अन्नदाता!

327

>> शैलेश माळोदे

डॉ. गुरुदेवसिंग खुश. भात आपल्या देशाचे प्रमुख अन्न. इतर देशांतील तांदूळ आणि आपला तांदूळ या संकरातून या कृषीतज्ञाने ‘आय आर 36’ हा तांदूळ जन्माला घातला.

‘भाताची आयआर 8 ही जात शेतीमध्ये रस असणाऱया सगळय़ांना ठाउैक असेल. भात हे जगातील बहुतांश लोकांचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे याबाबत कोणतेही संशोधन महत्त्वाचे ठरणारे होतेच. मी ते करू शकलो याचा मला आनंद आहे. पुसा (दिल्ली)मध्ये हिंदुस्थानी कृषी संशोधन परिषदेतील एका व्याख्यानात बोलताना गुरुदेवसिंग खुश यांनी काढलेले हे उद्गार सर्वच शास्त्र्ाज्ञांना आणि माझ्यासारख्या विज्ञान पत्रकाराला भावून गेले. त्यानंतर त्यांच्याशी भेटण्याची संधी अचूकपणे साधत मी त्यांच्याशी काही काळ गप्पा मारू शकलो ही माझ्यासाठी कोणत्याही पर्वणीपेक्षा कमी महत्त्वाची बाब नव्हती. या गोष्टीला दहा-बारा वर्षांचा काळ उलटून गेलेला असला तरी अद्यापही त्यामधील कंटेण्ट माझ्या स्मृतीत अगदी ताजा म्हणजे ‘फ्रेश’ आहे.
डॉ. गुरुदेव खुश यांनी आय आट बरोबर सहा राष्ट्रांमधील मूळ 13 प्रकारांबरोबर संकर घडवून ‘आयआर 36’ ही अर्ध-बटू (सेमी उवॉर्फ) प्रजाती विकसित केली. ही प्रजाती अनेक प्रकारच्या कीटकांबाबत आणि रोगांबाबत रोधक असल्यामुळे शेतकऱयांचे उत्पन्न वाढलेच, पण त्याचबरोबर आशियाई कुटुंबाचा या प्रमुख अन्नावरील खर्चदेखील कमी झाला. ‘आयआर 36’ ही प्रजाती केवळ 105 दिवसांत तयार होते तर आय आर 8 वाणाला 130 दिवस आणि इतर पारंपरिक वाणांना 150 ते 170 दिवस लागतात. शिवाय या आयआर 36चा तांदूळ दाणा बारीक असतो. त्याला बहुतांश देशात खूप मागणी असते. त्यामुळे या वाणाचा जगभरात चांगलाच प्रसार झाला. 1981 साली 110,000 चौ.कि.मी. क्षेत्रात हे वाण लावण्यात आले होते. नंतर आयआर 64 आणि आयआर 72 या प्रजाती डॉ. खुश यांनी 1990 मध्ये विकसित केल्या. हरित क्रांतीमधील विविध वाणांनी जशी पारंपरिक वाणांची जागा घेतली तसेच या भात प्रजातीने केले.

22 ऑगस्ट 1935 रोजी जन्मलेल्या डॉ. जी. एस. खुश यांचे मूळ गाव पंजाबमधील रुडकी हे जालंधर जिह्यातील असून त्यांना 1996 साली हेन्री बिचेल या त्यांच्या ‘मेंटर’बरोबर जागतिक अन्न पारितोषिक (वर्ल्ड फुड प्राइज) देण्यात आले. जगातील लोकसंख्येत भरमसाट वाढ होण्याच्या काळात त्यांनी जागतिक पातळीवर भाताचा पुरवठा वाढविण्यासाठी तसेच त्याच्या गुणवत्तेत सुधारणा केली त्याकरिता हे पारितोषिक त्यांना देण्यात आले.

