पाणथळ जागांचे संवर्धन म्हणजे पक्ष्यांचे संवर्धन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. जयंत वडतकर

जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न आणि पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अधिवास असलेल्या पाणथळ जागांना आज अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. पाणथळी या विकसित परिसंस्था असतात. तिथे अन्नसाखळी निर्माण झाल्याने संपन्न जैवविविधता दिसून येते. अशाच ठिकाणी विदेशातून येणारे पक्षी दिसतात. मात्र या पाणथळीच्या संवर्धनाबाबत कुठेही फारशी चर्चा होताना दिसत नाही.

पूर्वी गावाजवळ एक सुंदरसे तळे किंवा तलाव असे. गावाची तहान भागवण्यासाठी त्या तळ्याचा उपयोग होत असे. हळूहळू ते गाव फुगत जाऊन शहर बनले. तळे शहराची तहान भागविण्यासाठी अपुरे पडू लागले. त्या तळ्यावर वर्षभर जंगलातील प्राणी, विविध प्रजातींचे पक्षी असायचे, हिवाळ्यात मोठ्या संख्येत स्थलांतरित पक्षी यायचे. हळूहळू गावातील मूर्तींचे विसर्जन, गाईम्हशी धुणे, कचरा आणून टाकणे यामुळे तळे प्रदूषित होऊ लागले. तलाव प्रदूषणमुक्त करून नैसर्गिकरीत्या सुंदर केला जाईल असे काही निसर्गप्रेमी नागरिकांना वाटले, परंतु त्या ठिकाणी सिमेंटचे घाट बांधून चौपाटी उभारली गेली. तलावाचा गळा घोटला गेला अन् तेथील एकूणच जैवविविधता संपुष्टात आली.

तलावांची अशी परिस्थिती आपल्याला आपल्या ओळखीच्या अनेक गावांत दिसेल. जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने तलावांच्या संवर्धनाबाबत या परिस्थितीचा आढावा घेताना असे लक्षात येते की, पाणी हे जीवन असले तरी तलावांचे, पाणवठय़ाचे महत्त्व अजूनही आपण लक्षात घेतलेले नसावे. सर्वप्रथम आदिम काळात मानवाने वस्ती केली ती नदी किंवा पाणवठ्याच्या काठाने. त्या पाणथळ ठिकाणी मग पुढील शेकडो वर्षांत एक परिसंस्था निर्माण होऊन या पाणथळी जैवविविधता संपन्न अधिवास झालेत. अशा ठिकाणी मग विदेशातून स्थलांतर करून येणारे शेकडो प्रजातींचे पक्षी हजारोंच्या संख्येत येऊ लागले. हिवाळ्यादरम्यान विदेशातून हिंदुस्थानात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या शेकड्यात आहे. जगातील उत्तरेकडील व युरोप, उझ्बेकिस्तान, कझाकीस्तान, रशिया, सैबेरिया, मंगोलिया, चीन अशा विविध देशांतून जवळपास दीडशे प्रजातींचे लाखो पक्षी संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेल्या नद्या, तळे, तलाव, धरणे आणि समुद्रकिनारा अशा विविध प्रकारच्या पाणथळीवर येत असतात.

