हिंदुस्थान-श्रीलंका संबंध नव्या वळणावर

540

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानने ‘शेजारी देश प्रथम’ हे धोरण अवलंबले आहे. संस्कृती, इतिहास आणि भाषा तीन मुद्दे हिंदुस्थान आणि श्रीलंकेसाठी समान दुवा आहेत. श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची भेट यशस्वीरीत्या संपली असताना अवघड विषयांपैकी श्रीलंकेसाठी सार्कची वाढ आणि बिम्सटेकसाठी हिंदुस्थानी प्राधान्य यामधील संतुलन शोधणे आवश्यक आहे. सध्या हिंदुस्थान शेजारील देशांशी आर्थिक आघाडीवर संबंध वाढविण्यावर भर देत आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील मैत्री संबंध आणखी नव्या वळणावर जातील असं मानलं जात आहे.

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी 8 ते 10 फेब्रुवारीदरम्यान हिंदुस्थानला दिलेली भेट अतिशय महत्त्वाची होती. या भेटीत त्यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. नोव्हेंबर 2019मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचे धाकटे बंधू गोटाबाया राजपक्षे यांनी 52.3 टक्के मतं मिळवून मोठा विजय प्राप्त केला होता. जून 2019 दुसऱयांदा पंतप्रधान होताच महिनाभरात नरेंद्र मोदींनी श्रीलंकेला भेट दिली.

गोटबाया राजपक्षे श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून निवडून येताच पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. दुसऱयाच दिवशी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर श्रीलंका दौऱयावर गेले आणि कोलंबोला जाऊन गोटाबाया यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने हिंदुस्थानात येण्याचं निमंत्रण दिलं, जे गोटाबाया यांनी स्वीकारलं. चीनची श्रीलंकेशी वाढलेली जवळीक कमी करण्यासाठी हिंदुस्थानने हे पाऊल उचललं. गोटाबायांनी नोव्हेंबरच्या अखेरीस आपल्या अध्यक्ष म्हणून पहिल्या परदेश दौऱयासाठी हिंदुस्थानची निवड केली.

गोटाबाया राजपक्षे हे श्रीलंकेच्या सैन्यात कर्नल होते. लिट्टे या संघटनेविरोधातल्या कारवाईचं नेतृत्व त्यांनी स्वतःच केलं होतं आणि या संघटनेचा खात्माही त्यांनीच केला. त्यामुळेच हिंदुस्थानी वंशाच्या तामीळ नागरिकांच्या मनात गोटबाया यांच्याविषयी संभ्रमाचं वातावरण आहे. लिट्टेला संपवल्यामुळे श्रीलंकेत गोटाबाया यांना टर्मिनेटर नावाने ओळखलं जाते. गोटाबायांनी लष्करामध्ये अनेक वर्षे सेवा केली असल्यामुळे त्यांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांची जाण आहे.

गोटाबायांच्या विजयानंतर रनिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी माजी अध्यक्ष आणि गोटाबायांचे थोरले बंधू महिंदा राजपक्षेंनी शपथ घेतली. महिंदा राजपक्षेंनीही पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्या विदेश दौऱयासाठी हिंदुस्थानचीच निवड केली.

श्रीलंका हिंदुस्थानसाठी भौगोलिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा देश आहे. त्यामुळेच चीनने सातत्याने श्रीलंकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. महिंदा राजपक्षे राष्ट्रपती असतानाच चीन आणि श्रीलंका यांची जवळीक वाढली. राजपक्षे यांनी 2014 मध्ये दोन चिनी लढाऊ जहाजांना श्रीलंकेच्या सीमेत येण्याची परवानगी दिली होती. त्यामुळेच गोटाबाया यांच्या विजयामुळे चीन आणि श्रीलंका यांची मैत्री आणखी पुढच्या स्तरावर जाण्याची शक्यता आहे असे मानले जाते.

