कोरोनाने चांगले काय दिले?

559

>> निमिष वा.पाटगांवकर

कधी कधी वाईटातूनही काही चांगले उदयास येते. गेल्या तीन महिन्यांत कोरोनामुळे हिंदुस्थानी जनतेला चांगले काय दिले असेल तर कटाक्षाने पाळावी लागणारी स्वच्छता. स्वच्छ भारत अभियान, हागणदारी मुक्त गावे इत्यादी व्यापक प्रमाणावर राबवल्या जाणाऱया योजना यशाची झलक दाखवत होत्या. पण त्यांचा एकत्रित परिणाम जाणवत नव्हता. जे काम गेल्या सत्तर वर्षांत सरकारी पातळीवर किंवा सामाजिक संस्थांतर्फे लोकप्रबोधन करून पूर्णत्वास नेऊ शकलो नाही त्या स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवायचे काम या कोरोना नावाच्या इवल्याशा विषाणूने एका झटक्यात करून दाखवले.

कोरोनामुळे आज जगाची घडी विस्कटली आहे यात वाद नाही पण कधीकधी नवा डाव मांडायच्या आधी जुना डाव मोडावा लागतो. स्वच्छता, शिस्त आणि समानता या त्रिसूत्रीचा विचार केला तर आपल्या जुन्या सवयी, परिमाणे मोडीत काढून नवा डाव मांडायची संधी आपल्याला कोरोनाने दिली आहे. कोरोना काय आज उद्या जाईलच पण ज्या काही चांगल्या सवयी आपण शिकलो त्या कायम ठेवल्या तर हिंदुस्थानच्या आरोग्य आणि सामाजिक जीवनात कोरोनाने एक नवी क्रांती करून दाखवली असेच म्हणावे लागेल.

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 5 मे हा दिवस जागतिक हाताची स्वच्छता दिवस म्हणून पाळला जातो. मुख्यत्वेकरून परिचारिका आणि सुईणी यांनी हाताची स्वच्छता पाळणे किती गरजेचे आहे या संदेशाचा प्रसार करण्याचा या दिवसामागे मुख्य हेतू आहे. याचे कारण एकच की रुग्णालयात एकच परिचारिका जेव्हा अनेक रुग्ण हाताळते तेव्हा हाताची स्वच्छता राखली नाही तर संसर्ग पसरायला वेळ लागत नाही. किंबहुना रुग्णालयात तुम्ही मुख्य इलाज करायला जाता तेव्हा सेकंडरी इन्फेक्शन म्हणजेच दुसऱयाकडून येऊ शकणाऱया जंतुसंसर्गाची भीती ही कायम असते. कुठच्याही साध्या नार्ंसग होम ते पंचतारांकित रुग्णालयातही या धोक्याची टांगती तलवार कायम असते आणि हे तत्त्व हिंदुस्थानपुरतेच मर्यादित नाही तर जगातील अनेक प्रगत देशांत हा रुग्णालयातील जंतुसंसर्गाचा धोका असतो. रुग्णालयातल्या रुग्ण हाताळले जाणाऱया प्रत्येक विभागाच्या वॉश बेसिनच्यावर तुम्हाला कायम हात धुवायची योग्य पद्धत दाखवणारी चित्रे दिसतील. आज कोरोनामुळे ही चित्रे रुग्णालयापुरती मर्यादित न राहता घरोघरी पोहोचली आहेत. एरवी हात धुणे म्हणजे नुसते प्रोक्षण केल्यासारखे हात धुणारे आपण आता चित्रात दाखवल्यासारखे योग्य पद्धतीने हात धुवायला लागलो आहोत. हातावरचा संभाव्य कोरोना विषाणू जरी बाजूला काढला तरी आपल्या हातावर कित्येक सूक्ष्म जीवाण, विषाणू नांदत असतात तेव्हा योग्य हात कसे धुतले पाहिजेत हे आज सामान्य नागरिक कोरोनामुळे शिकला हे कोरोनाचे मोठे यश आहे.