आजवर या पाणथळीच्या संवर्धनाबाबत कुठेही फारशी चर्चा होताना दिसत नव्हती. मात्र अनेक पाणथळ जागा जेव्हा अतिक्रमणाने गिळंकृत केल्या, प्रदूषणाने जेव्हा अनेक तलाव नासवून टाकले, तेव्हा 2010 साली केंद्र सरकारने पाणथळ जागा व्यवस्थापनाबाबत सर्वप्रथम स्वतंत्र नियमावली तयार केली आणि त्यानंतर स्पेस ऑप्लिकेशन सेंटर, इस्रो, अहमदाबाद या संस्थेने उपग्रहीय सर्वेक्षण करून देशभरातील पाणथळ जमिनींची यादी तयार केली. या संपूर्ण यादीचा ‘वेट लॅण्ड अॅटलस’ 2011 साली प्रकाशित करण्यात आला. यामध्ये पाणथळ म्हणजेच जमिनीवर पाणी असणाऱ्या जागा जसे नदी, तळी, खाडी, धरण किंवा जलाशय, लहानमोठे तलाव, खार जमीन अशा अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता. या रामसर जागांमध्ये हिंदुस्थानातील सुमारे सात लाख 57 हजार 60 इतक्या पाणथळ जागांचा समावेश असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 44 हजार ठिकाणांचा समावेश आहे. ही यादी तयार झाल्यानंतर या पाणथळ जागांना कायदेशीर संवर्धन मिळणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता पूर्वीच्या नियमावलीमध्ये बदल करून त्यातून अनेक ठिकाणांना वगळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार अडीच हेक्टरपेक्षा मोठ्या पाणथळ जागांनाच पाणथळ या व्याख्येत बसविले गेल्याने आकाराने लहान असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण परिसंस्था असलेले तलाव, तळी या यादीतून गाळल्या गेल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील पाणथळ जागांची यादी 44 हजारांहून 17 हजारपर्यंत खाली आली. मात्र या ठिकाणांनासुद्धा अजूनही कायदेशीर संरक्षण प्राप्त न झाल्यामुळे या जागासुद्धा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या आहेत.

इराणमधील रामसर शहरात 1971 साली भरलेल्या ‘कन्व्हेन्शन ऑन वेट लॅण्ड्स’ या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. या करारात सहभागी प्रत्येक राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे आणि अशा स्थळांचे त्या देशाने योग्य प्रकारे संवर्धन करावे तसेच तेथील जैवविविधतेचा पर्यावरणपूरक वापर करावा असे अपेक्षित आहे. हा करार आपल्या देशाने 1982 स्वीकारल्यानंतर हिंदुस्थानात रामसर ठिकाण जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज हिंदुस्थानात एकूण 47 ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यापैकी सर्वात जास्त उत्तर प्रदेशात 9 ठिकाणे आणि त्यानंतर पंजाब राज्यात 6 ठिकाणे रामसर म्हणून घोषित झाली आहेत. महाराष्ट्रात आजवर दोन पाणथळ ठिकाणांना रामसर दर्जा प्राप्त झाला आहे.

रामसर घोषित करण्यासाठी वेगवेगळे 9 निकष असून त्यामध्ये दुर्मिळ उदाहरण असलेले ठिकाण, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, माशांच्या प्रजातींचा आढळ व त्यांची संख्या, जीवनचक्रात व जैवविविधता संवर्धनात पाणथळीचे महत्त्व तसेच पक्षी संख्या व दुर्मिळ पक्षी यांचा आढळ असे हे विविध निकष आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला पहिले रामसर स्थळ मिळाले ते नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या रूपाने जून 2019 मध्ये. त्यानंतर अलीकडे नोव्हेंबर 2020 ला लोणार या हिंदुस्थानातील एकमेव अशा उल्कापातातून निर्माण झालेल्या सरोवरास रामसर दर्जा प्राप्त झाला. महाराष्ट्रातील आणखी अनेक ठिकाणे या निकषात बसण्यायोग्य असून त्यामध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. संभाजीनगर, वेंगुर्ला रॉक्स (बर्न्ट आयलंड), माहूल शिवडीची खाडी (मुंबई), ठाणे खाडी (मुंबई), उजनीचे धरण (जि. पुणे-सोलापूर), हतनूर धरण (जि. जळगाव), नवेगावबांध (जि. गोंदिया) या स्थळांचा समावेश होतो. विशेष म्हणजे यातील सर्वच ठिकाणं ही पक्षी संपन्नतेच्या निकषात बसणारी असल्यामुळे या ठिकाणी पक्षी आणि पाणथळ यांचा परस्परसंबंध अधोरेखित होतो. त्यामुळे पक्षी संवर्धनात पाणथळ संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट होते. आज राज्यात या निकषात बसणाऱया अजूनही अनेक पाणथळी आहेत, ज्यावर मोठय़ा संख्येत पक्षी प्रजाती अवलंबून आहेत. अशा पाणथळांवर पक्षिमित्रांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून पक्षी नोंदणी व पक्षी मोजणी केल्यास भविष्यात अशा आणखी काही ठिकाणांना रामसर दर्जा मिळण्यासाठी प्रस्तावित केले जाऊ शकते.

जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न आणि पक्ष्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अधिवास असलेल्या पाणथळ जागांना आज अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. तलाव किंवा धरणे म्हटले की, मासेमारी ही ओघाने आलीच. मात्र अलीकडे अशा जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासे उत्पादन घेण्यासाठी ठरावीक प्रजातींच्या माशांचे बीज सोडून मासे उत्पादन घेतले जात असल्याने त्या ठिकाणचे स्थानिक प्रजातींचे लहान लहान माशांच्या प्रजाती संपुष्टात येत आहेत. याशिवाय मासेमारीदरम्यान पक्ष्यांच्या केल्या जाणाऱया शिकारी, जमिनीवर अंडे घालणाऱया पक्ष्यांचे अंडे व घरटे नष्ट केले जाणारे प्रकार हे नित्याचे झाले आहेत. तलावाभोवतालच्या सुपीक गाळाच्या जमिनीवर अनेक ठिकाणी गाळपेरा केला जातो. शेतीसाठी जेव्हा तलावाचे पाणी सोडले जाते, त्यामुळे उघडी पडणारी जमीन व काही बेटं ही जमिनीवर घरटे करणाऱ्या पक्ष्यांसाठी हक्काची जागा असते. मात्र थेट पाण्याच्या काठापर्यंत जमीन नांगरून त्या ठिकाणी पीक किंवा जनावरांसाठी चारा लावला जात असल्याने अशा ठिकाणची घरटी उद्ध्वस्त होत असतात. तलावातील बेटांवर व पाण्याच्या काठाने होणाऱ्या पक्ष्यांच्या वीण वसाहतीला गुरे चराई, शेती केल्याने तुडवले जाणारे घरटे, जमिनीवरील अंडी चोरून नेणे, भटक्या कुत्र्यांव्दारे अंडी खाणे, बेटांवर मासेमारांच्या तात्पुरत्या वस्तीमुळे नष्ट होणारी जमिनीवरील घरटी अशा या अनेक समस्या आहेत. याशिवाय शहराचे सांडपाणी, कचरा, प्लॅस्टिक प्रदूषण, कीटकनाशक, रासायनिक खतांमुळे तलावाच्या पाण्यावर होणारा परिणाम, अनियंत्रितपणे वाढणारी जलपर्णी व बेशरमसारख्या वनस्पती या समस्यासुद्धा अनेक ठिकाणी दिसून येतात. अलीकडे काही ठिकाणी जल पर्यटनाच्या नावाखाली सुरू झालेले बोटिंग, पर्यटनामुळे वाढणाऱ्या गर्दीने होणारा गोंगाट व कचरा यामुळेसुद्धा तलावावरील पक्ष्यांच्या दैनंदिन हालचालींवर नियंत्रण येत आहे. काही ठिकाणी पक्षी छायाचित्रणामुळेसुद्धा पक्ष्यांच्या हालचालींवर नियंत्रण येत असल्याचे दिसून येत आहे.

पाणथळी या विकसित परिसंस्था आहेत. या ठिकाणी संपन्न अशी अन्नसाखळी निर्माण झालेली असल्यामुळे येथील जैवविविधता संपन्न अशी असते. पाणथळी आज मानवाच्या पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीसाठी पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे साठे आहेत. आज अनेक दुष्काळी भागात तलाव आणि धरणांच्या पाण्यामुळे शेतीमध्ये आमूलाग्र क्रांती घडून आल्याचे दिसून येत आहे. लहानमोठे सर्वच जलसाठे दिवसेंदिवस खालावत जाणारी भूजल पातळी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. हिमालयातील हिमनद्यांप्रमाणेच पाणथळीसुद्धा गोड पाण्याचा महत्त्वाचा व प्रचंड असा साठा आहेत. यामध्ये जर काही कारणामुळे एखादा जैविक घटक नष्ट झाला तर अन्नसाखळीमध्ये अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे तेथील जैवविविधता धोक्यात येते. त्यामुळे पाणथळी वाचविण्यासाठी सामान्य नागरिक, राजकीय नेतृत्व, शासन यंत्रणा, पक्षी अभ्यासक, शास्त्रज्ञ व या क्षेत्रात कार्यरत संस्था व शासनाचे विभाग अशा सर्वच स्तरांवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

(लेखक महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष आहेत.)
[email protected]