रीमहाराजांना समाधीस्थानी ठेवण्यात आले व जड अंतःकरणाने त्यांच्या देहावर माती लोटण्यात आली. अशा रीतीने थोर सिद्धसत्पुरुष श्रीशंकर महाराज यांच्या देहावताराची समाप्ती झाली.

वास्तविक पाहता, श्रीशंकर महाराज सहजसंचारी होते. त्यांचे येणे-जाणे सर्वत्र व सर्वदूर होत असे. मात्र तरीही त्यांच्या अधिकाधिक वास्तव्याचा काळ सोलापूर, अहमदनगर या भागात होता. पुणे येथेदेखील अनेक भक्तांकडे श्रीमहाराजांचे अधूनमधून वास्तव्य होत असे. असे असतानाही श्रीशंकर महाराजांनी समाधी घेण्याकरिता पुणे शहराच्या बाहेर सातारा रस्त्यावर, पद्मावती परिसरातील निर्मनुष्य, एकांत स्थळ निवडले. त्याकाळी म्हणजेच, 1950च्या दशकात पद्मावतीचा परिसर जंगलसदृश होता. श्वापदांचा नित्य वावर या परिसराला नवा नव्हता. पुणे शहराचा विस्तार तेव्हा फार मोठय़ा प्रमाणात झाला नसल्याने धनकवडी, पद्मावती परिसर सर्वसामान्यांकरिता तसा अपरिचित होता. मात्र गेल्या तीनेक दशकांमध्ये याच परिसराचे रूपडे पालटले आणि आज ‘धनकवडी’ हे पुणे शहराच्या केंद्रस्थानी आले आहे.

आज ‘धनकवडी’ येथील श्रीशंकर महाराजांचे समाधीस्थान हे केवळ पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील जागृत स्थानांपैकी महत्त्वाचे ‘पुण्यक्षेत्र’ मानले जाते. दर महिन्याची अष्टमी, श्रीशंकर महाराजांची पुण्यतिथी-जयंती व सण-उत्सवादी कार्यक्रमात हजारो भाविकांची गर्दी येथे पाहावयास मिळते. भक्तजनांना, श्रीशंकर महाराजांच्या चैतन्याची अनुभूती करवून देणे हेच या स्थानाचे खरे ‘माहात्म्य’ आहे.

[email protected]