
>> शब्दांकन – शुभांगी बागडे
कोरोना आणि लॉक डाऊनमुळे समाजाची अस्थिर झालेली मानसिक स्थिती आणि सोशल साइटच्या आक्रमणाला तोंड द्यायचं असेल तर पुस्तकांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करायला हवा. माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती बदलली की माणसा-माणसातला व्यवहार बदलतो. त्याला नको वाटणारं वेगळं स्वरूप येतं. हे रोखण्याचं काम वाचनातील सुसंस्कार करू शकतात.
कोरोनाने सगळ्या जगाला पिळून काढलं आहे, भयग्रस्त केलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून गेले कित्येक दिवस संपूर्ण देश लॉक डाऊनमध्ये आहे. जीवनावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे, कार्यालये बंद आहेत. सध्या जी भयावह परिस्थिती निराळी झाली आहे. यातून आपण कधी बाहेर पडू याची शाश्वती देता येत नाहीये. यामुळेच कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला लॉक डाऊनसारखे कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत.
लॉक डाऊनचा हा काळ आपल्याला आपल्या वाटणाऱया अनेक गोष्टींशी सांधणारा दुवा ठरत आहे. आपलं मानसिक व बौद्धिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी या सवयी आपल्याला मदतच करतात. आपल्या आवडीनिवडी, आपली अभिरुचीसंपन्नता अनेक चांगल्या सवयीनी, गरजांनी समृद्ध होते. त्यातीलच एक गरज म्हणजे बौद्धिकरीत्या संपन्न असण्याची गरज. ही बौद्धिक गरज पूर्ण करण्यासाठी जी अनेक माध्यमं आपल्याला मात करतात त्यातीलच एक म्हणजे पुस्तकं. मात्र ही पुस्तकं कोणत्याही काळात आपल्याला उपलब्ध असणं गरजेचं आहे. सध्याच्या लॉक डाऊनमध्ये शासनाने सेवांबाबत अनेक निर्णय घेतले. कुठल्या सेवा चालू राहणार, कुठल्या बंद याचा विचार करून जीवनावश्यक वस्तू व सेवांना यात सूट देण्यात आली. यात वैद्यकीय सेवा, किराणा व घरगुती सामग्री यांना निश्चितच स्थान दिलं गेलं. परंतु त्यापलीकडेही आपल्याला मानसिक-बौद्धिक गरजा भागवण्यासाठी पुस्तकांची गरज असते हेही लक्षात घ्यायला हवं. समाजाला सुजाण करायचे असेल तर पुस्तकांची आवश्यकता आहेच. ग्रंथालय वाढवणं व त्यासारख्या व्यवहारात बदल आणणं याबाबत योग्य धोरणं आखणं ही शासनाची जबाबदारी आहेच. गेल्या काही वर्षांत ग्रंथालयांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळेच ग्रंथव्यवहार वाढणं आणि त्याला चांगलं रूप देणं या भूमिकेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.
अगदी आताचं उदाहरण घेऊया. आपण अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सध्या पुस्तकांची दुकानं उघडली गेली आहेत. अनेक रसिक वाचक ही दुकानं उघडण्याच्या प्रतीक्षेत होते. यामुळेच अगदी आठवडा होत आला तरी पुस्तकाच्या दुकानांसमोरची गर्दी हटत नाहीये. लोक रांगा लावून पुस्तकं घेत आहेत हे सुखावणारं दृश्य आहे. वाचनसंस्कृती संपल्याचा नारा देणाऱया लोकांसाठी हे दृश्य खास आहे. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, लोकांना अभिरुचीसंपन्न बनवण्याचीही जबाबदारी आपली आहे.
सध्याच्या सोशल नेटवार्ंकगच्या गदारोळात लोकांमधील साहित्याची ओढ जागृत ठेवण्याचं काम पुस्तकं करतात, मात्र लॉक डाऊनच्या काळात सोशल साइटस्वर वेळ घालवण्याचं प्रमाण खूप वाढलं. येत्या काळात मिळणारा अतिरिक्त वेळही यासाठीच खर्ची होण्याची चिन्ह आहेत. मात्र हे टाळायचं असेल तर पुस्तकांची मदत तत्परतेने होऊ शकते. कोरोना आणि लॉक डाऊनमुळे समाजाची अस्थिर झालेली मानसिक स्थिती आणि व्हॉटस्ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल साइटच्या आक्रमणाला जर तोंड द्यायचं असेल तर पुस्तकांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करायला हवा. माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती बदलली की माणसा-माणसातला व्यवहार बदलतो. त्याला नको वाटणारं वेगळं स्वरूप येतं. हे रोखण्याचं काम वाचनातील सुसंस्कार करू शकतात. ज्याची कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खूप गरज आहे.
