संस्कृती सोहळा – ‘गीतरामायण’ एकसष्टीचा स्वरप्रवास…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>यशोधन जटार

‘गीतरामायण’ ही कलाकृती गदिमा, सुधीर फडके आणि त्यांच्या तत्कालीन कलाकारांच्या हातून घडून गेली. या कलाकारांचे आपल्या रसिकांवर प्रचंड मोठे ऋण आहेत आणि आपण त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करायला हवे. याच भूमिकेतून गीतरामायण एकसष्टी ही कलाकृती घडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलाकारांना आलेले अनुभव आणि त्यांचा स्वरप्रवास मांडणारा लेख.

गीतरामायणा’ला 61 वर्षे पूर्ण होतायत, तर ‘गीतरामायणा’चे 61 कार्यक्रम करू या का…?’’ अशी एक संयुक्तिक आणि सुरेल कल्पना घेऊन साधारण जानेवारी-फेब्रुवारी 2016 मधील एका संध्याकाळी संपदा गोखले आमच्याकडे आली. उमा आणि मी त्यापूर्वी काही इतर गायकांबरोबर ‘गीतरामायणा’च्या कार्यक्रमात साथ केली होती म्हणून थोडासा अनुभव गाठीशी होता. संपदाच्या या कल्पनेला आम्ही ताबडतोब अतिशय आनंदाने होकार दिला. एका महत्त्वाकांक्षी सांगीतिक प्रकल्पात आम्हाला सहभागी होता येणं ही फार भाग्याची गोष्ट होती. त्यानिमित्ताने ही कलाकृती अजरामर करणाऱया ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अवर्णनीय आणि अतुलनीय कामगिरीला एक मानाचा मुजरा करण्याची संधी आम्हाला मिळत होती यापेक्षा आणखी भाग्य कोणते? त्याचा स्वीकार करणं हे आम्ही आमचं कर्तव्यच मानलं. थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 61 कार्यक्रम साधारण वर्ष-दोन वर्षांच्या कालावधीत करायचे ही तशी सोपी गोष्ट नव्हती, पण संपदाने ही कल्पना मांडली.

कार्यक्रमात कोणती आणि किती गाणी घ्यायची यावर संपदा आणि आमचे पहिल्या भेटीतच एकमत झालं. ‘‘तुझ्या सोबत गायला आणखी कोण कोण असणार आहेत?’’ यावर संपदाने भरभर तिचा बदलापूरला वास्तव्याला असणारा मावसभाऊ विश्राम तुळपुळे, मैत्रीण अश्विनी सराफ आणि समूह गायनाला तिच्याच बहिणी, स्मिता दीक्षित, विद्या ओक आणि शुभदा काळे असतील असे सहजपणे सांगून टाकले. आम्हाला साहजिकच यापैकी त्यावेळी कोणीच माहीत नव्हते, पण संपदाचा एकूणच या सगळ्या प्रकल्पाबद्दलचा आत्मविश्वास आणि धडाडीबद्दल मनोमन कौतुक वाटलं. साथीसाठी व्हायोलिनला माझी पत्नी उमा आणि तबल्याला अर्थात मीच असणार हे तिला लगेच ठामपणे सांगून टाकलं. संपदाने अर्थातच ते गृहित धरलं होतं. त्यामुळे आमचा उत्साह आणखीच वाढला. ‘गीतरामायणा’तील गीतं, त्यातील मधल्या सुरावटींमुळेही (interlude pieces) अधिक रंगतदार आणि समृद्ध झाली आहेत. त्यामुळे हार्मोनियमच्या साथीला आम्हा दोघांनाही पूनम सोमण हिचं नाव लगेच सुचलं. कारण तिच्याबरोबर आम्ही काही कार्यक्रम यापूर्वीही एकत्रपणे वाजविले होते आणि तिच्या वादनातील प्रामाणिकपणा आणि अभ्यासपूर्णता आम्ही यापूर्वीही अनुभवली होती. काही कार्यक्रमात अमोल जोशी, साधना पोफळे आणि वैष्णवी तळेकर यांनीही हार्मोनियमची समर्थ साथ केली. निवेदनासाठी वरदा भिडे आणि अनुपमा कुलकर्णी ही दोन नावंही सहजपणे नक्की झाली. तालवाद्यांसाठी प्रथमेश जटार आणि स्वाती मेहेंदळे ही नावंही ठरली. काही कार्यक्रमांत इतरही काही गायक-वादकांनी साथ केली.

