समाजभान – भावविरेचन

>> युगा सावंत

पिढय़ान् पिढय़ा आपल्या मनावर काही संस्कार हे कोरले गेले आहेत. माणसाने कुटुंबासाठी, समाजासाठी जमवून घेतलेच पाहिजे. मोठय़ांचा आदर आणि लहानांशी जुळवून घेणे याला पर्याय नसतो. त्यात काही चुकीचे नाही. मात्र या सगळय़ात असलेला‘च’ हा शब्द मात्र अनेकदा वाद निर्माण करतो. पुन्हा या ‘च’ ची उत्तरे मात्र अनेकदा मिळत नाही. पालक आणि मुले यांच्यातील संघर्ष यावरूनच होत असतो. अर्थात पालक बरोबर की मुले बरोबर हा प्रश्नही चुकीचा आहे. कारण त्या त्या जागी त्या त्या वेळी ते ते बरोबरच असते. फक्त त्या संकल्पना किती काळ जतन करायच्या, साठवायच्या हाच प्रश्न असतो.
मानव हा कळपात राहणारा प्राणी आहे. त्याला एकांत फारसा रुचत नाही. त्याचा हा लाडका कळप जर सक्तीने काढून घेतला गेला तर त्याचा सामना थेट स्वतःशी होतो. त्याच्या वास्तवाशी होतो. ज्याला खरंतर तो ओळखतच नसतो. मग मात्र तो आतून गडबडून जातो. डगमगतो, घाबरतो, पळतो असे अनेक अनुभव तो घेतो. पण त्यावर बोलायला मात्र हमखास घाबरतो. मग मात्र कलेसाठी, स्वतःच्या आनंदासाठी एरवी वेळ नाही असं गाणं गाणारा माणूस हा मिळालेला वेळ किंवा हौस म्हणून घेतलेला एकांत फारच कमी काळाचा असू शकतो यावर शिक्कामोर्तब करतो आणि तो कळपाकडे धावतो. कारण मानवाचा स्थायीभाव हा समूह मागतो. कुटुंब ही मानवासाठी कार्यरत राहायला सतत उद्युक्त करणारी ऊर्जा आहे हे खरं. त्यामुळे उद्या माझ्यासमोर मला स्वतःला उभं राहावं लागलं तर मी माझ्याशी कसं वागू, हे आपल्याला कुणीच सांगत नाही. अशी कल्पनाच आपण केलेली नसते. ना आपल्याला हे कोणी शिकवलेलं असतं.

एकूणच कळत नकळत पिढय़ान्पिढय़ा हे आपल्यावर काळ्या दगडावर कोरलेल्या पांढऱया रेषेसारखं कोरलं गेलं आहे की, कुटुंबासाठी, समाजासाठी तडजोड, समजूत-दारपणा, वयाचे भान, मोठय़ांचा आदर, लहान मुलांशी जुळवून घेणं हे सारं जमलंच पाहिजे. त्या त्या वयात त्या त्या आयुष्य बदलणाऱया घटना घडल्याच पाहिलेत. आपण बदललो नाही तरी हे सगळे नियम असल्यासारखे झालेच पाहिजेत. नाहीतर चार माणसं काय म्हणतील? त्याला जमलं तुला जमलंच पाहिजे. तू सोसलं पाहिजेस. मी सांगतो आहे ते ऐकलंच पाहिजे. इथे आला अट्टहास. लोकांच्या आयुष्यात बदल झालेच पाहिजेत हा अट्टहास. स्वतः अपवाद.

बरं वरच्या या वाक्यांमध्ये नकार द्यावा असं काहीच नाही. पण यातला ‘च’ मात्र फार घातक ठरतो. यावर ‘का’ विचारण्याची सोय नाही. उत्तरं मोठय़ांसारखी मिळतही नाहीत. लहानांना स्पष्ट दिसतं की आता मोठी माणसं वेळ मारून नेत आहेत किंवा पळ काढत आहेत. पण त्यांना उत्तर नाही, ओरडा मिळतो. तू लहान आहेस, मग (साधारण वर्षभरात) उत्तर बदलतं. सूर तोच… मग आता मोठा झाला आहेस. मुलींसाठी ठरलेलं उत्तर, सासरी जाऊन काय करशील? ही मोठय़ांची उत्तरं आहेत.

