
> ब्रिगेडियर हेमंत महाजन
चीनमध्ये 2022 सालात गेल्या साठ वर्षांतली सर्वात कमी लोकसंख्या नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी चीनचा राष्ट्रीय जन्मदर कमालीचा घटल्याचं दिसून आलं आणि यामुळे चीन सध्या वृद्धांचा देश बनला आहे. चीनमध्ये 2022 मध्ये 95 लाख मुलांचा जन्म झाला होता. 2021 साली ही संख्या एक कोटी 62 लाख इतकी होती. ज्या देशात 18.9 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत, जोपर्यंत वृद्धांची संख्या 7.5 पर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी होत राहील.
लोकसंख्येच्या बाबतीत चीन जगात अग्रेसर देश आहे, पण आता चीनमधील वृद्धांची संख्या सध्या झपाटय़ाने वाढत आहे, असे एका सर्वेक्षणातून समोर आले. चीनमधील ज्येष्ठ नागरिकांना एका ठरावीक वयोमर्यादेनंतर निवृत्तीवेतन मिळत नाही. त्याचा गंभीर परिणाम आता चीनच्या अर्थव्यवस्थेला भोगावा लागणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. देशातील वृद्धांची संख्या वाढल्यामुळे देशात प्रभावी व शारीरिकदृष्टय़ा सक्षम मनुष्यबळाची कमतरता भासू लागते. याचा थेट परिणाम मग देशाकडे येणाऱया संपत्तीच्या ओघावरही दिसून येतो. परिणामी, चीनच्या अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडत आहे.
चीनची लोकसंख्या घटली म्हणजे देशाची आर्थिक उभारणी करण्यासाठी कमी तरुण असतील आणि त्यांना वाढत्या वृद्धांना आधार द्यावा लागेल. म्हणून 2020मध्ये सरकारने पुरुषांसाठी सध्याच्या 60 आणि महिलांसाठी 55च्या पुढे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे आर्थिक वाढ कमी होत आहे. वृद्ध लोकांना अधिक आरोग्य सेवांची आवश्यकता असते, ज्यामुळे चीनच्या आरोग्य सेवा प्रणालीवरील भार वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सेवा खर्च वाढू शकतो आणि उत्पादकता कमी ह्तो आहे. कारण इतर वृद्ध नातेवाईकांची काळजी घेण्यासाठी वेळ घेतात. वृद्ध वयानुसार कमी बचत करतात आणि जास्त खर्च करतात, ज्यामुळे चीनचा बचत दर कमी होऊ शकतो. त्यामुळे चीनला त्याच्या कर्जासाठी वित्तपुरवठा करणे आणि भविष्यातील वाढीसाठी गुंतवणूक करणे अधिक कठीण होईल.
देशातील वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे देशाच्या वैचारिक प्रगतीवरही परिणाम होतो. नवे विचार, नव्या कल्पनांना वाव मिळत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला देश कुठेतरी कमी पडेल अशी भीती चिनी नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत चीनमधील ज्येष्ठांची संख्या 27 कोटी आहे. 2050 पर्यंत ही संख्या 55 कोटी जाण्याची शक्यता चीनच्या ‘नॅशनल वर्किंग कमिशन’ने वर्तवली आहे. चीनमधील तरुणांची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. त्यासाठी सरकार सातत्याने नवीन योजना राबवून जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
‘एक मूल धोरणा’मुळे महिला-पुरुषांचे लोकसंख्येतील प्रमाणही व्यस्त झाले आहे. 120 मुलांमागे 100 मुली असे हे प्रमाण आहे. आता चीनमध्ये पुढील काही दशकांपर्यंत लिंग विषमतेचा धोका राहणार असून ‘एक मूल धोरण’ हे गेल्या 15-20 वर्षांपूर्वीच रद्द करणे अपेक्षित होते, पण ते झाले नाही. चीनमधील तरुण पिढी लग्नाकडे पाठ फिरवत असून त्यामुळे जन्मदर घसरला आहे. त्यातच अपत्य जन्माला येऊ न देणे हा ट्रेंडही चीनच्या काही मोठय़ा शहरांत दिसून येत असल्याने जन्मदर आणखीनच घसरण्याची चिन्हे आहेत. परिणामी 2050 पर्यंत चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात अनुत्पादक पिढी राहील, जिचे देशाच्या विकासात योगदान नगण्य असेल.