नेमकी किती आणि कोणती गाणी कार्यक्रमात घ्यायची हेही ठरवावं लागलं. कारण संपदा आणि तिच्या भावंडांना जवळ-जवळ सर्वच गाणी चालींसकट तोंडपाठ होती. शेवटी आम्ही 15 गाणी निवडली. गीतांच्या सादरीकरणात काही जुजबी तांत्रिक सुधारणा करून या संकल्पातील पहिला कार्यक्रम दि. 9 एप्रिल 2016 रोजी पुण्यातील साळुंके विहार सोसायटीत ठरला. आम्ही सर्वांनी प्रचंड उत्साहात तो कार्यक्रम सादर केला. रसिकांनीही त्याला उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद दिला आणि आमच्या या सांगीतिक संकल्पाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम संपल्यावर अजून 60 कार्यक्रम करायचे आहेत याची मनोमन जाणीव झाली. खूप मोठा टप्पा गाठायचा होता.

बाहेरगावचा पहिला कार्यक्रम बारामतीमधील ब्राह्मण संघटनेतर्फे आयोजित केला होता. तिथेही या अभिनव संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याआधारे दि. 22 ऑक्टोबर रोजी बारामतीजवळील एका वृद्धाश्रमात कार्यक्रम सादर केला. पुण्याबाहेर बदलापूर, श्री महालक्ष्मी मंदिर नवरात्रोत्सव, कोल्हापूर, अडिवरे, रामदासी आश्रम, वांगणी इ. ठिकाणी ‘गीतरामायणा’च्या आमच्या या संकल्पाची पताका ‘स्वरसंपदा’ या आमच्या ग्रुपच्या कलाकारांनी फडकवली. ऐन दिवाळीत श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी इथल्या श्री दत्तक्षेत्री आमची कला सादर करण्यासाठी आमंत्रण मिळणं हे आमचे फार मोठे भाग्य होते असे आम्ही मानतो. कोल्हापूरच्या देवळातील कार्यक्रमाच्या वेळी अकाली आणि अवेळी आलेल्या पावसाने हजेरी लावली, पण तशाही प्रतिकूल परिस्थितीत समोरचे रसिक खुर्च्यांवर पाय घेऊन बसले होते. कारण खाली सुमारे दीड-दोन फूट पाणी साचले होते, पण पाच-सहा गाणी झाल्यानंतर मात्र तिथल्या ध्वनिव्यवस्थेत पाणी शिरल्यामुळे नाइलाजास्तव तो कार्यक्रम आवरता घ्यावा लागला. पाऊस थोडा थांबल्यावर आम्ही देवळातून एस.टी.स्टॅन्डपर्यंत पोहोचण्यासाठी तिथून अक्षरशः पळ काढला. असे काही गमतीदार किस्सेही या स्वरप्रवासात घडले.

पुण्यात आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणीही आमचे कार्यक्रम सादर करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्यामध्ये श्री रहाळकर राम मंदिर, श्री दशभूजा गणपती मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्ट, तुळशीबाग राममंदिर, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, औंध, जंगली महाराज मंदिर, श्री नृसिंह मंदिर, श्रीमंत दगडूशेठ दत्तमंदिर, उपाशी विठोबा मंदिर, श्री गुरुदेव दत्तमंदिर, कमला नेहरू पार्क, जगद्गुरु श्री शंकराचार्य मठ, मोदी गणपती मंदिर, प्रीतमनगर राममंदिर, तिवारी गजानन महाराज मंदिर इत्यादींचा समावेश आहे.

