लेख – इंटरनेटबंदी, राष्ट्रहित आणि मानवाधिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

इंटरनेटमुळे सोशल मीडियाचा वापर फार सोपा झाला आहे. सोशल मीडियावरून दररोज कोट्यवधी संदेशांची देवाणघेवाण होत असते. अनेक संदेश हिंसाचाराला चिथावणी देणारे, समाजव्यवस्था विस्कळीत करणारे संदेश जेव्हा पाठवले जातात तेव्हा त्याची खातरजमा करण्याची तसदी अनेक जण घेत नाहीत. अफवांवर विश्वास ठेवला जातो आणि मग त्यातून नको त्या घटना घडतात. निष्पाप लोक बळी पडतात. खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचे अतोनात नुकसान होते. अफवांमुळे अराजकाची परिस्थिती निर्माण होणार असेल तर सरकार हातावर हात ठेवून गप्प राहू शकत नाही.

सॉफ्टवेअर फ्रीडम लॉ सेंटर नावाची एक संस्था आहे. मागच्या महिन्यात या संस्थेच्या अहवालानुसार, 2012 पासून आतापर्यंत हिंदुस्थानात एकूण 367 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. याची दोन मुख्य कारणं म्हणजे दहशतवाद आणि जातीय हिंसाचार. 2012 मध्ये तीनवेळा, 2013 मध्ये पाचवेळा, 2014 मध्ये सहावेळा, 2015 मध्ये 14 वेळा, 2016 मध्ये 31 वेळा, 2017 मध्ये 78 वेळा, 2018 मध्ये 134 वेळा आणि 2019 मध्ये 95 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. 2018 मध्ये सर्वाधिक म्हणजे 134 वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.

गेल्या आठ वर्षांमध्ये जम्मू-कश्मीरमध्ये सर्वाधिक सुमारे 180 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. 2019 मध्ये काँग्रेसशासित राजस्थानमध्ये 18 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आसाममध्ये 12 वेळा, उत्तर प्रदेशमध्ये 11 वेळा, तर पश्चिम बंगालमध्ये नऊवेळा इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली होती. थोडक्यात, ही संस्था आणि देशातील काही तथाकथित तज्ञ हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की, इंटरनेट बंदी केल्यामुळे त्या भागातील जनतेचे मानवाधिकार भंग झाले, मात्र असे आरोप नक्कीच चुकीचे होते.

इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत, त्यापेक्षा दुप्पट तोटे आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र इंटरनेटची सुविधा हा मानवाधिकार मानला पाहिजे, त्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार सरकारला असू नये ही जी मागणी समोर आली आहे, ती मान्य केलीच जाऊ शकत नाही. आज आपले अनेक व्यवहार हे डिजिटल झाले असल्याने इंटरनेट गरजेचे आहे. त्यामुळे काही सुरक्षेचे कारण नसताना इंटरनेटवर निर्बंध घालू नयेत हे बरोबर आहे.

इंटरनेटमुळे सोशल मीडियाचा वापर फार सोपा झाला आहे. सोशल मीडियावरून दररोज कोट्यवधी संदेशांची देवाणघेवाण होत असते. अनेक संदेश हे नकारात्मक असतात. हिंसाचाराला चिथावणी देणारे, समाजव्यवस्था विस्कळीत करणारे संदेश जेव्हा पाठवले जातात, तेव्हा त्याची खातरजमा करण्याची तसदी अनेक जण घेत नाहीत. अफवांवर विश्वास ठेवला जातो आणि मग त्यातून नको त्या घटना घडतात. निष्पाप लोक बळी पडतात. खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचे अतोनात नुकसान होते. त्याचे दीर्घकालीन परिणाम समाजाला भोगावे लागतात. अफवांमुळे अराजकाची परिस्थिती निर्माण होणार असेल तर सरकार हातावर हात ठेवून गप्प राहू शकत नाही.

