अलौकिक श्रीसंतदर्शन : श्रीजांभेकर महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

श्रीरामकृष्ण यांना ‘गायत्री’ मंत्राचे सुप्त आकर्षण होते. प्रपंच, लौकिक व्यवहार तसेच दैनंदिन कामकाजामध्ये ते व्यग्र असले तरीही ‘अंतर्यामी’ गायत्री मंत्राचा जप अहर्निश सुरू असे. या मंत्राच्या लक्षावधी आवर्तनांमुळे लाभलेल्या जपसामर्थ्याने ‘वाचासिद्धी’ प्राप्त झाली असली तरीही त्याची अपूर्वाई रामकृष्णांनी कधी कुणाला जाणवू दिली नाही. कुणी एखादा काही समस्या घेऊन आला की, रामकृष्णांनी त्याला एखादा उपाय सहजपणे सुचवावा अन् त्या समस्याग्रस्ताने रामकृष्णांनी सुचविलेला उपाय अमलात आणला की, आपसूकच त्याची समस्या दूर व्हावी असे वारंवार घडू लागले. सुरत येथे स्थायिक झालेल्या रामकृष्णांच्या बाबतीत हे प्रसंग नित्यनेमाने घडू लागले. कारण पोस्टमन म्हणून काम करताना साहजिकच त्यांचा परिचय परिसरातील अनेकांशी अनेकदा येत असे. रामकृष्णांच्या ऋजू अंतःकरणामुळे अनेक जण त्यांच्याशी मैत्रीभावाने वागत असत आणि आपले मन मोकळे करीत असत. यातूनच अनेक समस्याग्रस्तांच्या अडीअडचणी रामकृष्णांच्या मार्गदर्शनातून दूर झाल्या. नकळतच रामकृष्णांमधील सुप्त देवत्वाचे दर्शन अवतीभवतीच्या मंडळींना घडते झाले.

रामकृष्णांनाही स्वतःमधील बदल जाणवू लागला होता. मात्र, त्यांचे मन बाह्य प्रसिद्धीमध्ये रमण्यापेक्षा भगवंताच्या दर्शनप्राप्तीसाठी आसुसले होते. त्यांना भगवंताच्या सगुण दर्शनाची ओढ लागली. प्रपंच व नोकरीमध्ये देहाने वावरणारे रामकृष्ण मनातून मात्र भगवंताच्या दर्शनाकरिता तळमळत होते. त्यांचे हे भगवद्प्राप्तीचे ‘वेड’ एके दिवशी अशा थराला गेले की, भारावलेल्या अवस्थेत ते घराबाहेर पडले. मध्यरात्रीच्या सुमारास रामकृष्ण तिथल्या स्मशानाजवळील एका तलावापाशी येऊन डोळे मिटून काठावर उभे राहिले. क्षणाक्षणाला परमेश्वरदर्शनाची तळमळ वाढती झाली आणि अखेरीस संयमाचा कडेलोट होताच त्यांनी तलावाच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, त्याचवेळी कुणीतरी रामकृष्णांना विलक्षण वेगाने मागे खेचले आणि खणखणीत आवाजात ‘सुखाचा जीव पाण्यात का लोटतोस?’ असे विचारले.

त्या जोरकस व्यक्तीच्या पकडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करीत रामकृष्ण त्यास म्हणाले, “देवाच्या भेटीसाठी मी व्याकूळ झालो आहे. जर का तोच भेटत नसेल तर या काय जगण्याचा उपयोग?’’ त्यावर ती व्यक्ती रामकृष्णांचा हात धरून म्हणाली, “माझ्यासोबत चल. मी तुला देवदर्शन घडवतो.’’ आणि त्या व्यक्तीने रामकृष्णांना जवळच्याच एका दर्ग्यामध्ये आणले. काही समजण्या-उमजण्याच्या आतच त्या व्यक्तीने रामकृष्णांचे कान फुंकले अन् अनुग्रह देत त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. रामकृष्णांना बीजमंत्र देऊन त्यांची ब्रह्मानंदी टाळी लावणारे आणि तेथून निमिषार्धात अंतर्धान पावणारे ते साक्षात ‘सय्यदबाबा’ होते.

या घटनेनंतर रामकृष्णांचे लौकिक आयुष्य दोलायमान झाले. त्यांच्यातील अवतारीत्वाची छटा गडद झाली. त्यातच बहिणीने त्यांना पंजाब येथे येण्यास सांगितले. रामकृष्णांनी पेस्टाची नोकरी व सुरत शहराला रामराम ठोकला. पत्नी व मुलीसहित बहिणीच्या घरी दाखल झालेले रामकृष्ण तेथे पुन्हा पोस्टाच्या नोकरीतच रमले. प्रपंच आणि परमार्थ नीटसपणे चालू होता. मात्र अशातच एकदा भल्या पहाटे त्यांना एक अवलिया भेटला अन् म्हणाला, “तू संसाराचा मोह सोड. तुझ्याकडून मोठे कार्य व्हायचे आहे.’’ रामकृष्णांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नाही. एव्हाना त्यांच्यातील सिद्धी पूर्णांशाने प्रकट झाली असली तरीही प्रपंचाच्या मायेतून रामकृष्ण पूर्णतः मुक्त झाले नव्हते. पुढे काही दिवसांनी तो अवलिया पुन्हा एकवार त्यांना भेटला आणि म्हणाला, “अजूनही तू प्रपंचापासून दूर होण्याचा निर्णय घेतलेला नाहीस. नोकरी सोड. जमलेले पैसे बहिणीला दे. संसाराचा त्याग कर. देवकार्य कर. कारण तुझे मूल व पत्नी लवकरच हे जग सोडणार आहे.’’

