भटकंती- जगाच्या कल्याणा…

 

>>वर्षा चोपडे

 

अश्वघोष लिहितात, भगवान बुद्धसमान कुणीही नाही, जो परम सुखाचा दाता आहे, जो सृष्टिकर्त्या ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे, जो अंधार दूर करतो, सूर्याचा पराभव करतो आणि सर्व जळत्या उष्णतेला दूर करतो, त्याला नमस्कार करतो.

23 मे 2024 ला सिद्धार्थ गौतम बुद्धांची  2586 वी जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. ‘बुद्ध’ शब्दाचा अर्थ म्हणजे अत्यंत सर्वोच्च ज्ञान प्राप्त ज्ञानी व जागृत व्यक्ती. बुद्ध सांगतात, “खोटे बोलू नका. सत्याचा मार्ग कठीण असला तरी त्यातून सत्कर्मरूपी फळ मिळते. मानवी जीवनात दया, करुणा आणि मानवता असेल तरच त्या जन्माचे मोल आहे.”

बुद्धांनी जगाला पंचशील मार्ग सांगितला. शांती आणि करुणेची शिकवण दिली. जगभर गौतम बुद्धांचे अब्जावधी अनुयायी आहेत. पौराणिक कथांनुसार, भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी (नेपाळ) येथे मामाच्या घरी झाला. बौद्ध परंपरेनुसार, बुद्धांनी इंद्रियभोग आणि तीव्र तपस्वीपणा यांच्यातील एक मध्यम मार्ग शिकवला. त्यामुळे अज्ञान, लालसा, पुनर्जन्म आणि दुःखापासून मुक्तता होते. ‘बुद्ध’ हे वैयक्तिक नाव नाही. ज्यांना बोधी अर्थात जागृती, ज्ञान प्राप्त झाले आहे, त्यांच्यासाठी ती एक उपाधी आहे. ख्रिस्तपूर्व तिसऱया शतकाच्या मध्यापासून अशोकाच्या अनेक शिलालेखांमध्ये बुद्ध आणि बौद्ध धर्माचा उल्लेख आहे. सर्वात जुनी बौद्ध हस्तलिखिते गांधारमध्ये (आधुनिक वायव्य पाकिस्तान आणि पूर्व अफगाणिस्तान) सापडलेले गांधार बौद्ध ग्रंथ आहेत. ते इसवी सनपूर्व पहिल्या शतकापासून ते तिसऱया शतकापर्यंतचे आहेत. या धर्मात पवित्र उपवनांची पूजा तसेच वृक्ष, नाग आणि पशुपक्षी, वृक्षपूजेला महत्त्वाचे स्थान आहे. निर्वाण म्हणजे आसक्ती किंवा मुक्ती असे म्हणतात.

भगवान बुद्धांनी पुनर्जन्माबद्दल बरेच सांगितले आहे. त्यांना घडलेल्या मागील आणि घडणाऱया पुढील जन्माविषयी प्रगाढ ज्ञान होते. त्यांनी चमत्काराचा उपयोग लोकांना आकर्षित करण्यासाठी कधीच केला नाही. कर्म तैसे फळ असते ही त्यांची शिकवण होती. बुद्धांची भाषा कुठली, हे अज्ञात असले तरी  त्याने  मध्य इंडो-आर्यन भाषा किंवा विविध भाषांमध्ये प्रवचने दिली असावीत. त्यापैकी पाली ही प्रमुख भाषा असावी.