वाचनसंस्कृतीमुळे अभिव्यक्ती म्हणजे नेमकं काय हे समजतं. माणसाला विचार करायला लावणारी अभिव्यक्ती सोशल नेटवार्ंकग साइटस्मुळे बोथट होत चालली आहे. ही खरंतर गंभीर बाब आहे. साहित्याची ओढ, वाचन या गोष्टी समाजाला सजग बनवितात. एक परिपूर्ण विचार करणारा, विवेकबुद्धी जागृत असणारा समाज निर्माण करण्यासाठी केवळ साहित्य वा शैक्षणिक क्षेत्रातून प्रयत्न व्हायला पाहिजेत असं मुळीच नव्हे. तेव्हा शासनानेही याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे सध्याच्या घडीला गरजेचे आहे.
ग्रंथव्यवहारात सामील सगळ्यांनीच ग्रंथालय चळवळीचे पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलांच्या बौद्धिक विकासात पुस्तकांचे महत्त्व निर्विवाद आहे. आज शाळेविना सर्व मुले घरात कोंडलेली असताना, शाळा बंद असताना मुलांना मोबाईल फोनचे व्यसन लागण्याचा धोका आहे. असे असताना मुलांना पुस्तकांपासून वंचित ठेवणे त्यांचावर अन्याय केल्यासारखे आहे. वाचन ही एकटय़ाने साधणारी कला आहे, त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असलेल्या काळात या कलेला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.
पुस्तकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घेतल्यामुळे ग्रंथव्यवहारालाही उभारी येईल. पुस्तकांकडे वेळ जाण्याचं व मनोरंजनाचं साधन म्हणून पाहण्याचं जो दृष्टिकोन आहे तोही यामुळे बदलण्यास मदत होईल. लॉक डाऊनच्या काळात इतर सर्व व्यवहार बंद राहिले आणि पुस्तकांची दुकानं सुरू राहिल्यामुळे जे लोक वाचत नाहीत व वाचनाला तितकंसं महत्त्व देत नाहीत त्यांना याचं महत्त्व आपोआप लक्षात येईल.
कोरोना संकटात अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत आणि त्यांना मदत करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करत आहे; परंतु हिंदुस्थानी जनमानसाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक गरजा भागवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱया ग्रंथ व्यवसायाकडेही शासनाने विशेष लक्ष देऊन त्यांनाही व्यवसायाची पुनर्बांधणी करण्यास मदत करणे समाजाच्या भल्याचे ठरेल. याबरोबरच आपला महाराष्ट्र अशा प्रकारच्या निर्णयाने देशासमोर नवीन आदर्श ठेवेल. सध्या युरोपीय देशांनी अशा प्रकारे वाचन चळवळ अबाधित राहावी यासाठी पुढाकार घेतला आहे. खरंतर सुजाण देशांमध्ये याबाबत वेगळे कायदे करण्याची गरज नसते. आपला देशही साहित्य, वाचन चळवळ याबाबत कायम पुढारलेला राहिला आहे. त्यामुळेच अशा प्रकारे एक पाऊल पुढे टाकत देशातील या विचारांना पुढे नेण्याचं महत्त्वाचं काम महाराष्ट्राकडून घडेल आणि महाराष्ट्राची साहित्य क्षेत्रातील ओळख अजून समृद्ध होईल.
समाजाची गरज ओळखून हिंदुस्थानात केरळ राज्यात पुस्तक व्यवसायाला जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा देण्यात आला. अनेक युरोपीय देशांमध्येही पुस्तकांना जीवनावश्यक सेवेचा दर्जा दिला गेला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही पुस्तकांना तसाच दर्जा मिळावा हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला साजेसेच ठरेल. लॉक डाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये लोकांचं मानसिक स्थैर्य हरवलेलं होतं. आता थोडी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू शकतेच. हेच जाणून सध्याच्या काळात ही गरज मान्य झाली तरीही बरेच काही होण्यासारखे आहे. भविष्यात इतर कोणत्याही कारणाने परिस्थिती बिकट झाली तरी अशा वेळी किराणा माल व औषधाच्या दुकानांसोबत पुस्तकाची दुकानं जर उघडी राहिली मग ती अल्प वेळेसाठी का असेना जीवनावश्यक वस्तूंच्या बरोबरीने लोकांना उपलब्ध होतील. वाचकांना वाचनाचा आनंद मिळेल आणि त्यांचा वेळ चांगल्या गोष्टीसाठी खर्ची होईल.





























































