लोकविधा – लोकरहाटीतले पाऊसविधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. मुकुंद कुळे

लोकपरंपरेने चालत आलेले पाऊसदेवाच्या आळवणीचे अनेक प्रकार आजही ग्रामीण भागात तग धरून आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारतात पूर्वापार असे विधी चालत आलेले आहेत. या विधींमुळेच पाऊस पडतो हा भ्रम आहे, पण मनुष्याने आदिम अवस्थेत असताना निसर्गाशी ऐक्य, साम्य शोधण्याच्या प्रयत्नांतून सुरू केलेले हे विधी आहेत. एक प्रकारे ते प्रतीकात्मक विधी आहेत. या विधीमागील विज्ञानाचा शोध घ्यायला कुणीही जात नाही. तिथे फक्त लोकभावनाच श्रेष्ठ ठरते. ही लोकभावना आदिम असते.

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रीडापरिणतगज प्रेक्षणीयं ददर्श…

म्हणजे आषाढाच्या पहिल्या दिवशी त्या यक्षाला तो मेघ दिसला, जो एखाद्या हत्तीप्रमाणे पर्वताच्या शिखराला ढुशा देत होता…
आषाढ म्हटला की, भारतीय मनाला कालिदासाचं ‘मेघदूत’ हे असं हटकून आठवतं. त्या मेघदूताचं गारुड अजून कमी झालेलं नाही, होणारही नाही. कारण चेतनगुणोक्ती अलंकाराचं (अचेतनावर सचेतनाचा आरोप करण्याचं) एवढं सुंदर उदाहरण भारतीय साहित्यात दुसरं नाही. म्हणूनच आषाढ म्हटला की, मेघदूत आठवतं आणि मेघदूताचा उल्लेख निघाला की, आषाढसरी बरसायला सुरुवात होते.

…अन् तरीही आषाढ लागला की, थोडंसं भानावरही यावं लागतं. कारण कालिदासाला आषाढाच्या पहिल्याच दिवशी पाऊस भेटला, तसा इथल्या शेतकरी राजाला भेटेलच असं नाही…अन् कधीकधी तर पहिल्याच दिवशी नाही, आषाढ सरत आला तरी भेटत नाही. शेतकरी राजाच नव्हे, तर शहरांतील लोकही आकाशाकडे पाहत बसतात. वरून जाणारे कोरडे ढग दिसले की, चुकचुकतात. शेतकऱयाला शेतीच्या पाण्याची चिंता, तर शहरी माणसाला रोजच्या वापरासाठीच्या पाण्याची.

तरीही आषाढ लागूनही पावसाने ओढ दिली की, धास्तावतो तो भारतीय शेतकरीच. कारण त्याचा गावगाडाच पावसावर आणि शेतीवर अवलंबून असतो. आज शहरातला माणूस नेट-इंटरनेटसारख्या सोयीसुविधांत गुरफटून गेला असेल कदाचित, पण भूक लागली की, त्याला अन्नच खावं लागतं. अन्नाविना जगण्याचं तंत्र अजून तरी विकसित व्हायचंय. निदान तोपर्यंत तरी भारतातल्या शेतकऱयाने आपल्या खळ्यात पिकवलेल्या धनधान्यावरच त्याला अवलंबून राहावं लागणार आहे आणि भारतातली ऐंशी टक्के जनता अजूनही ग्रामीण भागातच आहे. साहजिकच पावसाची ओढ त्याला दुखावते, चिंताग्रस्त करते. म्हणूनच आषाढाला सुरुवात झाल्यापासूनच तो पाऊसदेवाला आळवायला सुरुवात करतो. जमीन सारवतो, जमिनीवर सुरेखशी रांगोळी रेखतो आणि एका भांडय़ात पाणी घेऊन ते सारवलेल्या-सजवलेल्या भूमीवर ठेवून त्या पाण्याची पूजा करतो. भांडय़ातलं हे पाणी त्याच्यासाठी आकाशातलं सर्जनशील पाणीच असतं. ते पावसाच्या रूपाने धरतीवर महामूर बरसावं म्हणूनच त्याची ही पूजा चाललेली असते. कधीतरी वरुणदेव त्याची ही पूजा मान्य करतो आणि एखाद्या साळसूद मुलासारखा धरतीवर बरसतो, पण कधी कधी तो लहरी, हट्टी मुलासारखाही वागतो. अडून बसतो आणि बरसतच नाही. मग मात्र त्याची वेगवेगळ्या पद्धतीने आळवणी करण्याशिवाय शेतकरी राजाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो.