पण आता बघा हं, लहान मुलांच्या वाक्यात मात्र हाच ‘च’ आला की सगळं बदलून जातं बरं. मला आताच भातुकली हवी यातला च मात्र फार फार चुकीचा. कारण संस्कार व्हायला हवेत योग्य वेळी. असो, तरीही हे सगळं कबूल आहे. ते नाकारण्याची संधी, मुभा, ऑप्शन ना आधीच्या पिढीला होता ना आमच्या पिढीला आहे. ना यानंतरच्या पिढीला दिला जाईल. कारण तेव्हा ते सगळं आमचे संस्कार नाही, पण आमच्या PRESTIGE चा विषय होईल ना… त्यामुळे पुढच्या पिढीलासुद्धा मुभा मिळेल का शंका राहतेच. पण या सगळ्यात अनेक प्रकारच्या समजुती, गैरसमजुती, Concepts, चुकीच्या मनोधारणा, intentions यांना आपण खतपाणी घालतो. इथे मुद्दा चांगलं-वाईट, खरं-खोटं, बदलणारी पिढी, पुढे जाणारा काळ हा नाहीच आहे. मुद्दा आहे व्यक्ती तितक्या प्रकृती.

लोक कसं वागतात यापेक्षा आपण स्वतः आयुष्यातल्या अनेक प्रसंगांत वेगवेगळं वागतो. परिस्थितीशी सहसा घाईतच Deal करतो. हे विसरून आपण लोकांना या काळात आदर्श असलेलेच खूप सल्ले देतो. आपण अनेकदा सल्ले मागतोही. पण गंमत बघा, सल्ला घेताना आपल्याला तो आदर्श नसलेला मिळाला तर आवडतं. सहसा मला जे पटलं आहे त्यालाच पुष्टी देणाऱया लोकांकडे सल्ले मागायला जातो आपण. म्हणजे पुन्हा जबाबदारी दुसऱयाची, निर्णय कळपाचा आणि मी मनमौजी!

पण या सगळ्यात आपण फक्त वेळ मारून नेतो आहे आणि काहीतरी आत मनात साचून राहत आहे. राग, द्वेष, ईर्षा, सुडाची भावना, शल्य वगैरे वगैरे ज्याच्यापासून आपण पळू शकणार नाही आहोत कधीच. व्यक्त होण्याची चोरी आहेच. कारण लहान असताना बोलताना सुराचं ज्ञान कमी असल्याने आपला मुद्दा बरोबर असला तरी आपण उद्दट नसावं असं ओझं आणि नमतं घेत राहायचं शिकलो आहे. धारिष्टय़ असलं तरी त्याचा पाया वेळोवेळी व्यक्त न झाल्याने उद्रेक व्हावा असा पुरेसा अहंमन्य असल्याने सूरच चुकतो. पुन्हा निष्पन्न काहीच होत नाही. त्यामुळे पुन्हा आपण तिथेच अडतो. मग तिथून मोकळं आणि

स्वच्छ होण्याचा मार्ग कोणता?

या सगळ्याचा मतितार्थ हा पालक चूक आम्ही बरोबर हा नाही आहे. त्या त्या जागी त्या त्या काळात ते ते बरोबर असले तरी त्या वर्तनातून ज्या संकल्पना आपण जतन करत राहतो त्या किती काळ साठवायच्या, हा आहे. आधीच्या पिढीने नाही घेतला शोध या मार्गाचा. पण आपल्याला संस्कार त्यांनीच दिलेत. ते संस्कार आपणही पुढे देऊच आनंदाने. Prestige म्हणून नाही तर त्यातलं सत्त्व कळलं आहे म्हणून. त्यासोबत आता या प्रश्नांच्या गर्तेतल्या अंधारात प्रकाशाचा शोध आपणच घेऊया आणि पुढच्या पिढीला किमान उत्तर म्हणून तो देऊया. किमान त्यांच्यासाठी उत्तर होऊया.

तो शोध इथे सुरू होतो…

स्वतःशी आपल्याला Deal करता येतं का? स्वतःशी आपल्याला बोलता येतं का? स्वतःसाठी मी काय करतो?

माझ्या मनशांतीसाठी मी काय करतो?

मुद्दा इथे आहे.

(लेखिका मानसोपचारतज्ञ आहेत.)
– [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या