
>> विवेक दिगंबर वैद्य
गुरू-शिष्य परंपरेच्या आधारे उपासनेचे मार्गदर्शन होऊन कैवल्यपद मिळावे म्हणून, श्रीदत्तात्रेयांनी ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ नावाने मानवदेह धारण केला. त्यांच्या वास्तव्यामुळे पीठापूर आणि कुरवपूर ही क्षेत्रे पावन झाली. श्रीपादश्रीवल्लभांचे जन्मस्थान पीठापूर हे आंध्र प्रांतात असून बेझवाडा-विशाखापट्टण साऊथ सेंट्रल रेल्वेलाइनवर राजमहेंद्री (जिल्हा पूर्वगोदावरी) येथे आहे, तर कुरवपूर श्रीपादस्वामींनी त्यांचे अवतारकार्य समाप्त केले. कुरवपूर हे प्राचीन दत्तक्षेत्र आंध्र राज्यात कृष्णा स्टेशनपासून दूर बेटावर वसलेले आहे.
अत्रीऋषींचे तपोबल व अनसूयेच्या पातिव्रत्य सामर्थ्यातून श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला. कलियुगात म्लेंछ राजवटीमध्ये समाज दयनीय स्थितीत असताना ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ हे ब्रीद सार्थ करीत दक्षिणप्रांती, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पादगया (पीठापूर) या क्षेत्री श्रीदत्तात्रेयांनी भक्तजनोद्धारार्थ ‘श्रीपादश्रीवल्लभ’ नावाने अवतार धारण केला. पीठापूर येथे अप्पळराज हा ब्राह्मण त्याच्या पत्नीसह वास्तव्य करीत होता. सदाचरणी व पतिव्रता पत्नी सुमती अतिथी-अभ्यागतांची मनोभावे सेवा करीत असे. ते दोघेही सत्त्वगुणी होते. सुमती श्रीविष्णोपासक होती. सर्वकाही यथायोग्य होते तरी त्यांची सर्व अपत्ये जन्मतःच मृत्युमुखी पडत असत या कारणाने पतीपत्नी दुःखी व चिंतीत असत. कालांतराने त्यांना एकापाठोपाठ एक असे दोन पुत्र झाले, मात्र त्यातही एक पांगळा तर दुसरा आंधळा जन्मला.
एकदा अप्पळराजाकडे अमावास्येस त्यांच्या वडिलांचे श्राद्धकार्य सुरू असताना मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात त्यांच्या दारी आले. दारी आलेल्या अतिथीचे सुमतीने स्वागत करून त्यांस श्राद्धासाठी तयार केलेला स्वयंपाक भिक्षारूपाने वाढला. प्रसन्न झालेल्या श्रीदत्तात्रेयांनी सुमतीला आपल्या मूळ स्वरूपात दर्शन दिले. सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्रीदत्तात्रेय तिला प्रसन्नचित्ताने म्हणाले, ‘माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग.’ तेव्हा सुमती विनम्रपणे म्हणाली, ‘भगवंता, आपण मला ‘माते’ म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करा. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. दोन पुत्र वाचले, परंतु ते असून नसल्यासारखे आहेत, कारण त्यातील एक आंधळा व दुसरा पांगळा आहे. मला आपल्यासमान विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप पुत्र व्हावा.’
सुमतीची इच्छा जाणून श्रीदत्तप्रभू तिला म्हणाले, ‘माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची मोठी कीर्ती होईल, परंतु तो जे सांगेल तसेच तुम्ही करा. अन्यथा, तुमच्यापाशी तो राहणार नाही. हा पुत्र तुमचे सर्व क्लेश व दैन्य नाहीसे करेल.’ असा सूचक आशीर्वाद देऊन श्रीदत्तात्रेय अदृश्य झाले.
यथावकाश सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण होताच भाद्रपद शु. चतुर्थी, शके 1320 या शुभदिवशी ती प्रसुत झाली. पुत्र जन्मला. विद्वान ब्राह्मणांनी जन्मपत्रिका तयार करून बाळाचे भविष्य ‘हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरू होईल’ असे सांगितले. नवजात बालकाचे नाव ‘श्रीपाद’ ठेवले गेले. हा साक्षात श्रीदत्तावतार असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाल्याची जाणीव मातापित्यांना होती. ते आनंदाने बाळाचे संगोपन करीत असत. श्रीपाद सात वर्षांचा झाला तेव्हा अप्पळराजाने त्याचे मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. न्याय, मीमांसा, तर्कादी दर्शनशास्त्रांतही तो पारंगत झाला व त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इ.चे ज्ञान लोकांना समजावू लागला. त्याची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क होत. त्याच्याकडील ज्ञान श्रवण करण्यास अनेक मंडळी पीठापुरास येत. श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्या वेळी ते म्हणाले, ‘मी विवाह करणार नाही. मी तापसी ब्रह्मचारी, योगश्री हीच आमची पत्नी. माझे नाव श्रीवल्लभ आहे. मी तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे.’ हे ऐकून मातापित्यांना दुःख झाले. परंतु सुमतीला श्रीदत्तप्रभूंचा सूचक आशीर्वाद आठवला आणि ते दोघे उभयता शांत राहिले.