या संकल्पपूर्तीमध्ये असंख्य संस्थांचे आणि व्यक्तींचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य लाभले ही एक प्रकारे श्रीरामांचीच कृपा म्हणावी लागेल. त्यामध्ये पी.एन.जी ऍन्ड सन्स, अ.भा. ब्राह्मण महासंघ, महर्षी कर्वे स्त्र्ााr शिक्षण संस्था, लोकमान्य क्रेडिट सोसायटी, कामायनी संस्था, ब्रह्मचैतन्य आश्रम, युनायटेड वेस्टर्न सोसायटी, एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघ, बंधन सोसायटी, नटराज सोसायटी, बॅंक ऑफ बडोदा निवृत्त अधिकारी संघटना, रोटरी क्लब, आनंदघन विरंगुळा केंद्र यांचा समावेश आहे, याबरोबरच अनेक अनामिक हितचिंतकांचे, सर्व रसिकांचे ‘स्वरसंपदा’ नेहमीच ऋणी असणार आहे.

61 कार्यक्रमांच्या स्वरप्रवासाने आम्हाला खूप काही दिले. प्रचंड आत्मविश्वास, धैर्य आणि अचानक आलेल्या अडचणींना यशस्वीपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य दिले. सांघिक आणि मैत्रीची भावना दृढ झाली. असंख्य व्यक्तींच्या नवीन ओळखी झाल्या. या संपूर्ण स्वरप्रवासात आम्ही सर्वजण एका कुटुंबासारखे वावरलो. प्रत्येकाच्या मनात एकच उद्दिष्ट होते. 61 कार्यक्रम करण्याचे. मग त्यासाठी आपल्यातील कलागुण सर्वोत्तम पद्धतीने रसिकांसाठी सादर करायचे हे एकच ध्येय प्रत्येकाच्या मनात होते. सर्वच मंडळी एका झपाटलेल्या अवस्थेत होती. शेवटचे आठ कार्यक्रम तर आम्ही केवळ 11 दिवसांत केले. दि. 26 मार्च 2018 च्या 61 व्या कार्यक्रमातील ‘गा बाळांनो…’ या भैरवीच्या सांगतेनंतर सर्वांच्याच डोळ्यांतून नकळतपणे ओघळणारे संकल्पपूर्तीच्या यशस्वी समाधानाचे आनंदाश्रू मात्र कुणालाच लपविता आले नाहीत. दोन वर्षांच्या अथक धावपळीनंतर संकल्पपूर्तीच्या समाधानाचे ते अविस्मरणीय क्षण अवर्णनीय होते.

61 कार्यक्रमांचा हा संस्मरणीय स्वरपट झरझर पुढे सरकला. श्रीरामकृपेने संपूर्ण 61 कार्यक्रमांदरम्यान आमच्यात कोणतेही गैरसमज, वाद-विवाद, रुसवे-फुगवे, प्रवासात अपघात असे काहीही झाले नाही. आम्ही सर्व ‘गीतरामायण 61’ या आडनावाच्या एकसंध कुटुंबातील सदस्य बनलो होतो आणि आजही आमच्यातील मैत्रीची नाती अबाधित आणि सुरेल आहेत याचा आम्हा सगळ्यांनाच अभिमान आणि आनंद आहे. आम्ही सर्वच आजही – म्हणजे संकल्पपूर्तीच्या तीन-चार वर्षांनंतरही असंख्य संस्मरणीय आठवणींमध्येच रममाण असतो. त्याचे कवित्व अजूनही आणि यापुढेही आम्हाला सुरेल स्मरणरंगातच ठेवणार आहे हे निश्चित.
(लेखक तबला वादक आणि संगीत अभ्यासक आहेत)