
>> महेंद्र पाटील
मराठी चित्रपट तमाशापटातून बाहेर काढून विनोदी, मनोरंजक चित्रपट निर्मिती करण्यात ज्यांचे खूप मोठे योगदान आहे ते म्हणजे निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे. त्यांनी वेगवेगळय़ा विषयांवर चित्रपट निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे चमत्कार आणि या चमत्काराभोवती फिरणाऱ्या कथेतून होणारी विनोद निर्मिती. दुसरे वैशिष्टय़ म्हणजे पाच अक्षरी चित्रपटाचे शीर्षक. तिसरे वैशिष्टय़ असे की त्यांच्या चित्रपटातील खलनायकांची कुबडय़ा खवीस, टकलू हैवान, कवठय़ा महाकाळ, तात्या विंचू…अशी अर्तक्य नावे आणि एखादे तरी पॅरडी गाणे. त्यासोबत प्रत्येक चित्रपटात त्यांनी रंगवलेला प्रामाणिक पोलीस हे त्यांच्या चित्रपटांची खास वैशिष्टय़े आहेत.
महेश कोठारे यांनी ‘छोटा जवान’ या हिंदी चित्रपटापासून बालकलाकार म्हणून आपला चित्रप्रवास सुरू केला. नंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणून हिंदी ‘प्यार किये जा’ यावर बेतलेला ‘धूम धडाका’ बनवला. ‘धूम धडाका’ प्रचंड लोकप्रिय ठरला. नंतर त्यांनी 1987 साली ‘दे दणादण’ केला. ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांना एका अपघातानंतर प्रचंड शक्ती येते आणि त्याचबरोबर लाल रंग नजरेस पडला की ती शक्ती काम करत नाही. या सूत्रावरून पुढे खूप धमाल येते. या चित्रपटाच्या यशानंतर 1989 साली ‘थरथराट’ आला. यात चमत्कार नव्हता, पण खलनायक चमत्कारिक होता. टकलू हैवान हे पात्र इतके लोकप्रिय ठरले की त्यावेळी या नावाची खरोखर दहशत निर्माण झाली होती. पुढे ‘धडाकेबाज’ आला, ज्यात बाटलीतील गंगाराम हे जादुई पात्र व नायक दोन्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारले होते. दोन्ही भूमिका त्यांनी छान रंगवल्या होत्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ‘जिवलगा’ केला. यात ना चमत्कार होता ना चित्रपटाचे शीर्षक पाच अक्षरी होते. नेमका हा चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही.
1993 साली आलेला ‘झपाटलेला’ने खूप मोठा इतिहास घडवला. बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या नायकाला भेटवस्तूमधून आलेला एक बाहुला… खलनायकाचे मरण पावणे, त्याने मंत्र म्हणून आत्मा रूपाने बाहुल्यात जाणे आणि पुढे त्यातून एक उत्तम विनोदाचे टायमिंग असणारा भयपट निर्माण होणे… त्या काळात उत्तम तंत्र वापरून महेश कोठारे यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांनी धांगड धिंगा, चिमणी पाखरं, खतरनाक, माझा छकुला असे चित्रपट केले. त्यातला ‘माझा छकुला’ हा लोकप्रिय ठरला. मग काही वर्षांच्या गॅपने 2004 ला निर्माण झालेला ‘पछाडलेला’ खूप लोकप्रिय ठरला.
खबरदार, वेड लावी जिवा, दुभंग, शुभ मंगल सावधान, फूल थ्री धमाल… असे चित्रपट त्यांनी केले ज्यात खबरदार सोडून इतर कोणत्याही चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. ‘झपाटलेला 2’ हा मराठीतील पाहिला थ्रीडी चित्रपट होता, पण फारसा चालला नाही. आता लवकरच महेश कोठारे ‘झपाटलेला 3’ घेऊन येत आहेत. हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणेल आणि नक्कीच चमत्कारिक यश मिळवेल.



























