नुकताच पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. पावसाला थोडा जरी विलंब झाला की, शहरी भागांत मंदिरांतून यज्ञयाग करण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. त्यासाठी यज्ञातील समिधांवर किलोकिलोने तूप ओतलं जातं. उच्चरवात मंत्रघोष केले जातात. यात पैशांची किती नासाडी होते, ते कुणीच सांगत नाही. म्हणूनच मग शहरांतून होणाऱया या वैदिक विधी-विधानांपेक्षा गावाकडे होणारे पाऊसविधी बरे वाटतात. त्यात खर्च काहीच नसतो. फक्त निसर्गाला केलेलं आवाहन असतं. लोकपरंपरेने चालत आलेले पाऊसदेवाच्या आळवणीचे असे अनेक प्रकार आजही ग्रामीण भागात तग धरून आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारतात पूर्वापार असे विधी चालत आलेले आहेत. या विधींमुळेच पाऊस पडतो हा भ्रम आहे, पण मनुष्याने आदिम अवस्थेत असताना निसर्गाशी ऐक्य, साम्य शोधण्याच्या प्रयत्नांतून सुरू केलेले हे विधी आहेत. एक प्रकारे ते प्रतीकात्मक विधी आहेत. या विधीमागील विज्ञानाचा शोध घ्यायला कुणीही जात नाही. तिथे फक्त लोकभावनाच श्रेष्ठ ठरते.

रोहिणी गेलं, मृग नक्षत्रही कोरडंच गेलं की, महाराष्ट्रातल्या खेडय़ाखेडय़ांत धोंडी-भुंडी या अज्ञात लोकदेवतांच्या नावाने गाऱहाणं गायला सुरुवात होते. गावागावांतली मुलं एकत्र येतात आणि ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत गावभर हुंदडतात. याला धोंडी काढणं असंही म्हणतात. मुलांची एक मिरवणूकच निघते. मिरवणुकीतील दोन मुलं निर्वस्त्र असतात. त्यांनी आपल्या अंगाभोवती फक्त कडुलिंबाच्या पाल्याच्या डहाळ्या गुंडाळलेल्या असतात. या दोघांच्या खांद्यावर एक आडवी काठी देऊन त्या काठीला मध्यभागी एक बेडूक उलटा लटकवलेला असतो. या उलटय़ा लटकवलेल्या बेडकाला गावभर फिरवलं जातं. मिरवणुकीची सुरुवात गावच्या मंदिरातून होते. त्यावेळी छोटी मुलं आणि जाणती माणसंही उपस्थित असतात. मंदिरातून निघाल्यावर…

धोंडी धोंडी पाणी दे, धोंडीच्या दिवसात
पाणी भारी येऊ दे, पीक मोठं होऊ दे

असं म्हणत ही बालसेना गावातील प्रत्येकाच्या घरी जाते आणि धोंडी दारात आल्यावर घराघरांतील महिला रिवाजानुसार प्रथम धोंडीच्या काठीवर आणि बेडकावर लोटाभर पाणी ओततात. नंतर हळद-कुंकू वाहून बेडकाची पूजा करतात. यावेळी प्रत्येक घरातून आपापल्या ऐपतीनुसार गहू, ज्वारी किंवा इतर धान्याचा शिधा मुलांना दिला जातो. असं गावातील प्रत्येक घर घेऊन झालं की, ही मिरवणूक पुन्हा देवळात येते. तिथे मिरवणूक काढलेल्या बेडकाला मुक्त केलं जातं. नंतर मिरवणुकीत मिळालेला शिधा एकत्र केला जातो आणि कुणाच्या तरी घरून जाडसर दळून आणून तिखट-मिठाची फोडणी देऊन तो गावच्या मंदिरातच शिजवला जातो. या शिजवलेल्या प्रसादाला गावकरी कण्या म्हणतात. या कण्यांचाच नैवेद्य गावदेवाला दाखवून नंतर तो प्रसाद म्हणून साऱया गावाला वाटला जातो. हा प्रसाद खाताना आता मोठा पाऊस येईल असंच प्रत्येकाला मनोमनी वाटत असतं. कारण उलटय़ा टांगलेल्या बेडकाचं तरी ‘डराव डराव’ वरुणदेवापर्यंत पोहोचलं असेल, असा लोकमानसाचा समज असतो.

विदर्भात धोंडीच्या नावाने पावसासाठी गाऱहाणं घालायची पद्धत आहे, तर कोकणात हेच गाऱहाणं भुंडीच्या नावानं घातलं जातं…
भुंडे भुंडे पाऊस दे, भुंडी गेली डोंगरात
पाऊस पडला आगरात…
भुंडे भुंडे पाऊस दे, भुंडी गेली आगरात
पाऊस पडला डोंगरात…
अशा पद्धतीने भुंडीच्या नावाने हाका मारत मुलं संपूर्ण गावाचं रान-शिवार, घर-दार फिरतात आणि तिच्याकडे पाण्यासाठी गाऱहाणं घालतात.