गेल्या काही वर्षांत चीनच्या घटत्या लोकसंख्येमुळे जिनपिंग सरकारचा आधीच ताण वाढला आहे. म्हणून मग देशातील जन्मदर वाढवण्यासाठी जिनपिंग सरकार नवनवीन योजनांवर भर देत आहे. चीनने नवविवाहित जोडप्यांसाठी एक योजना आणली आहे. ज्याअंतर्गत जोडप्यांना 30 दिवसांची सशुल्क विवाह रजा दिली जाईल, जेणेकरून पती-पत्नी एकमेकांसोबत वेळ घालवू शकतील आणि लोकसंख्या वाढवण्यात भागीदार बनू शकतील. याआधी चीनमध्ये लग्नासाठी फक्त तीन दिवसांची सशुल्क रजा उपलब्ध होती. मात्र येथील लोकसंख्या झपाटय़ाने कमी होऊ लागल्यावर सरकारला आपले धोरण बदलणे भाग पडले आहे.
चीनने जन्मदरात होणारी मोठी घसरण रोखण्यासाठी तीन मुले जन्माला घालण्याचे धोरण आखले आहे. बीजिंग, सिचुआन आणि जियांगशी प्रांतात आई-वडिलांना जास्त सुट्टय़ा देणे, मातृत्व रजा, पितृत्व रजा, विवाहासाठी सुट्टी आणि पितृत्व सुट्टय़ा वाढवणे अशा सुविधा दिल्या जात आहेत. मात्र विस्कटलेली लिंग गुणोत्तराची घडी, मूल जन्माला येऊ न देणे यांसारखे विचार रुजल्याने चीनच्या विकासावर याचा दूरगामी परिणाम होणार आहे. एकंदर चीनने 1960 पासून लोकसंख्येबाबत जे कठोर धोरण आखले, ते त्यांना चांगलेच महागात पडले.
चीनमध्ये होणारे हे बदल व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी त्याला किती कालावधी लागेल हे सांगता येणे कठीण आहे. कारण चीनपुढे असणारे आणखी एक संकट म्हणजे बदलते तंत्रज्ञान. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी चीनमधील ज्येष्ठ नागरिक कितपत जुळवून घेतात, हे चीनसाठी फार मोठे आव्हान आहे. यावर उपाय म्हणजे चीनला एकतर आपल्या वृद्ध लोकसंख्येला डोळ्यांसमोर ठेवून तंत्रज्ञानात बदल करावे लागतील किंवा या ज्येष्ठ नागरिकांना बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःलाच बदलावे लागेल. कोणताही निर्णय घेताना आधी देशातील वृद्धांच्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. तसेच देशात स्थानिक पातळीवरही ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने बदल करावे लागणार आहेत. आपल्या या वृद्ध लोकसंख्येचे हित पाहताना देशातील तरुण दुखावले जाणार नाहीत याचा विचारही चीनला करावा लागणार आहे.
एकूणच चीनमधील वृद्ध लोकसंख्या देशाची आर्थिक वाढ आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करेल. हे परिणाम कमी करण्यासाठी चीनला आरोग्य सेवेमध्ये गुंतवणूक करावी लागेल, काम करणाऱ्या वयातील लोकसंख्येला चालना देण्यासाठी इमिग्रेशनला प्रोत्साहन द्यावे लागेल. चीनची मनुष्यबळ कमकुवत होत चालले आहे. त्यामुळे महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणारा चीन सर्व क्षेत्रांत प्रगती करू पाहणारा चीन आता थकतोय, दमतोय. जगात क्रमांक एक ठरण्याच्या या अट्टाहासात कुठेतरी स्वल्पविराम घेण्याची वेळ आता चीनवर आली आहे.

























