असे म्हटले जाते, सिद्धार्थ गौतम यांनी राजकुमारी यशोधरासोबत विवाह केला आणि ती गरोदर असताना राहुल या राजपुत्राला जन्म देण्याआधी तिला न सांगता सोडून गेले, असे का? बुद्ध तर खूप ज्ञानी आणि करुणामयी होते. मग आपल्या गरोदर पत्नीला त्यांनी का सोडून दिले? तिला किती त्रास झाला असेल? पतीशिवाय ती कशी जगली असेल? तिच्या वेदना बुद्धाला कळल्या नसतील का? असे बरेच प्रश्न मनात होते. एका तज्ञाला या प्रश्नाचे  उत्तर विचारले असता ते म्हणाले, बौद्ध धर्मात पुनर्जन्माला मान्यता आहे. जातक कथा त्याचे उदाहरण आहे. बुद्धांच्या एका जन्मात यशोधरा त्यांच्यावर फार प्रभावित झाली. तिने बुद्धांकडे हट्टाने वचन मागितले की, तुम्ही पती म्हणून मला मिळावेत ही माझी इच्छा आहे. तुम्ही सर्वज्ञानी आहात. माझी ही इच्छा पूर्ण करावी. तुम्ही ऐकले नाहीत तर मी प्राणत्याग करेन. बुद्धांना तिची दया आली. ते मंद स्मित करीत म्हणाले, या जन्मात ते शक्य नाही. पुढच्या जन्मात तू माझी पत्नी होशील, पण तू गंभीरपणे विचार केलेला बरा. तो प्रवास तुझ्यासाठी अत्यंत वेदनादायी  असेल. कारण लग्नानंतर फार काळ मी तुझ्या  जवळ राहू शकणार नाही. मी ज्ञानप्राप्तीसाठी निघून जाईन. तुझे जीवन कष्टमय  होईल. जीवन खडतर असले तरी जगाचे कल्याण माझ्यासाठी सर्वप्रथम आहे. तुला मान्य असेल तर तुझी इच्छा पूर्ण होईल. परत विचार कर.

यशोधरेने ही अट मान्य केली. त्यामुळे जेव्हा पुढच्या जन्मात भगवान बुद्धांचे लग्न यशोधरेसोबत झाले तेव्हा ते लग्नानंतर तिला न सांगता सोडून गेले. ते पत्नीला सोडून गेले त्याला पहिल्या जन्मातील वचन कारणीभूत होते. तसेही भविष्यकाराने त्यांचे जे भविष्य वर्तवले होते त्यानुसार ते कीर्तिमान विश्वसम्राट किंवा महान योगी होणार होते. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यापासून जगातील वेदना, दुःख लपवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते असफल झाले असे म्हणतात. विवाहानंतर ते नगरात विहार करताना त्यांना रोगी वृद्ध दिसला आणि त्यांनी वानप्रस्थाचा मार्ग निवडला. काही कर्तव्ये पूर्ण केल्यावर मुलगा राहुल भिक्षू बनल्यानंतर काही काळानंतर यशोधरादेखील भिक्षुणींच्या ाढमात दाखल झाली. कालांतराने तिला अर्हत अर्थात दिव्यत्व प्राप्त झाले.

विशेषत बौद्ध परंपरेत बुद्धांनी तीन प्रकारचे ज्ञान प्राप्त केले आणि त्यापैकी पहिले म्हणजे मनुष्याच्या मागील जीवनाचे तपशीलवार ज्ञान अर्थात पुनर्जन्म ज्ञान. बुद्धांच्या शिवाय त्यांचे प्रमुख शिष्यदेखील त्यांचे भूतकाळातील जीवन आठवण्यास सक्षम होते. भिक्षूंनी त्यांचे मागील जीवन आठवण्याची क्षमता प्राप्त केली होती. बौद्ध धर्मातील संत, विद्वान आणि ध्यान करणारे पवित्र भिक्षुक त्यांच्या मागील जीवनाचे स्मरण करण्यास सक्षम होते असे लिहिले गेले आहे. भगवान बुद्धांनी अनुसरलेला विपश्यना मार्ग आजही अवलंबला जातो. त्याची पवित्रता आणि पद्धती तशीच पाळली जाते, पण जो खरेच बौद्ध धर्माचे पालन कठोरपणे करतो, त्यालाच त्याचा अनुभव येतो.

[email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)