आज 60-70 टक्के हिंदुस्थानींच्या हाती मोबाईल व त्यात इंटरनेटची सुविधा आहे. आज देशात अनेक वेळा अनेक कारणांसाठी हिंसक आंदोलने सुरू असतात. अनेक संस्था आणी राजकीय पक्ष त्यात सामील असतात. हिंसक आंदोलनांमुळे राष्ट्रीय संपत्तीचे विनाकारण नुकसान होते, निष्पाप लोकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. असामाजिक तत्त्वं समाजजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड जाळपोळ करतात, समाजमाध्यमांवरून अफवा पसरवतात. या अफवांमुळे समाजात दुही, अशांतता, अस्थैर्य निर्माण होते.

उत्तर प्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी जे मोर्चे निघाले, त्यात सामील झालेल्या काही समाजकंटकांनी सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांची जाळपोळ केली. या सगळ्या घटनांबाबत समाजमाध्यमांवरून अपप्रचार सुरू झाला होता. त्याला बळी पडत अन्य अनेक लोक – ज्यांना हिंसक आंदोलन कशाकरिता आहे हे माहीतसुद्धा नव्हते – रस्त्यावर उतरले आणि त्यांनी धुमाकूळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, निष्पाप लोकांचे जीव जाऊ नयेत यासाठी प्रशासनाने आणि पोलिसांनी मर्यादित काळासाठी काही भागांत इंटरनेट सेवा थांबवण्याचा निर्णय केला होता. हा निर्णय जनतेच्या हितासाठी घेतला गेला होता, हे मानवाधिकाराचे उल्लंघन नक्की नव्हते. सरकारने निर्णय कोणत्या उद्देशाने घेतला हे महत्त्वाचे आहे.

कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर कश्मीरची सुरक्षा लक्षात घेत सरकारने त्या राज्यात काही कालावधीसाठी इंटरनेट सेवांवर निर्बंध घातले होते. राज्यात हिंसाचार माजू नये, शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानकडून अफवांचे पीक पसरवले जाऊन जनजीवन उद्ध्वस्त होऊ नये, राष्ट्राची एकता आणि अखंडतेला धोका उत्पन्न होऊ नये या हेतूंनी सरकारने असा निर्णय घेतला होता. त्यामुळे कुणाचा मानवाधिकार हिरावला गेला असे कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. राष्ट्रहितापेक्षा कुणालाही अधिकार महत्त्वाचा नाही.

कलम 370 हटविल्यानंतर सर्वाधिक तीव्र प्रतिक्रिया आली ती पाकिस्तानकडून. पाकिस्तानने जगभर कांगावा केला आणि मिळेल त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदुस्थानची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अनेक अफवा पसरवल्या. त्या अफवांमुळे कश्मिरी जनमानस विचलित होऊ नये, जनजीवन विस्कळीत होऊ नये, वित्त व प्राणहानी टळावी अशा सगळ्या प्रामाणिक हेतूंनी तिथे इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे काही कश्मिरींची गैरसोय झाली, पण त्याचा दीर्घकालीन फायदा त्यांनाच होणार आहे. अनेक वेळा राष्ट्रहित डोळ्यांपुढे ठेवून कठोर निर्णय करावे लागतात,ज्याचा फायदा पुढे देशाला होतो.

कुठली परकीय संस्था काय म्हणते हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे अंतर्गत सुरक्षा, स्वस्थ समाजजीवन, नागरिकांमधील एकजूट आणि सौहार्द. सर्वात महत्त्वाचे आहे राष्ट्रहित. कारण राष्ट्रकारण सर्वतोपरी आहे. सरकार कोणत्या पक्षाचे आहे हे महत्त्वाचे नाही. देशातील जनतेने राष्ट्रहितासारख्या मुद्दय़ांवर एकी दाखविली पाहिजे.
मागे गोरखालॅण्डची मागणी झाली तेव्हा हिंसक आंदोलन सुरू असताना दार्जिलिंगमध्ये शंभर दिवस इंटरनेट बंद होते. गेल्या काही वर्षांत राजस्थानात 67 वेळा, तर उत्तर प्रदेशात किमान बारावेळा इंटरनेट सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला गेला.