श्रीलंका चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. श्रीलंकेने हंबनटोटा बंदर विकसित करण्यासाठी चीनकडून मोठय़ा प्रमाणात कर्ज घेतलं, पण कर्ज न चुकवता आल्यामुळे हे बंदरच 99 वर्षांच्या भाडेकरारावर द्यावं लागलं. सध्या या बंदरावर चीनचा अधिकार आहे. चीनने श्रीलंकेला एक लढाऊ जहाजही भेट दिलं आहे. दोन्ही देशांचे संबंध मजबूत असल्याचं दाखवण्यासाठी चीनने हे पाऊल उचललं, पण या माध्यमातून हिंदी महासागरात स्वतःच्या सैन्याचा मार्ग मोकळा करणे हा चीनचा खरा उद्देश आहे. चीन गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी महासागरात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्याला आता श्रीलंकेमुळे बळ मिळू शकतं. हे रोखण्यासाठीच हिंदुस्थान सक्रिय झाला आहे. श्रीलंका आणि चीन यांच्यातील वाढती जवळीक, चीनने श्रीलंकेमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये प्रचंड प्रमाणावर केलेली गुंतवणूक, त्यामुळे श्रीलंकेचे कर्जबाजारी होणे आणि दिवाळखोरी टाळण्यासाठी राष्ट्रीय तसेच प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने हंबनटोटा बंदर आणि विशेष आर्थिक क्षेत्रासारखे संवेदनशील प्रकल्प चीनच्या हवाली करणे हे हिंदुस्थानच्या चिंतेचे विषय आहेत. श्रीलंका चीनकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण चीन पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांत मोठी गुंतवणूक करत आहे. श्रीलंकेतील चिनी प्रकल्प हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा असले तरी जोपर्यंत चीन त्यांचा वापर हिंदुस्थानची नाविक कोंडी करण्यासाठी करत नाही, तोपर्यंत अशा प्रकल्पांना हिंदुस्थानची हरकत नाही.

राजपक्षे भावंडांचे सरकार तामीळ वंशाच्या लोकांशी भेदभाव करणार नाही याबद्दल आश्वासन मिळवणे हे हिंदुस्थानसाठी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या ताज्या भेटीतील महत्त्वाचे उद्दिष्ट होते. युद्धात उद्ध्वस्त झालेल्या जाफना आणि उत्तरेकडील भागात पुनर्बांधणी आणि पुनर्वसन प्रकल्पांमध्ये हिंदुस्थानने मोठय़ा प्रमाणावर सहभाग घेतला आहे. श्रीलंकेतील तामीळ भागात हिंदुस्थानकडून सुमारे 50 हजार घरे बांधण्यात येत आहेत. हिंदुस्थानचे श्रीलंकेतील उच्चायुक्त तरणजितसिंह संधू यांनी नुकताच हिंदुस्थानचे अमेरिकेतील राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवत्ते गोपाळ बागले या ज्येष्ठ परराष्ट्र अधिकाऱयाची श्रीलंकेतील उच्चायुक्त म्हणून निवड केली आहे. श्रीलंकेला चीनच्या मदतीची गरज आहे. चीनप्रमाणेच हिंदुस्थान, अमेरिका, जपान आणि सिंगापूर अशा सर्वांनीच श्रीलंकेत गुंतवणूक करावी असे राजपक्षे सरकारचे मत आहे. श्रीलंका गुंतवणूकदार देशांमध्ये पक्षपात न करता त्यांच्यातील वादाच्या मुद्दय़ांमध्ये अलिप्तता बाळगेल अशी राजपक्षे सरकारची भूमिका आहे.

महिंदा राजपक्षेंच्या भेटीत हिंदुस्थानने श्रीलंकेला पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी 40 कोटी डॉलरची कर्जहमी देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका संबंधांदरम्यान सुरक्षा हा हिंदुस्थानसाठी मोठा काळजीचा मुद्दा आहे. त्याशिवाय व्यापारी व आर्थिक हितसंबंधांकडेही कानाडोळा करून चालत नाही. हिंदुस्थानच्या एकूण क्षेत्रीय व्यापारापैकी 5 टक्के व्यापार दक्षिण आशियाई देशांमध्ये होतो. श्रीलंकेसाठी हिंदुस्थान हा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. त्यामुळे दोन्ही देशांसाठी व्यापारी आणि आर्थिक संबंध महत्त्वाचे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या