काही काळाने श्रीपादांनी त्यांच्या आंधळ्या-पांगळ्या बंधूंना नवजीवन प्रदान केले. त्यांना आयुष्य जगण्यायोग्य बनविले व ते घरातून बाहेर पडले व एकाएकी गुप्त झाले. ‘श्रीगुरुचरित्र’ ग्रंथामध्ये श्रीपादश्रीवल्लभांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र श्रीपादांचे समकालीन शंकरभट्ट लिखित संस्कृत चरित्र व काही काळाने तेलगू तसेच विविध भाषांतील अनुवादामुळे श्रीपादांचे विस्तृत चरित्र लोकांसमोर आले.
कलियुगामुळे विश्वभरात विपरीत ज्ञान वाढते झाले. आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर भक्तांची अवस्था आंधळ्या-बहिऱ्यागत झाली. पाप व दुराचरण यांचा भूमीवर भार होऊ लागला. त्यांना गुरु-शिष्य परंपरेच्या आधारे उपासनेचे मार्गदर्शन होऊन कैवल्यपद मिळावे म्हणून, श्रीदत्तात्रेयांनी ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ नावाने मानवदेह धारण केला. त्यांच्या वास्तव्यामुळे पीठापूर आणि कुरवपूर ही क्षेत्रे पावन झाली.
श्रीपादश्रीवल्लभांचे जन्मस्थान पीठापूर हे आंध्र प्रांतात असून बेझवाडा-विशाखापट्टण साऊथ सेंट्रल रेल्वेलाइनवर राजमहेंद्री (जिल्हा पूर्वगोदावरी) येथे आहे, तर कुरवपूर श्रीपादस्वामींनी त्यांचे अवतारकार्य समाप्त केले. कुरवपूर हे प्राचीन दत्तक्षेत्र आंध्र राज्यात कृष्णा स्टेशनपासून दूर बेटावर वसलेले आहे. दोन मैल रुंद कृष्णेच्या प्रवाहातील हे बेट एक मैल लांब, अर्धा मैल रुंद असून एका टोकास श्रीपाददत्तमंदिर तर दुसऱ्या टोकास गाव व मध्यभागी काही शेतजमिनी आहेत. श्रीपादश्रीवल्लभ यांचे हे तपःश्चर्यस्थान असून येथील एका गुहेत त्यांच्या पादुका व शिवलिंग आहे. गुरुद्वादशीला येथे मोठी यात्रा भरते. श्रीवासुदेवानंद सरस्वतींनी या ठिकाणाचा प्रथम शोध घेतला. येथे त्यांचे साधनास्थळ असून येथेच त्यांनी एक चातुर्मासही केला होता आणि महत्त्वाचे म्हणजे आबालवृद्धांना संकटमुक्त करणाऱ्या ‘घोरकष्टोद्धरण’ या अद्वितीय स्तोत्राची रचनादेखील त्यांनी येथेच केली होती. श्रीधरस्वामींनीही येथे वास्तव्य केले होते.
कुरवपूर येथे वस्तू उपलब्धतेची वानवा आहे. गरजेच्या वस्तू दूर रायचूरहून आणि त्याही उन्हाळ्यात कृष्णा नदीला उतार असताना आणल्या जातात. कृष्णेचे पात्र खडकाळ, महाकाय दगडी शिळांनी व्यापले आहे. हा खडतर प्रवास पावसाळ्यात केला जात नाही, मात्र हे स्थान जागृत असल्याने अनेक भाविक या स्थानी येतात. गेल्या काही वर्षांत येथे येणाऱ्या श्रीदत्तभक्तांची संख्या वाढलेली आहे. प्रत्येक श्रीदत्तभक्ताने आयुष्यात एकदा कुरवपूर, पीठापूर या स्थानांना भेट देऊन ‘श्रीपादश्रीवल्लभ’ या पहिल्या दत्तावताराचे दर्शन घेतले पाहिजे.





























