कोरोनाने आपल्याला नुसते हात धुवायलाच शिकवले नाहीत तर जे मूलभूत संस्कार आपण विसरलो होतो त्यांचीही पुन्हा उजळणी करून अमलात आणायला भाग पडली. बाहेरची पादत्राणे शक्यतो बाहेरच ठेवणे, बाहेरून आल्यावर सर्वप्रथम हात पाय स्वच्छ धुणे, बाहेरचे कपडे धुवायला टाकणे यासारखे वैयक्तिक संस्कार तर सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, शिंकताना, खोकताना रुमाल वापरणे यासारखे सामाजिक स्वच्छतेचे संस्कार कोरोनाने निव्वळ संसर्ग आणि कदाचित मृत्यूच्या भीतीपोटी का होईना, पण आपल्या गळी उतरवले आहेत.

हिंदुस्थानी आणि परदेशी यांच्या स्वच्छतेची तुलना करायची झाली तर आपण वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत बऱयापैकी जागरूक असतो तर सामाजिक स्वच्छतेचा आपल्याकडे बोजवारा उडालेला असतो. त्या त्या देशांच्या हवामान, प्रदूषण, आचारण पद्धती आणि लोकसंख्या या घटकांवर हे अवलंबून असते. अमेरिकेत एखाद्या दिवशी आंघोळीला सुटी कदाचित चालू शकते, पण हिंदुस्थानात हे वैयक्तिक स्वच्छतेच्या विरोधात जाऊ शकते. त्याचप्रमाणे परदेशात जी सामाजिक स्वच्छता आपण बघतो त्याची प्रमुख कारणे तिथल्या लोकसंख्येच्या घनतेत आणि सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे या लोकात असलेल्या उपजत शिस्तीत आहे. यापैकी लोकसंख्येची घनता नियंत्रणात ठेवणे हा दूरगामी उपाय आहे, पण सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे हे आपण बऱयाचदा परदेशात असताना बरोबर जाणतो, पण स्वतःच्याच देशात आपल्या राष्ट्रीय ‘चलता है’ मनोवृत्तीने सोयिस्करपणे विसरतो. आज कोरोनाने आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे.

स्वच्छतेबरोबर कोरोनाने अजून एक महत्त्वाची शिकवण दिली ती म्हणजे शिस्तीची. परदेशातून परत आल्यावर मला नेहमी खटकते ते म्हणजे त्या परदेशात व्यवस्थित वागणारी आपली मंडळी इथे आल्यावर लगेच कशी बेशिस्त होतात त्याचे. इमिग्रेशनच्या रांगेत आपला नंबर लागण्यासाठी आपण धावपळ करतो, सीटनंबरप्रमाणे विमानात बार्ंडग करायची उद्घोषणा झाली तरी एकदा बार्ंडग चालू झाले की आपण मारुतीच्या शेपटीसारखी लांबच लांब होत जाणारी रांग करतो किंवा परदेशात एकूणच दुसऱया माणसापासून आपण अंतर राखून असतो अशी काही उदाहरणे परदेशातील आणि आपली शिस्त यांची तुलना करायला बोलकी आहेत. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे बऱयाच बाबतीत खूप सुधारणा झाली आहे. पण अजून आदर्श म्हणावे असे शिस्तीचे वातावरण गाठायला खूप लांबचा पल्ला आहे. स्वच्छता आणि शिस्त दोन्ही पाळायच्या आपल्या मर्यादा बऱयाचदा एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक स्थितीवर बेतलेल्या दिसतात. जरी आपल्याला एखादी सेवा, सुविधा मिळण्याची खात्री असली तरी लोकसंख्येच्या विस्फोटामुळे ही एक असुरक्षितता आपल्यात भिनली असते. ही असुरक्षितता आपल्याला वडापावच्या गाडीपासून विमानतळावरच्या लाऊंजपर्यंत सगळीकडे दिसते आणि मग चालू होते ते सामान्यतल्या सामान्य गोष्टीत सेवा सुविधा पुरवण्यात प्राधान्यता किंवा ज्याला इंग्रजीत ‘प्रेफरन्शियल ट्रीटमेंट’ हा जास्त संयुक्तिक शब्द आहे. कोरोनामुळे आता बऱयाच गोष्टीत हा भेदभाव गाळून पडला आहे आणि सर्वांना एकच नियमाच्या चाकोरीतून जावे लागत आहे. किराणा मालाच्या दुकानाबाहेरही पाच पाच फूट अंतर राखून उभी राहणारी समाजातील सर्व थरातील मंडळी आता कोरोना नंतरही हेच भान सगळीकडे ठेवतील अशी अपेक्षा आहे.