पंजाब कृषी विद्यापीठातून 1955 साली कृषी विषयात बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ डेव्हिसमधून त्यांनी पीएचडी मिळविली. ती 1960 साली. त्यानंतर त्याच विद्यापीठात त्यांनी सात वर्षे अध्यापनाचे काम केले. त्याचवेळी त्यांचे टोमॅटोच्या जिनोमविषयी त्यांचे संशोधन सुरू होते. त्यानंतर त्यांनी मनिला (फिलिपाइन्स)मध्य असलेल्या आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत प्लांट ब्रीडर म्हणून कामाला सुरुवात केली. 1972 साली त्यांची नियुक्ती संस्थेच्या प्लांट ब्रिडिंग विभागाच्या प्रमुखपदी झाली. तिथे त्यांनी जेनेटिक संशोधन आणि ब्रिडिंग क्षेत्रात संशोधन करण्यात दोन दशकांहून अधिक काळ व्यतीत केला. ते म्हणतात, ‘विकसनशील जगातील वाढत्या लोकसंख्येचे पोट भरण्यासाठी सुधारित वाण विकसित करणे आणि कृषी अर्थव्यवस्थेला सुधारण्यास मदत करणे ही दोनच उद्दिष्टे मी ठेवली होती. त्यावेळी सेमी उवॉर्फ आर आर 36 सह जवळपास 300 प्रकारच्या प्रजाती विकसित करण्यात माझे योगदान देण्याचा मी प्रयत्न केला. 1996 साली असलेले जागतिक भात उत्पादन 2011 साली 257 दशलक्ष टनांवरून 718 दशलक्ष टनांवर पोहोचले. यात खुश आणि त्यांच्या सहकाऱयांची खूपच महत्त्वाची भूमिका आहे.

एप्रिल 2002 मध्ये डॉ. जी. एस. खुश आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेतून (आयआरआरआय) प्रमुख प्लांट ब्रीडर आणि प्लांट ब्रीडिंग जेनेटिक्स आणि बायोकेमेस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ (डेव्हिस)मध्ये ऍडजंक्ट प्रोफेसर म्हणून परतले. जागतिक अन्न पारितोषिकाशिवाय त्यांना 1977 साली वीरलॉग पुरस्कार, 2004 साली पद्मश्री, 1995 साली रॉयल सोसायटी लंडनची फेलोशिप (एफआयएस) आणि 1991 मध्ये नॅशनल अकॅडमी ऑफ ऑग्रिकल्चरल सायन्सेसचे फॉरेन फेलो असे अनेक सन्मान प्राप्त झाले. बहुतांश भात उत्पादक देश तांदूळ उत्पादनात स्वयंपूर्ण बनले आणि उलट अधिक उत्पादन निर्यात करणारे बनले. कारण डॉ. खुश यांचे संशोधन त्यांनी भाताच्या अनुवंशिकी क्षेत्राच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले.

प्रा. डॉ. जी. एस. खुश यांनी पंजाब कृषी विद्यापीठात कृषी संशोधन आणि क्षमता विकास करण्यासाठी डॉ. जी. एस. फाऊंडेशनची स्थापना केली असून त्याद्वारे दरवर्षी विशेष व्याख्याने, शिष्यवृत्त्या आणि परदेशी उच्च शिक्षणासाठी मदत करण्यात येते. अशा डॉ. गुरुदेव खुश यांचा सत्कार कॅलिफोर्निया विद्यापीठाने 2018 साली प्रतिष्ठत यूएस डेव्हिस मेडल देऊन केला. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिलेले या फाऊंडेशनमधील व्याख्यान यूटय़ूबवर ऐकायला मिळते. देशाचेच नव्हे, तर समस्त भात खाणाऱया देशाचे सुपुत्र डॉ. जी. एस. खुश यांनी 84 वर्षांचा पल्ला ओलांडला असला तरी उत्साह तसाच टिकवलाय. हाच तरुणांसाठी धडा आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या