याचदरम्यान एका संकटग्रस्ताची समस्या दूर करण्याच्या निमित्ताने रामकृष्णांनी पहिल्यांदाच सिद्धिसामर्थ्याचा वापर केला. मात्र तो सफल तर झाला नाहीच. मात्र त्याचा परिणाम रामकृष्णांच्या पत्नीचा व मुलीचा जीव गमावण्याने झाला. आयुष्यातील सर्वात मोठे अरिष्ट अनुभवल्यावर रामकृष्ण तक्षणी संसाराचा होम करून सुरत येथील स्मशानभूमीत उन्मनी अवस्थेतच परतले. या स्मशानभूमीमध्ये त्यांचे अवतारकार्य खऱया अर्थाने फुलले, फळले आणि त्यांच्यातील देवत्वाचा अंश ‘श्रीजांभेकर महाराज’ या संबोधनाने सर्वत्र दरवळता झाला.

शेकडो भक्तांना श्रीजांभेकर महाराजांच्या अवतारसामर्थ्याचा अनुभव असतानाच एके दिवशी अचानकपणे तेथे दर्शनास आलेल्या कामेरकर या मुंबईकर भक्ताच्या आग्रहाखातर श्रीजांभेकर महाराज सुरत येथील वास्तव्य दूर सारून मुंबईच्या दादर परिसरात येते झाले. प्रभादेवी येथील फकीरशेटच्या वाडय़ात श्रीजांभेकर महाराजांनी मुक्काम केला. येथे त्यांची आंतरिक भेट श्रीस्वामी समर्थांशी झाली. श्रीस्वामी महाराज त्याकाळी समाधिस्थ झाले असले तरीही त्यांची तसबीर समोर ठेवून श्रीजांभेकर महाराज नित्यनेमाने त्यांची पूजाअर्चा तसेच नैमित्तिक-वार्षिक सण-सोहळे साजरे करू लागले. अन्न संतर्पणे होऊ लागली. श्रीस्वामी समर्थांचा परिचय आपले ‘आजोबा’ या नात्याने करून देणारे श्रीजांभेकर महाराज त्यांच्यापाशी येणाऱया भक्तांच्या समस्या श्रीस्वामींच्या तसबिरीपाशी सांगून सोडवू लागले. “तुझे गाऱहाणे मी आजोबांसमोर ठेवतो’’ असे सांगून ते संकटग्रस्तास मार्गदर्शन करीत आणि उपाय सुचवीत. कुणी भक्त हार, फुले वा नैवेद्य आणता झाला की, त्यास ‘आजोबांचरणी’ अर्पण करण्याची सूचना श्रीजांभेकर महाराज करीत असत.

1930 ते 1940 या दहा वर्षांत श्रीजांभेकर महाराजांच्या अस्तित्वाने दादर-प्रभादेवीच नव्हे तर मुंबईचा बराचसा प्रांत व्यापलेला होता. कधी स्त्राrवेश धारण करणारे, हिंदूंच्या सणांसोबतच मुसलमानांचेही सण साजरे करणारे, रमजानचे ‘रोजे’ धरणारे आणि नवरात्रात देवीमातेसमोर ‘घागरी’ फुंकणारे श्रीजांभेकर महाराज सर्वदूर प्रसिद्ध झाले. संकटग्रस्तांचे तारणहार, सर्वसमभाव मानणारे, कर्ममार्गाचा पुरस्कार करणारे, प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायकाला ओळख आणि महत्त्व मिळवून देणारे, समाजाच्या सर्व भक्तमंडळींना आपलेसे वाटणारे मातृहृदयी वात्सल्यमूर्ती श्रीजांभेकर महाराज 10 जानेवारी 1940 रोजी दादर चौपाटीच्या समुद्र किनाऱयावर शांतपणे विसावले.

आपल्यामागे श्रीनामदेव महाराज केळकर, माऊली काशीबाई आणि श्रीआप्पासाहेब जगदाळे या तीन शिष्यरत्नांच्या रूपाने सेवावृत्तीची परंपरा जागृत ठेवणाऱया श्रीजांभेकर महाराजांच्या अवतारकार्याची प्रचीती, “रामकृष्णनाथा… दयासागरा कृपा करा… दयासागरा कृपा करा’’ असे आर्जव करीत येणाऱया त्यांच्या प्रत्येक भक्ताला आजही जाणवत आहे आणि उद्यासाठी आश्वस्तही करीत आहे. (उत्तरार्ध)

– [email protected]