कोरोनाने अजून एक शिकवले जे खरे तर गांधीजींनी पूर्वीच आपल्याला शिकवले होते ते म्हणजे कुठचेही काम हलके नसते. आज विविध हुद्दय़ांवरचे उच्चपदस्थ लोक नाईलाजाने का होईना अशी अनेक कामे करताना दिसतात जी एरवी करायला एका इशाऱयावर अनेक नोकरचाकर उपलब्ध असतात. गांधीजींची अजून एक शिकवण म्हणजे गरजेपुरत्याच वस्तू जमा करणे अथवा वापरणे. काही महिन्यांपूर्वी उठसूट एखादा छंद असल्यासारखा आपण विविध गोष्टी ऑनलाइन ऑर्डर करत साठवण करायचो. मग त्याचा खरंच उपयोग असो वा नसो. आज आपल्याला कोरोनाने गरज म्हणजे नक्की काय हे शिकवले आहे.

कोरोनाने जरी या गोष्टी शिकवल्या असल्या तरी हिंदुस्थानी जनतेला त्या सरसकट अमलात आणण्यात अडचणी आहेत. मुख्य म्हणजे सवयीचा परिणाम आणि वस्तू, सेवांची उपलब्धता यावर हे अवलंबून आहे. तेव्हा कोरोनाने जरी शिकवण दिली तरी हेच दृश्य कायमचे राहील का हे आताच सांगणे कठीण आहे. तसेच या गोष्टी कायमस्वरूपी पाळायला विशेषतः यात स्वच्छतेची जी बाजू आहे ती पाळण्यात भौगोलिक आणि आर्थिक कारणे अडचणी ठरू शकतात. आज आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाडय़ासारख्या दुष्काळी प्रदेशात उन्हाळ्याची चाहूल लागताच तिथे प्यायच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असते तर वारंवार हात धुवायला पाणी कुठून उपलब्ध असणार? तसेच शास्त्र्ाशुद्ध पद्धतीने हात धुवायला साबणाची गरज आहे. शहरी मंडळी आज जो लिक्विड हँडवॉश वापरतात तो महाग असला तरी शहरी भागातली मंडळी सर्रास वापरू शकतात, पण ग्रामीण भागातील जनता एक साध्या साबणाची वडीही जपून वापरत असते. हात साफ करण्यासाठी दुसरा पर्याय आहे तो सॅनिटायझरचा पण त्याने हाताबरोबरच खिसाही साफ होतो तेव्हा त्याच्या वापरावरही पुन्हा मर्यादा आहेत. आजच्या घडीला मद्यविक्रीवर आताआतापर्यंत असलेल्या बंदीमुळे आणि सॅनिटायझरचे उत्पादन गरजेचे असल्याने सरकारने 45 साखर कारखाने आणि मद्यनिर्मिती कंपन्यांना आपल्या साठय़ातील अल्कोहोलचा वापर करून सॅनिटायझरची निर्मिती करायला परवानगी दिली आहे. परिणामी आज बाजारात अनेक न ऐकलेल्या कंपन्यांच्या सॅनिटायझर्सचे पेव फुटले आहे पण त्यामुळे त्यांच्या किमतीत काही उतरण आली नाही तर किंबहुना आजच्या बाजारपेठेमुळे किमती वाढल्याच आहेत. तेव्हा सॅनिटायझर हा उपायही हात साफ ठेवण्याच्या दृष्टीने सर्वसामान्यांसाठी सोयीचा नाही.

आपली प्रतिक्रिया द्या