धोंडी आणि भुंडीच्या नावाने निघणाऱया या मिरवणुका महाराष्ट्रात कदाचित आणखीही वेगवेगळ्या नावाने निघत असतील. कारण धोंडी काय किंवा भुंडी काय, यांचं लोकरहाटीत तसं अस्तित्वच नसतं. त्यांच्या नावाचा दगड किंवा मूर्तीही नसते. लोकरहाटीतलाच एखादा रूढ, पण वैचित्र्यपूर्ण स्त्री वाचक शब्द घ्यायचा आणि तिलाच पाऊसदेवता कल्पून तिच्या नावाने पावसाचं गाऱहाणं गायचं असंच पूर्वापार चालत आलंय.

पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रभर केल्या जाणाऱया या विधींत खूपच वैविध्यही आहे. कारण प्रत्येक समाजाने आपापल्या समजुतींप्रमाणे निवडलेले हे मार्ग आहेत. म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात गाढवाचं लग्न लावलं जातं, विदर्भात बेडकाची मिरवणूक काढली जाते, तर खानदेशात अनेक ठिकाणी पाऊसविधी म्हणून जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढली जाते. तसंच नगर जिह्यातल्या गावपरिसरात बेडकांची मिरवणूक किंवा गाढवाच्या लग्नाबरोबरच अंधाऱया रात्री काही महिला पावसाचं गाऱहाणं गात गावभर फिरतात. त्यांचं हे गाऱहाणं म्हणजे पावसाची खरोखर केलेली पारच असते. कारण त्या आपल्या गाण्यातून पावसावर राग काढत म्हणतात…

पाऊसराजानं कुणीकडे केलं काळं
वैतागली नार टाकून गेली तान्हं बाळ
ही पारीची गाणी म्हणायचीही त्यांची अशी खास पद्धत आहे. या महिलांचं म्होरकेपण करणारी महिला सगळ्यांच्या पुढे असते. तिच्या हातात घुंगरू बांधलेलं मुसळ असतं. हे मुसळ ती प्रत्येक घराच्या दारात वाजवते आणि त्याच्या ताला-सुरावरच पावसाची गाऱहाण्याची गाणी गायली जातात. हे गाऱहाणं गाताना मुसळच वापरलं जातं. कारण मुसळासारखा मुसळधार पाऊस पडावा, अशी त्यांची इच्छा असते.

या साऱ्या विधींमध्ये एक समान आदिम तत्त्व दिसतं ते म्हणजे सारख्यातून सारखं (होमोजिनियस मॅजिक) निघतं ही आदिम भावना. या भावनेतूनच आपल्या जी गोष्ट हवी आहे किंवा साध्य करायची आहे, त्यासारखाच एक विधी कल्पनेने करायचा. हे विधी म्हणजे सरळ सरळ प्रतीकात्मक विधीच असतात.

आषाढ लागला की, असं काय काय आठवायला लागतं. आधी ‘मेघदूत’ काव्य आठवतं. आषाढसरी चांगल्या कोसळल्या तर ‘मेघदूता’ची रंगत वाढत जाते. कारण तोवर निसर्गाने कात टाकलेली असते. संपूर्ण आषाढच सृष्टीत उतरलेला असतो. हिरवं रान, हिरवं मन आणि सुरेख हिरवी हुरहुर…पण आषाढसरी कोसळल्या नाहीत तर मन भयभीत होतं. त्याला अरिष्टाची चाहूल लागते. एकवेळ आषाढ चांगला गेला तरी तो काहीसा निश्चिंत होतो. कारण पेरण्या झालेल्या असतात. पीकपाणी मार्गी लागलेलं असतं, पण जिथे रुजणंच आषाढाच्या भरवशावर असतं, तिथे आषाढसरी कोसळल्या नाहीत, तर सारं गणितच चुकून जातं. मग नांगरट, पेरण्या, लावण्या… असं परंपरेने चालत आलेलं शेतीचं सगळंच वेळापत्रक बिघडून जातं.

याही परिस्थितीत आषाढाची चाहूल लागली की, सर्वप्रथम पंढरपूरच्या वाटेवर वारकऱयांची पावलं उमटू लागतात. भक्तांचे जथेच्या जथे विठोबाच्या दर्शनासाठी धावू लागतात. जणू विठोबा त्यांना पहिल्यांदाच भेटणार असतो, पण विठोबा पहिल्यांदा भेटो किंवा वर्षानुवर्षे, त्याची गोडी, त्याची ओढ थोडीच कमी होते… ती कायमच असते.

आषाढाचंही तसंच तर आहे. तो दरवर्षीच येतो, बिलोरी ऐन्याचं स्वप्न दाखवत पावसाचं आवतन घेऊन…
– [email protected]